कोरोना अलर्ट : प्राप्त 3763 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 53 पॉझिटिव्ह
- 112 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.11 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3816 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3763 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 28 व रॅपीड टेस्टमधील 25 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 503 तर रॅपिड टेस्टमधील 3260 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3763 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :5, बुलडाणा तालुका : अजिसपूर 2, तराडखेड 1, कोलवड 1, पाडळी 1, रायपूर 2, मलकापूर शहर :5 , मलकापूर तालुका : आळंद 2, मोताळा तालुका : पिंप्री गवळी 1, सिं. राजा शहर : 1, सिं. राजा तालुका : भंडारी 2, दे. राजा शहर : 1, दे. राजा तालुका : जांभोरा 1, खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : कुंबेफळ 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : कोलारा 1, शेगांव तालुका : डोंगरगाव 1, मेहकर तालुका : मोहतखेड 1, हिवरखेड 2, खळेगांव 1, घाटबोरी 1, मोसंबेवाडी 1, शेलगाव काकडे 1, जळगांव जामोद तालुका : पिं. काळे 2, मानेगांव 2, दादगांव 1, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : निमगांव 1, लोणार तालुका : सुलतानपूर 2, सावरगांव मुंढे 3 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 53 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान तळणी ता. मोताळा येथील 82 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 112 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 522146 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84831 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 84831 आहे.
आज रोजी 1724 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 522146 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85878 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84831 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 406 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 641 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*************
दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रूग्णसंख्या गृहीत धरून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
· कोविड संसर्ग नियंत्रण बैठक
बुलडाणा,(जिमाका) दि.11 : दुसऱ्या लाटेमधील रूग्णसंख्या ओसरू लागली आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासन, प्रशासनाने काटेकोर नियोजन करीत प्रयत्न केले. मात्र ही परिस्थिती सध्या पुढील काळात जेव्हा लाट येईल किंवा रूग्णसंख्या वाढेल त्यावेळेस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयारी म्हणून उपयोगात आणावी. दुसऱ्या लाटेतील सर्वोच्च रूग्णसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त रूग्णसंख्या गृहीत धरून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. त्या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, सहा. आयुक्त श्री. बर्डे आदी उपस्थित होते.
भविष्यात कोविड रूग्णांची 10 हजार संख्या लक्षात घेता नियोजन करण्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, त्यानुसार ऑक्सिजन बेड, नॉन ऑक्सिजन बेड, व्हेन्टींलेटर, ऑक्सिजन निर्मिती साठा व पुरवठा, जिल्ह्यातील ऑक्सिजन लिक्वीड टँक, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन, औषधांचा साठा आदींची व्यवस्था करण्यासाठी आतापासून कामाला लागावे. आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सोयी सुविधा बळकट कराव्यात. पीएसए प्लँटसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील जुन्या कोविड केअर सेंटर किंवा तालुक्यातील मोठे गाव असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आदींमध्ये ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था करावी. तिसरी लाट गृहीत धरून बाल रोग तज्ज्ञांची सेवा अधिग्रहीत करून ठेवावी. बाल रोग वार्ड तयार करून त्यामध्ये ऑक्सिजनची सुविधा तयार करून ठेवावी.
म्युकर मायकोसिस रूग्णांचा उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या आजारावरील महागडी औषधांचा समावेशही महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यंत्रणांनी समन्वय ठेवत कोविड पश्चात उपचार पद्धती राबवावी. कोविड होवून गेलेल्या रूग्णांशी संवाद साधून अथवा त्यांना संपर्क करून तब्येतीची विचारपूस करावी. जिल्हा सामान्य रूग्णालयात पोस्ट कोविड रूग्णांसाठी वार्ड तयार करावा. पोलीस विभागाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी. नागरिक अनलॉक झाल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव संपल्यासारखे वागत आहेत. तरी नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करणे व हात सॅनीटाईज किंवा वारंवार धुणे या त्रीसुत्रीचा वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.
नविन प्रशासकीय इमारतीसाठी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली जागेची पाहणी
बुलडाणा,(जिमाका) दि.11 : जुनी प्रशासकीय इमारत व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या नवीन कार्यालय इमारतीसाठी जागेची पाहणी आज 11 जुन रोजी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी बस स्थानकासमोरील प्रशासकीय इमारतीच्या आवारात केली. यावेळी त्यांनी जागेचा नकाशा बघीतला व नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासंदर्भात माहिती घेतली. या परीसरात अन्न व औषध प्रशासन विभागाची नवीन कार्यालय इमारतीची सुद्धा चाचपणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, सहा आयुक्त श्री. बर्डे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री साहेब.. आपल्या प्रत्येक सुचनेचे पालन करून.. गाव कोरोनामुक्त ठेवणार!
· धा. बढे येथील संरपचांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद
· गाव कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची दिली माहिती
बुलडाणा,(जिमाका) दि.11 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले.. आमच्या गावातही कोरोनाने प्रवेश केला.. रूग्णसंख्या वाढली.. साहेब आपण लॉकडाऊनचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आमच्या ग्रामपंचायतीने कोटेकोर पालन करीत स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या सुचनांने पालन केले. आपल्या या निर्णयामुळे कोरोना रूग्णसंख्या कमी झाली. मुख्यमंत्री साहेब.. यापुढेही आपल्या प्रत्येक सुचनेचे पालन करून माझी ग्रामपंचायत धा. बढे गाव कोरोनामुक्त ठेवणार आहे, असा संकल्पच आज मोताळा तालुक्यातील धा. बढे येथील सरपंच जिनत प्रविन शेख अलीम कुरेशी यांनी घेतला. प्रसंग होता मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांच्या ऑनलाईन सरपंच संवादाचे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अमरावती, नागपूर व औरंगाबाद विभागातील सरपंचांशी ऑनलाईन आभासी पद्धतीने कोरोना परिस्थिती व कोरोनामुक्त गाव विषयावर संवाद साधला. या संवादासाठी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धा. बढे येथील सरपंच यांची निवड झाली. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी कोरोना परिस्थिती, कोरोनामुक्त गाव ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेले प्रयत्न, लसीकरणाची स्थिती, लसीकरणासाठी केलेले प्रयत्न, कोरोना संसर्ग न होण्यासाठी नियमांचे पालन, विलगीकरण कक्ष, औषध पुरवठा आदींविषयी संवाद साधला. कोरोना मुक्तीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
सरपंच जिनत प्रविन शेख अलीम कुरेशी यावेळी संवाद साधताना म्हणाल्या, मी माझे गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावात दक्षता समिती सक्रीय केली. ती गावच्या सीमेवर तैनात ठेवून बाहेरून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले. गावात बाहेरून आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण केले व कोरोना तपासणी करूनच गावात प्रवेश दिला. त्यासाठी गावात लोकवर्गणीतून सुसज्ज आयसोलेशन केंद्र उभारण्यात आले. या ठिकाणी औषधोपचाराची व्यवस्था केली. या केंद्रावर ग्रामपंचायत सदस्यांच्यासुद्धा ड्युट्या लावल्या. धा. बढे हे परीसरातील मोठे गाव व खेडी जोडलेले गाव असल्यामुळे गावातील आठवडी बाजार संपूर्ण बंद केला. कोरोना संसर्ग नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत गाव पिंजून काढत नागरिकांना कोरोना विषयी जनजागृती केली. या मोहिमेत थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. गावात सायंकाळी तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासमवेत लोकांच्या मनात जनजागृती केली. अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचा प्रयत्न केला. दिव्यांग, बेरोजगार नागरिकांना मोफत अन्न धान्याचे वाटप गावात केले. घरोघरी सॅनीटायझर, मास्क व रोग प्रतिकारक शक्तीवर्धक औषधांचे वाटप करण्यात आले. गावात रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त संकलन केले.
सरपंच जिनत प्रविन शेख अलीम कुरेशी यांनी शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संवाद साधल्याबद्दल आभार व्यक्त केले. याप्रसंगी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, घाटबोरीचे सरपंच गजानन श्रीराम चनेवार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment