Tuesday, 22 June 2021

DIO BULDANA NEWS 22.6.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 2710 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 40 पॉझिटिव्ह

• 49 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2754 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2710 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 40 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 25 व रॅपीड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 648 तर रॅपिड टेस्टमधील 2062 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2710 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : येळगांव 1, देऊळघाट 1, रस्ताळा 1, चिखली शहर : 1, चिखली तालुका : गांगलगांव 1, मुंगसरी 1, दे. घुबे 1, मालगणी 2, दे. राजा शहर : 3, दे. राजा तालुका : उंबरखेड 1, भिवगण 1, सिं. राजा तालुका : भंडारी 1, दत्तापूर 2, नागझरी 1, खामगांव शहर : 3, संग्रामपूर तालुका : कोलद 1, शेगांव तालुका : हिंगणा 1, नांदुरा तालुका : दोंडगाव 3, जिगांव 2, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, लोणार तालुका : दाभा 1, खुरमपूर 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : उकळी 2, मलकापूर तालुका : घिर्णी 1, उमाळी 2, परजिल्हा जाफ्राबाद जि. जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 40 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान किनगाव जट्टू ता. लोणार येथील 48 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 49 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 552096 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85578 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85578 आहे.
आज रोजी 997 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 552096 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86333 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85578 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 100 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 655 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******

इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी

कामगारांनी नोंदणी करावी
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. लगतच्या 12 महिन्यात बांधकाम मजूर म्हणून किमान 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केलेल्या बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करण्यात येवून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ डीबीटी पध्दतीने खात्यात जमा करण्यात येतो.

तसेच जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना नोंदणी व नुतणीकरणाची पावती व स्मार्ट कार्ड प्राप्त करण्याकरिता कार्यालयाद्वारे एसएमएस अथवा फोन द्वारे कळविण्यात येणार आहे. नंतर कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले स्मार्ट कार्ड अथवा नुतणीकरण पावती प्राप्त करुन घ्यावी, कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता विनाकारण कार्यालयात कामगारांनी गर्दी करु नये. तसेच सोमवार रोजी कार्यालयात बांधकाम कामगारांची गर्दीमुळे सर्व कामगारांचे कामकाज करणे शक्य नाही. यामुळे विविध ठिकाणाहून आलेल्या कामगारांना आर्थिक, मानसिक होणारा नाहक त्रास टाळण्याकरीता कार्यालयाद्वारे एसएमएस अथवा फोनद्वारे कळविल्या शिवाय पावती अथवा स्मार्ट कार्ड घेण्याकरीता येवू नये.

तालुकानिहाय कार्यालयात येवून स्मार्ट कार्ड अथवा पावती प्राप्त करण्याची कार्यपध्दतीत वरील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*******

प्रादेशिक लोकसंपर्क विभागाच्या
सहकार्याने 100 दिवसांची मॅरेथोन योग कार्यशाळा मालिका यशस्वी
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : माहिती आणि प्रसारण ,मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो (आरओबी) आणि पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने संयुक्तपणे आपल्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ‘सामान्य योगाभ्यास नियम’ अंतर्गत थेट योगाभ्यास सत्रे घेण्यास सुरुवात केली आहे. सलग 100 दिवस चालणारी ही सत्रे 13 मार्च 2021 पासून दररोज सकाळी सात ते आठ या वेळेत ऑनलाईन प्रसारित केली जात असून, आंतरराष्ट्रीय योगदिनापर्यंत ही सत्रे सुरु होती. या सत्रांची संकल्पना ‘कल्याणासाठी योग’ अशी आहे.

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालक प्रा. के सत्यालक्ष्मी यांनी या सत्रांविषयी माहिती देतांना सांगितले की, सध्या कोविड महामारीच्या संकटकाळात ही संकल्पना अत्यंत चपखल आहे . “सध्या लोकांना आलेला तणाव, अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी ही सत्रे अत्यंत प्रभावी स्वयं व्यवस्थापन शिकवणारी ठरली, कोविडच्या या आव्हानात्मक काळात लोकांचे कल्याण साधण्यासाठी या सत्रांचा मोठा लाभ झाला.या उपक्रमाचे उद्दिष्ट लोकांना योगाभ्यासाविषयक सर्वसामान्य नियमांची ओळख करुन देणे हेही होते.” असेही त्या म्हणाल्या. ही ऑनलाईन सत्रे आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या सामान्य योगाभ्यास कार्यक्रमानुसार तयार करण्यात आली आहे. ‘सामान्य योगाभ्यास’ म्हणजे 45 मिनिटांच्या एका सत्रात सर्वसामान्यांना करता येणारी दैनंदिन आसने आणि प्राणायामाचा निश्चित कार्यक्रम आहे.

ही लाईव्ह योगसत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून घेतली गेली आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो च्या (महाराष्ट्र आणि गोवा) तसेच एनआयएन पुणे यांच्या सोशल मिडीया पेजेसवरुन ती थेट दाखवण्यात आली. ही सर्व सत्रे खालील लिंकवर उपलब्ध आहेत. https://www.youtube.com/c/MAHAROB/videos
आरओबी तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले. “कोविड महामारीमुळे घालण्यात आलेली बंधने लक्षात घेता, हा उपक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश, लोकांना ऑनलाईन स्वरूपात योगाभ्यास प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा होता. यंदा आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त केंद्र सरकारची संकल्पना, “योगासह रहा, घरीच रहा’ अशी असून हा उपक्रम त्या संकल्पनेशी सुसंगतचा ठरला, असेही त्यांनी सांगितले.

******

जिल्ह्यामध्ये आजपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरु

बुलडाणा, (जिमाका)दि.22 : जिल्ह्यामध्ये आज 22 जून 2021 पासून कोविड ची 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर लसीकरण मोहीमेस आज 5 आरोग्य संस्थांमधून सुरुवात करण्यात आली आहे.

यामध्ये जिल्हा रुग्णालय बुलडाणा, ग्रामीण रुग्णालय जळगांव जामोद, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराखेडी ता. मोताळा, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड ता. नांदुरा, प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा ता. दे.राजा आदींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लवकरच सदर लसीकरण मोहीम कार्यान्वित होईल, असे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ गोफणे यांनी कळविले आहे.

******

अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
कोलवड येथील शाळा
बुलडाणा, (जिमाका)दि.22 : तालुक्यातील कोलवड येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. शाळेमध्ये वर्ग 6 ते 10 च्या रिक्त जागेसाठी मोफत प्रवेश सुरू झालेले आहेत. सदर शाळा ही शासकीय असून समाज कल्याण विभागा अंतर्गत संचालीत आहे. या शाळेमध्ये मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, पुस्तके यासोबत संगणक शिक्षण, क्रीडा साहित्य, डिजीटल ग्रंथालय, डिजीटल वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, निसर्गरम्य स्वच्छ व सुंदर परिसर आदी सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी अनु जाती 80 टक्के, अनु जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के व एसबीसी 2 टक्के याप्रमाणे आरक्षण आहे. तरी इच्छूकांनी त्वरित कार्यालयीन वेळेत शाळेत संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक नागसेन वाकोडे यांनी केले आहे.

***********

No comments:

Post a Comment