जिल्हा तिसऱ्या श्रेणीत : 28 जूनपासून निर्बंध लागू *किराणा, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्व नोंदणी पद्धतीने 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील बिगर जीवनावश्यक सेवांची दुकाने शनिवार व रविवारी बंद असतील बुलडाणा, (जिमाका) दि. २६ : राज्य शासनाने कोविड 19 च्या अनुषंगाने डेल्टा प्लस व्हेरिएंट चा धोका वाढल्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याबाबत आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध सोमवार, 28 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजे पासून पुढील आदेशापर्यांत लागू करण्यात आले आहे. असे प्रतिबंधात्मक आदेश आज जिल्हा दंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी पारित केले आहे. या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, खाद्य पेय विक्री दुकाने, पिठाची गिरणी, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन, मटन, पॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) आदी दुकाने, ५० टक्के आसन क्षमतेसह शिव भोजन केंद्र दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी) दुकाने, दुध संकलन केंद्रे , दूध वितरण सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहतील. सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. ही दुकाने शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्णतः बंद राहतील. हॉटेल्स, रेस्टॉरंट व खानावळ 50 टक्के आसन क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार तसेच अन्य दिवशी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ घरपोच सेवेला परवानगी राहील. सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदान, फिरणे व सायकलिंग साठी सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत परवानगी असेल. सर्व प्रकारची खाजगी कार्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये नियमितपणे सुरू राहतील. दररोज सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत खेळांना परवानगी असेल. सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने व ५० टक्के आसन क्षमतेसह घेण्यास परवानगी असेल. असे कार्यक्रम शनिवार व रविवार बंद असतील. सर्व केशकर्तनालये, सलुन,स्पा,ब्युटी पार्लर एकूण क्षमतेच्या ५० टक्के पूर्व नोंदणीसह दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. वातानुकूलित सेवेस परवानगी नाही. लग्न समारंभ बँड पथक, कॅटरिंग आदींसह पूर्व परवानगीने कोविड नियमांचे पालन करून ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अंत्यसंस्काराला २० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल.सभा, बैठका आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीमध्ये घेता येतील.बांधकामावर जर बाहेरून मजूर असतील तर दुपारी ४ वाजेपर्यंत करता येतील. ई कॉमर्स व वस्तू सेवा नियमितपणे सुरू राहतील. सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहील, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील. जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या परवानगीसह मालवाहतूक नियमितपणे सुरू राहील. आंतर जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवाशी वाहतूक सुरू राहील. मात्र स्तर ५ मधील जिल्ह्यात जाणे येणे होत असल्यास ई पास आवश्यक राहील. सर्व खाजगी व सार्वजानिक वैदयकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा २४ तास सुरु राहतील. सर्व प्रकारचे सहकारी संस्था, खाजगी व शासकीय बँका, विमा व वैद्यकीय सेवा कंपन्या, नॉन बँकिंग वित्तीय संस्था सुरू राहतील. वीज व गॅस पुरवठा सेवा , एटीएम आणि डाक सेवा, कोल्ड स्टोरेज आणि वखार सेवा आदी नियमित सुरु राहतील.जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील. तसेच सायंकाळी ५ नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. सदर कालावधीत नागरिकांना मुक्त संचार करण्यास मनाई राहील. सर्व नागरिक, आस्थापना, दुकाने यांनी मास्क असणे, हात सॅनीटाईज करणे आणि सामाजिक अंतर राखणे या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करावे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद आहे. ********
कोरोना अलर्ट : प्राप्त २७६५ कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर ३१ पॉझिटिव्ह • ५१ रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.२६ : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २७९६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २७६५ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३१ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २१ व रॅपीड टेस्टमधील १० अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४११ तर रॅपिड टेस्टमधील २३५४ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २७६५ अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : २, चिखली शहर : २, चिखली तालुका : पेठ १, इसरूळ १, बेराळा १, सवना २, नांदुरा शहर : ८, नांदुरा तालुका : खेडगाव १, मोताळा तालुका : पुन्हई १, संग्रामपूर तालुका : कोलद १, खामगांव शहर : १, दे. राजा तालुका : भिवगण १, पोखरी १, जळगांव जामोद शहर : १, मेहकर शहर : ५, मेहकर तालुका : गांगलगाव १, परजिल्हा रस्ताळा ता. जाफ्राबाद १ संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ३१ रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे कोलवड ता. बुलडाणा येथील ५९ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ५१ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत ५६३८५१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८५७६७ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ८५७६७ आहे. आज रोजी १३३८ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५६३८५१ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६५१५ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८५७६७ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ८९ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 659 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. |
***** राजर्षी शाहू महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन बुलडाणा,(जिमाका) दि.२६ : सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांना आज त्यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले . निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. |
Saturday, 26 June 2021
DIO BULDANA NEWS 26.5.2021
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment