DIO BULDANA NEWS 31.5.2021

प्रतिकूल परिस्थितीतही रेशीम शेतीतून आणली समृद्धी • कल्याणा ता. मेहकर येथील 11 शेतकऱ्यांनी मिळून केली रेशीम शेती बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : सगळीकडे कोरोनाची दहशत असताना शेतकरी राजा मात्र काळ्या मातीत राब राब राबत होता. कृषी क्षेत्र गतीमान ठेवून अर्थचक्र फिरवित होता. यामध्ये जिल्ह्यातील शेतकरीही मागे नव्हता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतीतून समृद्धी आणण्याचा प्रयत्न बळीराजाचा सुरूच होता. जिल्ह्यातही याचे उदाहरणे समोर आली. मेहकर तालुक्यातील कल्याणा येथील 11 शेतकऱ्यांनी एकत्र येत रेशीम शेती केली. त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतून रेशीम शेतीतून समृद्धी आणली आहे. रेशीम शेती मधील किटक संगोपनाची कामे साधारणतः उन्हाळ्यात बंद असतात. परंतु या वर्षी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा कल्याणा ता. मेहकर येथील 11 शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत रेशीम कीटक संगोपन घेतले. तसेच यशस्वीपणे पुर्ण केले. अंदाजे 650 ते 700 किलो ग्रॅम कोष उत्पादन त्यांना होणार आहे. सध्या रु.280 ते 310 प्रति किलोग्रॅम भाव कोषबाजारात आहे. या उत्पादनातून सदर शेतकऱ्यांना अंदाजे रु 1.5 ते 2 लक्ष रूपयांचे उत्पन्न निश्चितच मिळणार आहे. अवघ्या 18 दिवसात त्यांनी कोषाचे संगोपन पूर्ण केले आहे. तुती लागवड करून तुती पानांचा रेशीम कीटकांना खाद्य म्हणून उपयोग केला जातो. त्यापासून रेशीम कोष निर्मिती होते. असे कोष जालना, पूर्णा, पाचोड व इतर कोष खरेदी करणारे व्यापारी यांना विक्री केली जाते. सन 2020-21 मध्ये कल्याणा येथील युवा शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबविण्याचे ठरविले. या 11 लाभार्थ्यांनी रेशीम अधिकारी कार्यालयात नोंदणी केली. उद्योगाची परिपूर्ण माहिती घेतली. माहे जून 2020 मध्ये तुती लागवड रोपांद्वारे करून नोव्हेंबर 2020 मध्ये रेशीम कीटक संगोपन गृह बांधकाम केले. मनरेगा अंतर्गत कामा नुसार यथायोग्य मजुरी व तुती लागवडीच्या रोपांची रक्कम मिळाली. पहिले पीक हिवाळ्यात घेतले, परंतु पहिले पीक, त्यात ऋतुमानानुसार येणाऱ्या अडचणींमुळे सरासरी उत्पन्न मिळाले. परंतु इतक्यावरच समाधान न मानता उन्हाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीत रेशीम कीटक संगोपन घेण्याचे त्यांनी ठरविले. साधारणतः उन्हाळ्यात 40-43 डीग्री से.ग्रे तापमानात रेशीम किटक संगोपन घेतले जात नाही. परंतु तापमान कमी करण्याच्या सर्व उपाययोजना करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यासाठी संगोपन गृहाच्या नेटला पोते बांधून ड्रीपच्या पाईप ने पाणी सोडण्याची व्यवस्था केली. त्यासाठी गणेश उर्फ राजू नरहरी ठाकरे यांनी संगोपन गृहाशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडावर सिंटेक्स टाकी चढवली व त्यातून ठिबक च्या पाईप द्वारे पाणी पोत्यांवर सोडले. पूर्ण संगोपन होई पर्यंत 30 ते 33 से ग्रे तापमान कायम राखले. बुलडाणा येथील जगदीश गुळवे यांचे कडून बाल किटक (चॉकी म्हणजे दोन अवस्था पूर्ण झालेले रेशीम कीटक) घेतले. त्यानंतर प्रौढ किटक संगोपन 15 ते 20 दिवसांचे ऐन उन्हाळ्यात सुरू केले. वेळोवेळी रेशीम कार्यालयाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. सर्वांनी अतिशय मेहनतीने, जिद्द व चिकाटीने किटक संगोपन पूर्ण केले. सर्वांचे रेशीम कोष तयार झाले असून कोष विक्री साठी 15 दिवसात तयार झाले आहेत. उन्हाळ्यात कोष उत्पादन कमी होत असल्याने रेशीम कोषाचे दर वधारले आहेत. त्याचा फायदा नक्कीच या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना होईल. अंदाजे 650 ते 700 कि ग्रॅम कोष उत्पादन झाले आहे. सध्या 280 ते 310 रु प्रति कि.ग्रॅम दर असून त्यांना 1.5 लक्ष ते 2 लक्ष रूपये उत्पन्न 15 दिवसांच्या मेहनतीने त्यांना नक्कीच मिळणार आहे. या यशस्वी संगोपनाची श्रेय ते महेंद्र ढवळे, सहायक संचालक, विभागीय कार्यालय, अमरावती यांना देतात. तसेच मनरेगा अंतर्गत वेळोवेळी सहकार्य केल्याबाबत डॉ गरकल, तहसीलदार, मेहकर आणि करोना काळातही प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट देउन मार्गदर्शन केल्या बद्दल सु.प्र. फडके, रेशीम विकास अधिकारी यांना देतात. ************ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच उपस्थित नायब तहसिलदार श्री. पाटील यांनी पुष्प अर्पण केले. तसेच उपस्थितांनी पुष्प अर्पण करीत अभिवादन केले. ******* पाणी टंचाई निवारणार्थ पिंपळखुटा खु गावासाठी टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि.31 : मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा खु येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. येथील 507 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर गावाला दररोज 19 हजार 480 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) बुलडाणा यांनी कळविले आहे. ***** पाणी टंचाई निवारणार्थ 20 विंधन विहीरी • 18 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना बुलडाणा, दि.31 (जिमाका) : पाणीटंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील 14, लोणार तालुक्यातील 4 गावांसाठी 20 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. एकूण 20 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे. विंधन विहीरी मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख, हिवरा खु, पिंपळगांव उंडा, माळेगांव, वर्दडा, पेनटाकळी, अंबाशी, मोहखेड, पारखेड, उटी, नायगांव देशमुख, शेंदला, लव्हाळा, चिंचाळा, लोणार तालुक्यातील शिवणी पिसा, नांद्रा, सुलतानपूर व गोवर्धननगर या गावांसाठी मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. ***** कोरोना अलर्ट : प्राप्त 2281 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 113 पॉझिटिव्ह • 901 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका) दि.31 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2394 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2281 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 113 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड टेस्टमधील 42 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1080 तर रॅपिड टेस्टमधील 1201 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2281 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका : सागवन 1, केसापूर 1, भादोला 1, येळगांव 1, मोताळा तालुका : पुन्हई 1, तळणी 1, अंत्री 1, खामगांव शहर :5, खामगांव तालुका : हिवरा 2, टाकळी 1, जयपूर लांडे 1, जनुना 1, शिर्ला 3, नागापूर 9, निळेगांव 1, शेगांव शहर : 5, शेगांव तालुका : भास्तन 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : सोमठाणा 2, रोहडा 2, शेलगांव आटोळ 2, खैरव 1, गांगलगांव 2, कव्हळा 1, मुरादपूर 2, मलकापूर शहर :1 , मलकापूर तालुका : भाडगणी 1, उमाळी 1, दे. राजा शहर : 2 , दे. राजा तालुका : बोराखेडी 1, खल्याळ गव्हाण 1, संग्रामपूर तालुका : काकनवाडा 2, अकोली 4, निरोड 1, सिं. राजा शहर :1, सिं. राजा तालुका : चांगेफळ 1, सुलजगांव 1, असोला 2, ताडशिवणी 2, लिंगा 1, मेहकर शहर :5, मेहकर तालुका : घाटबोरी 3, जळगांव जामोद तालुका : उसरा 1, काजेगांव 1, सुनगांव 1, नांदुरा शहर :1, नांदुरा तालुका : नायगांव 1, तांदुळवाडी 2, वळती 1, लोणार शहर :2 , लोणार तालुका : दे. कोळ 2, परजिल्हा भोकरदन 1, तेल्हारा 1, बाळापूर 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 113 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान इसोली ता. चिखली येथील 75 वर्षीय महिला, चिखली येथील 55 वर्षीय महिला, सुटाळा ता. खामगांव येथील 28 वर्षीय पुरूष, जिगांव ता. नांदुरा येथील 75 वर्षीय महिला, मेहकर येथील 75 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 901 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 480996 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 82343 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 82343 आहे. आज रोजी 364 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 480996 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 84778 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 82343 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1829 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 606 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या