Monday, 21 June 2021

DIO BULDANA NEWS 21.6.2021

 


कृषी विभागाच्या योजनांमधील शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा करावे

-          कृषि सचिव एकनाथ डवले

  • कृषि विभागाच्या योजनांची आढावा बैठक
  • पोकरा योजना प्रभावीपणे राबवावी

बुलडाणा,(जिमाका) दि.21 : शासन शेतकऱ्यांचा जीवन स्तर उंचविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. वैयक्तिक लाभार्थी अथवा समुह स्तरावर लाभार्थी आधारीत कृषि विभागाच्या योजनांमधील लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित असल्यास ते तातडीने अदा करावे, असे आदेश राज्याचे कृषि व पदुम (पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय) विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज दिले.

    स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात कृषि विभागाच्या योजनांची आढावा बैठक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना सचिव श्री. डवले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, महाबीजचे व्यवस्थापक श्री. मोराळे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, श्री. पटेल, श्री. राठोड, कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे आदींसह तालुका कृषि अधिकारी यांची उपस्थिती होती.

  सुक्ष्म सिंचनमध्ये ठिबक सिंचनाचे अत्यंत महत्व असल्याचे सांगत सचिव श्री. डवले म्हणाले, ठिबक सिंचन संच खरेदी करण्यासाठी पूर्व परवानगी देण्यात आली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचे कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर ठिबक सिंचन संच अनुदानाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.  तसेच महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ द्यावा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण फळबाग लागवड करण्यात येते. या योजनेतंर्गत फळबाग लागवड योजनेचे प्रशासकीय मान्यता प्रलंबित असल्यास तातडीन देण्यात यावी. प्रशासकीय मान्यतेवाचून फळबाग लागवड राहू नये, याची काळजी घ्यावी.

   ते पुढे म्हणाले, पिकेल ते विकेल या धोरणानुसार जिल्ह्यात पिकांची मुल्य साखळी विकसित करावी. तसेच विक्रीची व्यवस्था करावी. ही शासनाची महत्वांकांक्षी योजना आहे. मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रात अनुकूलता आणणारी ही योजना असून या योजनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी करावी. प्रधानंमत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कार्यक्रमातंर्गत  प्राप्त प्रस्तावांमध्ये त्रुटीमधील प्रस्तावातील त्रुटी दूर करून घ्याव्यात. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवडलेल्या गावांमधील शेतकऱ्यांचे डेस्कनुसार प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत.  एक शेततळे करण्यासाठी मशीन, डिझेल आदीचा खर्च काढून मान्यता घ्यावी.  एक गाव एक वाण मोहिमेतंर्गत जिल्ह्यात कापूस पिकासाठी 95 गावे निवडण्यात आली. या गावांमध्ये कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्याची प्रयत्न करावे. सर्वोत्कृष्ट उत्पादकता वाढविणे हा उद्देश ठेवून दोन पीकांची निवड करायची होती. निवडलेल्या पिकांमधील सर्वोत्कृष्ट उत्पादकता असणारे दोन शेतकरी तालुका निहाय निवडावे. तालुक्यात सर्वोत्कृष्ट उत्पादकता असलेल्या शेतकऱ्यांचा रिसोर्स बँक म्हणून उपयोग करावा.  अन्य शेतकऱ्यांना उत्पादकता वाढविण्यासाठी अशा शेतकऱ्यांचे  मार्गदर्शन घेण्यात यावे.  याप्रसंगी सर्वाधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या लागवड पद्धतीवर आधारीत पुस्तकाचे विमोचनही सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

  पीकानुसार सर्वाधिक उत्पादन घेणारे तालुकानिहाय शेतकरी व उत्पादकता

बुलडाणा : कापूस- शिवहरी नामदेव बुधवत सोयगांव,प्रति हेक्टर 17 क्विंटल, सोयाबीन- किशोर रामदास सपकाळ उमाळा , प्रति हेक्टर 30 क्विंटल, चिखली : सोयाबीन- विजयकुमार पुंजाजी अंभोरे मंगरूळ नवघरे, प्रति हेक्टर 45 क्विंटल, तूर- सुनील नारायण कणखर वरखेड, प्रति हेक्टर 28 क्विंटल,    मोताळा : कापूस- मोतिसिंग मलखांब रबडे तारापूर, प्रति हेक्टर 28 क्विंटल, सोयाबीन- सुरेश किसन चव्हाण गोतमारा, प्रति हेक्टर 31 क्विंटल, मलकापूर : मका- सुभाषराव तायडे वरखेड, प्रति हेक्टर 50 क्विंटल, कापूस- गजानन ओंकार बोंडे कुंड, प्रति हेक्टर 20 क्विंटल, खामगांव : कापूस- गजानन राजाराम ढोंगळे उमरा, प्रति हेक्टर 45 क्विंटल, सोयाबीन- संदीप रमेश ठाकरे बोरी अडगांव, प्रति हेक्टर 30 क्विंटल, शेगांव : कापूस- मारोती गोपाळा चित्ते चिंचोली, प्रति हेक्टर 27 क्विंटल, सोयाबीन- गोपाळ सदाशिव ढगे चिंचोली, प्रति हेक्टर 22.50 क्विंटल, नांदुरा : सोयाबीन – गजानन काशीराम ठाकरे माळेगांव, प्रति हेक्टर 22.50 क्विंटल, कापूस- बाळकृष्ण वासुदेव पाटील कंडारी, प्रति हेक्टर 62 क्विंटल, जळगांव जामोद : कापूस- रामदास शत्रुघ्न जाधव खेर्डा खु, प्रति हेक्टर 27.50 क्विंटल, सोयाबीन- मुरलीधर पुंडलीक राऊत पिं.काळे, प्रति हेक्टर 25 क्विंटल,  संग्रामपूर : संत्रा- प्रदीप भुतडा सोनाळा, प्रति हेक्टर 30 क्विंटल, सोयाबीन- सचिन सुरेश अग्रवाल सोनाळा, प्रति हेक्टर 7 क्विंटल, मेहकर : सोयाबीन- केशव शालीकराम खुरद भोसा, प्रति हेक्टर 30 क्विंटल, सोयाबीन- भारत विजयराव टाले आरेगांव, प्रति हेक्टर 20 क्विंटल, लोणार : सोयाबीन- भगवानराव संपतराव सिरसाट वडगांव तेजन, प्रति हेक्टर 25 क्विंटल, सोयाबीन- प्रफुल्ल साहेबराव सुलताने गुंजखेड, प्रति हेक्टर 27.50 क्विंटल, दे. राजा : कापूस- कैलास भिवाजी नागरे सरंबा, प्रति हेक्टर 45 क्विंटल, सोयाबीन- कैलास सुगदेव मुंडे पळसखेड, प्रति हेक्टर 35 क्विंटल, सिं. राजा : हळद- दत्तात्रय गणपत राऊत साखरखेर्डा, प्रति हेक्टर 25 क्विंटल,  सोयाबीन व तूर- प्रविण सुभाष सरकटे देवखेड, प्रति हेक्टर 24 क्विंटल सोयाबीन व 15 क्विंटल तूर.

 

थोडक्यात पोकरा…

एकूण कार्यरत गावे 413, खारपाण पट्टयातील गावे 166, पात्र शेतकरी / भूमीहीन शेतमजूर संख्या 157950, आज अखेर नोंदणी झालेले 71 हजार 927, प्राप्त अजार्पैकी पूर्वसंमती दिलेले अर्ज 28378, अनुदान अदायगी 12811.   

   

****

                        नोंदीत घरेलू कामगारांची माहिती अद्ययावत करावी

  • नोंव्हेबर 2011 ते मार्च 2021 कालावधीत नोंदीत झालेले घरेलू कामगार
  • सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.21 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना प्रत्येकी 1500 रूपये मदतीचा आधार मिळणार आहे. अर्थसहाय्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेता गत 14 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे रोजगार बंद पडल्याच्या पार्श्वभूमीवर घरेलू कामगारांना प्रत्येकी 1500 रूपये अर्थसहाय्य मिळणार आहे. तरी माहे नोव्हेंबर 2011 ते 31 मार्च 2021 या कालावधीतील बऱ्याच घरेलू कामगारांनी नोंदणी करतेवेळी आधार कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत, सरकारी कामगार अधिकारी या कार्यालयातंर्गत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ कार्यालयास अर्जासोबत दिलेली नाही. तरी वरील मंडळामध्ये माहे नोव्हेंबर 2011 ते 31 मार्च 2021 कालावधीत नोंदणी व नुतनीकरण केलेले आहे व ज्यांचे कागदपत्र अपूर्ण आहे, अशा कामगारांनी आधार कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत, जिथे काम करतात त्या मालकाचे प्रमाणपत्र, नोंदणी अथवा नुतनीकरणाची पावती आदी कागदपत्रे मंडळाच्या https://public.mlwb.in/public या लिंकवर जावून ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे स्वयं साक्षांकित मोबाईल क्रमांकासह ऑनलाईन सदर लिंकवर अपलोड करावी. जेणेकरून कुठलाही नोंदीत घरेलू कामगार लाभापासून वंचित राहणार नाही, असे सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी कळविले आहे.

*****

 

निरोगी, सुदृढ व दीर्घ आयुष्यासाठी दररोज योगा करावा

-          आमदार संजय गायकवाड

  • आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

     बुलडाणा,(जिमाका) दि.21 : दररोज योगा केल्याने आरोग्य उत्तम व निरोगी राहते.  तर दुर्धर आजारांवर सुध्दा मात केल्या जाऊ शकते.  योग हा निरामय आयुष्याचा सच्चा साथीदार, योगामुळे मन व शरीर शुध्द करुन सुदृढ आयुष्य जगता येते.  तसेच योगामुळे आयुष्य सकारात्मक जगता येते. त्यामुळे दररोज योगा करावा, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी आज केले.

     जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम नाशिक, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. 21 जुन 2021 रोजी सकाळी 7.00 ते 7.45 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे ऑनलाईन 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी सर्वप्रथम आमदार संजय गायकवाड यांनी भारताचे महान ॲथलीट, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारे, 1958 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक जिंकणारे, 1960 च्या ऑलीम्पीकमध्ये 400 मी. या बाबीमध्ये अंतीम फेरीत चवथे स्थान प्राप्त करणारे, पद्मश्री पुरस्काराने गौरविल्या गेलेले महान धावपटु स्व.मिल्खासिंग यांच्या प्रतीमेस हारअर्पण करुन उपस्थित सर्वांच्या वतीने सामुहीक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे,  शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी श्री.जैन, नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपुत, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक सुभाष आठवले, डॉ.राजेश्वर उबरहंडे आदी उपस्थित होते.  यावेळी उपस्थित योग शिक्षीका सौ.अंजली परांजपे यांनी योग गिताचे सादरीकरण केले तसेच योग प्रार्थना सादर केली.

तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सदर 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमासाठी प्रात्यक्षीक सौ.अंजली परांजपे, प्रशांत लहासे व सचिन खाकरे यांनी सादर केले.  या कार्यक्रमात उपस्थितांना योग पुर्व व्यायाम प्रात्यक्षीकासह तसेच प्राणायम, कपालभाती, अनुलोम विलोम, हे प्रकार करुन घेतले.  त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली.  शेवटी सौ.अंजली परांजपे यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने योग दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  सदर ऑनलाईन कार्यक्रमात बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, क्रीडा शिक्षक, खेळाडू, पालक, योगप्रेमी नागरीक या ऑनलाईन गुगल मिट लिंक, फेसबुक पेज लाईव्ह, यु ट्युब चॅनलवर कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  याप्रसंगी उपस्थितांना गणेश प्रभाकर जाधव, जुग्गत फार्मा यांचेकडून एनर्जी ड्र्रींक्सचे वाटप करण्यात आले.

सदर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे संचलन रविंद्र धारपवार,  क्रीडा अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी केले. याप्रसंगी नेहरु युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, ए.एस.पी.एम.महाविद्यालयाचे प्रा.प्रमोद ढवळे, प्रा.कैलास पवार, अन्न व औषध विभागाचे श्री.घिरके, गोविंदा खुमकर, विजय वानखेडे तसेच योगप्रेमी उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऑनलाईन तांत्रीक बाबीकरीता कैलास डुडवा, विनोद गायकवाड, किरण लहाने, अक्षय कराड, नवनाथ कारके तसेच कार्यालयातील जिल्हा संघटक गाईड सौ.मनिषा ढोके, विजय बोदडे वरिष्ठ लिपीक, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

******

 

                       कोरोना अलर्ट : प्राप्त 1001 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 18 पॉझिटिव्ह

  • 41 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.21 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1019 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1001 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 18 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 13 व रॅपीड टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 253 तर रॅपिड टेस्टमधील 748 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1001 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : दुर्गादैत्य 1, खामगांव शहर : 1, खामगांव तालुका : टेंभूर्णा 1, पिं. राजा 1, मेहकर तालुका : वरोडी 1, जळगांव जामोद तालुका : वडगांव गड 1, पळसखेड 1, धानोरा 1,  बुलडाणा शहर : 4, लोणार शहर : 1,  मलकापूर शहर : 1, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : जांभोरा 1, नांदुरा तालुका : दादगाव 1,  परजिल्हा रिसोड 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 18 रूग्ण आढळले आहे.  तसेच उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय बुलडाणा येथे पेनटाकळी ता. मेहकर येथील 90 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 41 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

   तसेच आजपर्यंत 549386 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85529 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  85529 आहे.

  आज रोजी 1152 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 549386 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86293 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85529 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 110 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 654 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

********

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

· योजनेचा लाभ घेण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 21 (जिमाका) : आदिवासी विकास विभागाकडुन अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परदेशात विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसुचीत जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडुन शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे साठी अर्ज मागविण्यात येत आहे.

    शिष्यवृत्तीसाठी राज्यातील आदिवासी विद्यार्थांना परदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणेसाठी अनुसुचित जमातीच्या एकुण 10 विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी / अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. तथापी, 10 विदयार्थांपेक्षा जास्त विदयार्थांचे अर्ज प्राप्त झाले तर विदयार्थाना त्यांनी इयत्ता 12 वी व पदवी अभ्यासक्रमात मिळविलेल्या गुणांच्याआधारे प्राधान्य देण्यात येईल. सदर शिष्यवृत्ती पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नमुद केलेल्या संख्येच्या प्रमाणात मंजुर करण्यात येईल. शिष्यवृत्तीसाठी संख्या निश्चित केली असली तरी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विदयार्थांना प्राधान्य देण्यात येईल. तथापी असे उमेदवार ज्या वेळी उपलब्ध होणार नाहीत, त्यावेळी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

     शिष्यवृत्तीस निश्चित केलेली संख्या/ क्षमता एका अभ्यासक्रमाकडुन दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी वापरली जाईल. उमेदवाराची निवड करतांना भुमीहीन आदिवासी कुटुंबातील विदयार्थी, दुर्गम भागातील विद्यार्थी तसेच आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यास या शिष्यवृत्ती साठी प्राधान्य देण्यात येईल. विदयार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्यासंबधी अधिवास प्रमाणपत्र ( नॅशनॅलीटी व डोमीसीयल सर्टिफिकेट) सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थी महाराष्ट्रातील अनुसुचित जमातीचा असावा. त्याबाबत सक्षम प्राधीकाऱ्याकडुन जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विदयार्थाने अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्ती साठी विद्यार्थीचे वय दिनांक 01/06/2021 रोजी जास्तीत जास्त 35 वर्षापर्यत असावे. तथापी नौकरी करीत असल्यास विदयार्थांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा ही 40 वर्षापर्यत राहिल. परंतु नौकरीत नसल्यास विदयार्थांस निवडीची वेळी प्राधान्य देण्यात येईल. विदयार्थांस परदेशातील मान्यताप्राप्त विदयापीठात प्रथमवर्षाकरीता प्रवेश मिळालेला असावा.

  शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विदयार्थाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा जास्तीत जास्त रुपये 6,00,000/- पर्यत राहिल. त्यासंबधी सक्षम अधिकाऱ्याचे वार्षिक उत्पनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थीने कोणत्या दिनांकास व कोणत्या विमानाने परदेशात जाणार आहे, याची माहिती आयुक्तालयास दिल्याशिवाय त्याला परदेशात जाता येणार नाही. सदर शिष्यवृत्ती आदिवासी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस ( मुलगा/मुलगी) आणि एकाच अभ्यासक्रमास अनुज्ञेय राहिल. शिष्यवृत्ती धारक विदयार्थांने निवडलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास, अभ्यासक्रमासाठी शासनामार्फत खर्च करण्यात आलेली संपुर्ण रक्कम त्यांचे कडुन वसूल करण्यात येईल. तसेच सदर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर भारतात परत येणे किंवा किमान 5 वर्ष भारतात सेवा करणे बंधनकारक राहिल या अटी मान्य असल्यासंबधी विदयार्थाने लेखी हमीपत्र (बॉण्ड) दोन जामीनदारासह सादर करावे लागेल. परदेशात अभ्यासक्रमासाठी एकदा निश्चित केलेला कालावधी वाढवता येणार नाही अथवा शिष्यवृत्तीस मंजुरी घेते वेळी जो अभ्यासक्रम निवडला आहे त्यात बदल करता येणार नाही. विदयार्थाने निवडलेला अभ्यासक्रम व त्याचा कालावधी अर्जात स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम संपल्यानंतर संबधीत विदयार्थांने त्वरीत भारतात येवुन त्याचे अंतिम परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर करणे आवश्यक राहील.

   याशिवाय सध्या करीत असलेल्या व्यवसायाची माहिती दयावी. नौकरीत असलेल्या विदयार्थास या शिष्यवृत्तीसाठी सादर करावयाचा अर्ज त्याच्या नियोक्तया मार्फत सादर करणे बंधनकारक राहिल. परदेशात ज्या विदयापीठात विदयार्थांस प्रवेश मिळाला आहे, त्या विदयापीठास व संस्थेस ऑनलाईन प्रणाली नुसार डायरेक्ट खात्यावर टयुशन फि जमा करण्यात येईल. तथापि, विदयार्थ्यास निर्वाह भत्ता त्याचे खात्यावर जमा करण्यात येईल. शिष्यवृत्ती साठी निवड झालेल्या विदयार्थ्यांस , परदेशातील निवास हा अभ्यासक्रमाचा कालावधी पलीकडे कोणत्याही परिस्थितीत वाढविता येणार नाही. संबधीत विदयार्थ्याने अगोदरच्या वर्षाचे गुणपत्रक , विदयापिठ फी व निवास फी अदा केल्याबाबत प्रमाणित प्रत दिल्यानंतरच पुढिल वर्षाची शिष्यवृत्ती आयुक्त, आदिवासी विकास हे मंजुर करतील. अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यावर परदेशातील वास्तव्यासाठी कोणताही पत्रव्यवहार आयुक्तालयामार्फत केला जाणार नाही अथवा त्यासाठी कोणताही जादा निधी मंजुर केला जाणार नाही. परदेशातील ज्या अभ्यासक्रमासाठी विदयार्थ्याची निवड झालेली आहे त्या देशाचे पारपत्र (व्हिजा) प्राप्त करण्याची जबाबदारी संबधीत विदयार्थ्याची राहिल. यासाठी राज्य अथवा केंद्रशासनाचे अर्थसहाय्य मंजुर होणार नाही.

   ज्या अभ्यासक्रमासाठी विदयार्थी प्रवेश घेणार आहे. त्याच अभ्यासक्रमासाठी फी अनुज्ञेय राहिल, इतर कोणत्याही अनुषंगीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश व फी अनुज्ञेय राहणार नाही. शिष्यवृत्तीसाठी विदयार्थ्याने अर्जासोबत चुकिची माहिती अथवा खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास अशा विदयार्थ्याकडून शिष्यवृत्ती पोटी शासनाने केलेला संपुर्ण खर्च

शेकडा 15 टक्के व्याजासह वसूल करण्यात येईल. तसेच सदर विदयार्थ्याचे नाव काळया यादीत टाकण्यात येईल. परदेशी विदयापिठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी GRE(Graduate Record Examination) तसेच TOFEL ( Test of English as a Foreign Language) / IELTS (International English Language Testing System) या प्रवेश परिक्षा घेतल्या जातात. सदर GRE च्या आधारावर प्रवेश घेणा-या व TOFEL/ IELTS उत्तीर्ण असणा-या विदयार्थ्यांचा विशेष विचार करण्यात येईल. ज्या परदेशी विदयापिठाचे जागतिक रँकिंग (Latest QS World Raking) 300 पर्यंत आहे अशाच

विदयापिठात प्रवेश मिळालेले विदयार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. मात्र निवड मेरिटनुसारच होईल. विदयार्थ्यास शिक्षण फी, परिक्षा फी,निर्वाह भत्ता(निवास व भोजन) शैक्षणिक कॉन्टेजन्सी चार्जेस हे लाभ देण्यात येतील.

   विमान प्रवास , विजा फी , स्थानिक प्रवास भत्ता, विमा, संगणक, लॅपटॉप व आयपॅड व इतर सुविधांचा खर्च विदयार्थ्यास

स्व खर्चाने करावा लागेल. परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे त्या विदयापिठाचे पत्र व संबधित विदयापिठाचे प्रॉस्पेक्टस ची प्रत अभ्यास क्रमासाठी शैक्षणिक शुल्कासह येणा-या एकुण खर्चाचे संस्थेचे प्रमाणपत्र परदेशात ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे. त्या अभ्यासक्रमाशी संबधीत असलेल्या शाखेतील /विभागातील शिफारस पत्र (Reference) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी विहित नमुन्यातील आवेदन पत्र (अर्ज) प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयात कार्यालयीत वेळेत विनामुल्य उपलब्ध आहे.

  शिष्यवृत्ती लाभ घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी वर नमुद कार्यालयातून विहित नमुन्यात शिष्यवृत्तीसाठी नमुना अर्ज प्राप्त करून परिपुर्ण माहिती भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतींसह अर्ज अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात दिनांक 30 जून 2021 पर्यंत सादर करावा. यानंतर सादर करण्यात आलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही, असे प्रकल्प अधिकारी, यांनी कळविले आहे.

अभ्यासक्रमाचे नाव, स्तर व एकूण संख्या

एमबीए : पदव्युत्तर स्तरासाठी पदव्युत्तर 2 विद्यार्थी, वैद्यकीय अभ्यासक्रम : पदवीसाठी एक व पदव्युत्तरसाठी एक असे 2

विद्यार्थी, बीटेक (अभियांत्रिकी) : पदवी स्तराकरीता एक व पदव्युत्तर स्तरासाठी एक असे दोन विद्यार्थी, विज्ञान : पदव्युत्तर

स्तर 1 विद्यार्थी, कृषि : पदव्युत्तर स्तर 1 विद्यार्थी, कृषी : पदव्युत्तर स्तरासाठी एक विद्यार्थी, इतर विषय : पदव्युत्तर स्तराकरीता दोन विद्यार्थ्यांना अशाप्रकारे 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

***********

No comments:

Post a Comment