Sunday, 9 May 2021
DIO BULDANA NEWS 9.5.2021,2
*जिल्ह्यात २० मे पर्यंत निर्बंध आणखी कडक; १० मे रोजी रात्री ८ पासून लागू*
बुलडाणा, (जिमाका) दि. 9: जिल्ह्यातील वाढती कोरोना बधीतांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहे. जिल्ह्यात 10 मे 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 20 मे रोजी रात्री 8 वाजेपर्यंत जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी कडक निर्बंध असलेले आदेश परित केले आहे.
या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैदयकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पुर्णत: बंदी राहील. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी,मिठाई दुकाने, पिठाची गिरणी तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन,मटन,पॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने), सर्व प्रकारची मद्य गृहे, मद्य दुकाने व बार पुर्णपणे बंद राहतील, तथापी सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. याबाबतचे नियोजन शहरी भागात संबधीत मुख्यधिकारी नगर पालिका तसेच ग्रामीण भागात संबधीत गटविकास अधिकारी व संबधीत ग्रामसेवक हे त्यांचे स्तरावरून करतील.
हॉटेल, रेस्टारंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 10 ते सकाळी 11 व रात्री 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास हॉटेल, रेस्टारंट, खानावळ, शिवभोजन थाळी येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक
आढळुन आल्यास संबंधीत आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानीक स्वराज्य संस्था/स्थानीक पोलीस स्टेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन यांची राहील. उक्त कालावधीत जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील, याबाबतची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा,संबधीत तहसिलदार व संबधीत मुख्याधिकारी नगर पालिका यांची राहील. पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थासाठी संबंधीत असणा-या साहीत्यांच्या उत्पादनांच्या निगडित दुकाने पुर्णपणे बंद राहतील. तथापी सदर दुकानांची फक्त घरपोच सेवा सकाळी 7 ते सकाळी 11 या कालावधीत चालु ठेवणेस परवानगी राहील. कृषी अवजारे,कृषी सेवा केंद्र व शेतातील उत्पादनाशी संबधीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील तथापी शेतक-यांना आवश्यक त्या वस्तुंचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधीत कृषी सेवक व तालुका स्तरावर संबधीत कृषी अधिकारी यांची राहील.
जिल्हयात सदर प्रक्रीयेचे नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांची राहील. सार्वजानिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा,उदयाने,बगीचे पुर्णत: बंद राहील. तसेच सार्वजानिक ठिकाणी मॉर्निंग वॉक व इवेनिंग वॉक करण्यास बंदी राहील. याबाबत संबधीत नगरपालिका तसेच पोलीस विभाग यांनी आवश्यक तपासणी करुन संबधीतांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. सर्व केशकर्तनालये,सलुन,स्पा,ब्युटी पार्लर संपुर्णत: बंद राहील. शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था,प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णत: बंद राहतील तथापी ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी सबंधीत शिक्षणाधिकारी (प्राथमीक/माध्यमीक) यांची राहील. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल हे पुर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पध्दतीने घरगुती स्वरुपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणुक, जेवणावळी,बँड पथक यांना परवानगी राहणार नाही. लग्न समारंभाकरीता केवळ 25 व्यक्तींना उपस्थितीत राहण्याची परवानगी असेल व सदरचा लग्न सोहळा 2 तासापेक्षा जास्त चालणार नाही याची दक्षता घ्यावी.
विवाह सोहळा बेकायदेशीररित्या पार पडणार नाही याची दक्षता शहरी भागात संबधीत मुख्यधिकारी नगर पालिका तसेच ग्रामीण भागात संबधीत गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी घ्यावी व नियमानुसार त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. लग्न समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण संबधीत स्थानीक स्वराज्य संस्था,पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची राहील. सर्व चित्रपटगृहे,व्यायामशाळा,जलतरण तलाव,करमणुक व्यवसाय नाटयगृहे, कलाकेंद्र,प्रेषक गृहे, सभागृहे संपुर्णत: बंद राहील. सर्व खाजगी व सार्वजानिक वैदयकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहतील. चष्म्याची दुकाने बंद राहतील, परंतु आपत्कालीन परिस्थीतीमध्ये रुग्णास डोळयांच्या डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्यास जोडण्यात आलेल्या चष्मा दुकानातुन चष्मा उपलब्ध करुन दयावा. शहरातील/नागरी भागातील व हायवेवरील सर्व पेट्रोलपंप हे सामान्य नागरीकांसाठी बंद राहतील. तथापी सर्व पेट्रोलपंपावर या आदेशान्वये नमुद करण्यात आलेल्या, परवानगी दिलेल्या बाबींकरीताच पेट्रोल/डिझेल वितरीत करण्यात यावे. मालवाहतुक, रुग्णवाहीका,शासकीय वाहने,अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने,प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचे करीता पेट्रोल, डिझेल याची उपलब्धता करुन देण्याबाबतची जबाबदारी पेट्रोलपंप कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांची राहील. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांनी याबाबतचा दैनंदिन अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी बुलडाणा येथे सादर करावा.
गॅस एजन्सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत करण्यात यावे. परंतु ग्राहकांनी गॅस एजन्सी मध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलेंडर घेण्यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळुन आल्यास संबधीत एजन्सी कारवाईस पात्र राहील. सदर पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. सर्व शासकीय, निमशासकीय,खाजगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील. वित्त व्यवसायाशी निगडीत सर्व कार्यालये यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना आपले कामकाज सुरु ठेवायचे असल्यास ते केवळ ऑनलाईन पध्दतीने सुरु ठेवता येईल आणि सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती ही ऑनलाईन नोंदवावी. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचेशी संबधीत शासकीय,निमशासकीय कार्यालये सुरु राहतील उदा. आरोग्य
सेवा,महसुल विभाग,पोलीस विभाग, ग्रामपंचायत, नगरपालिका इत्यादी
सर्व बँका,पतसंस्था,पोष्ट ऑफीसेस हि कार्यालये नागरीकांसाठी बंद राहतील. परंतु कार्यालयीन वेळेत प्रशासकीय कामकाज सुरु राहील तसेच ग्राहकांना ऑनलाईन सुविधा पुरविण्यात याव्यात. कार्यालया मध्ये येण्याजाण्याकरीता अधिकारी/कर्मचारी यांना कार्यालयाचे ओळखपत्र अनिवार्य राहील, याकरीता स्वतंत्र परवानगी प्रशासनाकडुन देण्यात येणार नाही.
सर्व आपले सरकार सेवा केंद्रे व सेतु केंद्रे नगारीकांकरीता बंद ठेवण्यात येत आहेत तथापी नागरीकांना ऑनलाईन स्वरुपात वेगवेगळया प्रमाणपत्र व सुविधांकरीता अर्ज सादर करता येतील. उक्त कालावधीत नागरीकांसाठी दस्त नोंदणीचे काम पुर्णपणे बंद राहील. MIDC, उदयोग, कारखाने, सुतगिरणी येथे केवळ in-situ पध्दतीने कामकाज सुरु राहील. याबाबत
सनियंत्रणाची जबाबदारी व्यवस्थापक,जिल्हा उदयोग केंद्र बुलडाणा यांची राहील. शासकीय यंत्रणामार्फत मान्सुन पुर्व विकास कामे आवश्यक पाणी पुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहतील. संबंधीत शासकीय यंत्रणांना या करीता वेगळया परवानगीची आवश्यकता नाही. याकरीता त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधु नये.
सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पुर्णत: बंद ठेवण्यात येत आहेत. निवेदन/अर्ज केवळ ऑनलाइन पध्दतीने स्वीकारण्यात येतील.दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था यांना सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी राहील. ई कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरु राहतील तसेच स्थानीक दुकानदार, हॉटेल यांचे मार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांचे कडे ग्राहकांच्या घरी जातांना बिल व संबंधीत दुकानदारामार्फत देण्यात येणार ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. याबाबतचे नियोजन संबधीत स्थानीक स्वराज्य संस्था यांनी करावी. संबधीत कर्मचा-यांना निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील, सदर अहवालाची वैधता 7 दिवसांकरीता असेल.
सर्व सार्वजानिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतुक नागरीकांना फक्त अत्यावश्यक कामाकरीता अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. तसेच रुग्णांकरीता रिक्षा व खाजगी वाहनांस परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी पोलीस वाहतुक शाखेकडे राहील. जिल्हयाच्या सर्व सिमा या आदेशाद्वारे सिल करण्यात येत असुन, मालवाहतुक व रुग्णवाहतुक करणा-या वाहनास व शासकीय वाहनास केवळ बुलडाणा जिल्हयात प्रवेश देण्यात येईल. याकरीता वेगळया स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. अत्यावश्यक वेळेस जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा यांचे कडुन रितसर परवागनी प्राप्त करुन घ्यावी.
जिल्हयाच्या मालवाहतुक व रुग्णवाहतुक करणा-या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. तथापी मालवाहतुक साठा, खत साठा इत्यादी बाबतीत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी राहील. इतर कारणांकरीता व अत्यावश्यक वैदयकीय कारणांकरीता जिल्हयाबाहेर वाहतुक करावयाची असल्यास http: //covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरुन ई-पास काढुन वाहतुक करता येईल. पावसाळयापुर्वी राष्ट्रीय महामार्गाचे कामे पुर्ण होण्याच्या दृष्टीने केवळ in-situ पध्दतीने सुरु राहील. पाणी टंचाई तसेच पाणी पुरवठा संबधीत कामे सुरु राहतील. प्रसामाध्यमांशी संबंधीत व्यक्ती/पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांचे कार्यालय, सर्व प्रकारचे दैनिक नियतकालिके, वृत्तपत्रांचे वितरण तसेच टि.व्ही. न्युज चॅनल सुरु राहतील. उक्त निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शहरी भागात संबधीत मुख्याधिकारी नगरपालिका/नगर पंचायत तसेच ग्रामीण भागाकरीता संबधीत गटविकास अधिकारी यांची राहील व या सर्व प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी हि संबधीत तालुक्याचे incident commander तथा तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील. वरील प्रमाणे आदेश सर्व आस्थापनांना काटेकोरपणे लागु होतील तसेच कोणत्याही क्षेत्रास, संस्थेस, व्यक्तीस कामकाज सुरु ठेवण्याकरीता विशेष परवानगी दिनांक 20 मे 2021 पर्यंत देण्यात येणार नाही.
सर्व आस्थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्याकरीता आप आपल्या स्तरावरुन त्रिसुत्री पध्दतीची अमलबजावणी करावी. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment