कोरोना अलर्ट : प्राप्त 979 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 13 पॉझिटिव्ह
• 24 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.28 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 992 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 979 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 11 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 369 तर रॅपिड टेस्टमधील 610 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 979 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 3, तालुका : नांद्राकोळी 1, शेगांव शहर : 2, सिं. राजा तालुका : चांगेफळ 1, चिखली तालुका : शेलसूर 1, मेहकर तालुका : भोसा 1, लोणार तालुका : शेलगांव जहागीर 1, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : तांबुलवाडी 1, परजिल्हा माहोरा ता. जाफ्राबाद 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 13 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे भंडारी ता. सिं.राजा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 24 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 567496 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85841 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85841 आहे.
आज रोजी 1103 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 567496 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86612 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85841 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 110 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 661 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
कोविडमुळे कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झालेल्या कुटूंबांना ‘स्माईल’ योजनेचा आधार
• अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंब प्रमुख असावा
• महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजना
बुलडाणा,(जिमाका) दि.28 : जगात थैमान घालणाऱ्या कोविड 19 या साथरोगामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटूंब प्रमुखाचा मृत्यू झाला असल्यास त्या कुंटूंबियांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मार्फत (support for marginalized individuals for livelihoods enterprie) SMILE स्माईल ही योजना व्यवसायासाठी कर्ज देण्याकरीता अंमलात येत आहे. या योजनेनुसार प्रकल्प मुल्य 1 ते 5 लक्ष रूपये असल्यास कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी एनएसएफडीसी यांचा 80 टक्के सहभाग व 20 टक्के भांडवल अनुदान राहणार आहे. तसेच व्याजदर 6 टक्के असणारआहे.
या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लक्ष रूपये पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाच्या कुटूंबातील सदस्य असावा. कुटूंब प्रमुखाच्या रेशन कार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकाकर आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटूंब प्रमुखाची मिळकत कुटूंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरीता नगर पालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहे. तसेच मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधार कार्ड प्रत, उत्पन्नाचा दाखला (3 लक्षापर्यंत), कोविड 19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड व वयाचा पुरवा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटूंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर भरण्यात यावी. तरी कोविडमुळे दुर्देवाने कुटूंब प्रमुखाच्या मृत्यू झालेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. एस धांडे यांनी केले आहे.
******
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
शेतकऱ्यांना अपघातातील जोखमीसाठी विम्याचे संरक्षण
• अपघाती मृत्यू झाल्यास 2 लक्ष रूपयांची मदत
बुलडाणा,(जिमाका) दि.28 : राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेती काम करताना अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून विम्याचे कवच प्रदान केले आहे. अशा अपघातांमध्ये जोखमीसाठी विम्याचे संरक्षण यामुळे शेतकरी कुटूंबांना मिळत आहे. या योजनेनुसार शेती करताना अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा धक्का बसणे, रेल्वे व रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, खून, उंचावरून पडून मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू, दंगलीत होणाऱ्या अपघाती घटनांमुळे होणारे मृत्यू तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो. अथवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबास आर्थिक लाभ देणे आवश्यक असते.
या योजनेमध्ये 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा अपघात होवून मृत्यू झाल्यास 2 लक्ष रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास 2 लक्ष रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास 2 लक्ष रूपये रक्कम देय आहे. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलाही विमा उतरविण्याची आवश्यकता नाही. योजनेचा लाभ मिळविण्याकरता मृतक किंवा अपंग व्यक्ती 7/12, 6क, 6 ड (फेरफार) यामध्ये नोंदणीकृत असलेले आणि वय 10 ते 75 वर्ष वयोगटातील शेतकरी पात्र आहेत.
शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास योजने तंर्गत लाभ घेण्यासाठी https://www.auxilliuminsurance.com /insurance_company.html या लिंकवर पुर्वसुचना देण्यात यावी. तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी अथवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा व दावा अर्ज कागदपत्रांसह दाखल करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे. तसेच योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. योजनेसाठी विमा सल्लागार म्हणून मे. ऑक्झिलियम इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि, प्लॉट नंबर 61/4, सेक्टर – 28, प्लाझा हटच्या पाठीमागे, वाशी, मुंबई – 400703, दुरध्वनी क्रमांक 022-27650096, टोल फ्री क्रमांक 1800 220 812, ई मेल gmsavy21@auxilliuminsurance.com आहे. विमा कंपनी म्हणून युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. युनिट नंबर 601-602, 6 वा मजला, रिलायबल टेक पार्क, क्लाऊड सिटी कॅम्पस, ठाणे-बेलापूर रोड, एरोली, नवी मुंबई-400708, दुरध्वनी क्रमांक 022-41690888, टोल फ्री क्रमांक 1800224030 / 1800 2004030, ई मेल vaibhav. shirsat@universalsompo.com व yogendra.mohite@universalsompo.com आहे.
लाभासाठी ही कागदपत्रे आवश्यक
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभाकरीता खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत. तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध असलेला मुळ प्रतीतील अर्ज, दावा अर्ज, सर्व मूळ प्रतीतील 7/12, 6 क व 6 ड (फेरफार), नमुना 8-अ, वारसदाराचे बँक खाते पुस्तकाची छायांकित प्रत, अर्जदाराच्या फोटोसह घोषणापत्र अ आणि घोषणापत्र ब, वयाचा दाखल्यामध्ये मतदान कार्ड, पॅन, चालक परवाना, जन्माचा दाखला, पासपोर्ट, शाळेचा दाखल यापैकी एक साक्षांकित केलेली छायांकित प्रत, मूळ प्रतीतील मृत्यूचा दाखला, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), अकस्मात मृत्यूची खबर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेष्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा), पोस्टमार्टम रिपोर्ट (शव विच्छेदन अहवाल), वाहन चालविण्याचा वैध परवाना, व्हिसेरा रिपोर्ट.
***********
देयकांवर ‘एफएसएसएआय’ नोंदणी क्रमांक टाकणे बंधनकारक
• अन्न व्यावसायिकांना 1 ऑक्टोंबरपासून सक्ती
बुलडाणा,(जिमाका) दि.28 : अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे 8 जून 2021 च्या आदेशानुसार सर्व अन्न व्यावसायिकांना कॅश रिसीप्ट, पर्चेस, कॅश मेमो व देयक या सर्वांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत प्राप्त 14 अंकी परवाना व नोंदणी क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. ही सक्ती 1 ऑक्टोंबर 2021 पासून लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामागे ग्राहकांना सदर अन्न व्यावसायिकाबद्दल अतिरिक्त माहिती उपलब्ध करणे व माहितीच्या अनुषंगाने ते एखाद्या अन्न व्यावसायिकाबाबत गरजेनुसार एफएसएसएआय पोर्टलवर तक्रार नोंदविता येणे हा हेतू आहे. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व देयकांवर 14 अंकी एफएसएसएआय परवाना/ नोंदणी क्रमांक 1 ऑक्टोंबर 2021 पासून नमूद करावा. अन्यथा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल, असे सहायक आयुक्त (अन्न) स. द केदारे यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment