Wednesday, 19 May 2021

DIO BULDANA NEWS 19.5.2021

जिल्ह्यात सुट दिलेल्या सेवांसह निर्बंध लागू किराणा, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने सकाळी 7 ते 11 खुली राहणार कृषी निगडीत सेवा, दुकाने व पावसाळी हंगाम साहित्य दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत, सर्व बँक, वित्तीय संस्था सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : राज्य शासनाने कोविड च्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन आदेश लागू केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही 20 मे 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 1 जुन रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत निर्बंधासह प्रतिबंधात्मक जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आदेश परित केले आहे. जिल्ह्यात सुट दिलेल्या सेवांसह हे निर्बंध लागू राहणार आहेत. या आदेशानुसार सर्व किराणा दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, मिठाई दुकाने, तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन,मटन,पॉल्ट्री,मासे आणि अंडी दुकाने, स्वीट मार्ट), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस पंप सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे. तसेच दुध व दुग्धजन्य विक्री पदार्थ (डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी) आदी दुकाने सकाळी 6 ते सकाळी 9 व संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील. तसेच घरपोच दुध विक्री नियमित वेळेनुसार सुरू राहील. कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने, पावसाळी हंगाम सामग्री संबंधित दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. सदर ठिकाणी सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर, सॅनीटायझर आदी नियमांचे काटेकोर पालन करावे. पेट्रोल पंपावर सकाळी 11 ते रात्री 8 या कालावधीत शासकीय मालवाहतूक, रूग्णवाहिका अत्यावश्यक वाहनांकरीता तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे व मालाची वाहतुक करण्याकरीता शहानिशा करून ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल इंधन पुरवठा करता येणार आहे. एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग, हायवेवरील पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील. मद्य विक्री नमुना एफएल 2, फॉर्म – ई, फॉर्म ई 2 व एफएलडब्ल्यु 2 या अनुज्ञप्तीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येईल. नमुना सीएल 3 अनुज्ञप्तीतून केवळ सीलबंद बाटलीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येईल. घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही. सर्व वकीलांची कार्यालये , चार्टड अकाऊंट यांची कार्यालये सकाळी 10 ते संध्या 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. ऑप्टीकल्सची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत उघडण्यास मुभा असेल. सराफा व्यावसायिकांना दुकाने उघडुन तपासणी करण्याकरीता दुकान सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत सुरू ठेवता येईल. जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील सीएससी केंद्र सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील. वृत्तपत्रांची घरपोच सेवा करता येईल. सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, बिगर बॅकिंग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्तीय संस्था, सहकारी संस्था, पतपेढी, विमा, पोस्ट पेमेंट बँक सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. बँकांचे कार्यालयीन कामकाज नियमित वेळेनुसार सुरू राहील. बँकांनी ग्राहकांना घरपोच सेवा द्याव्यात, एटीएममध्ये 24 तास रक्कम उपलब्ध राहील, याबाबत बँकांनी नियोजन करावे. खरीप हंगाम सुरू होत असल्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांची पीक कर्जाची कामे प्राधान्याने पुर्ण करावी. हॉटेल, रेस्टारंट, खानावळ यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास हॉटेल, रेस्टारंट, खानावळ येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळुन आल्यास संबंधीत आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाईल. शिवभोजन थाळी नियमित वेळेनुसार सुरू राहील. जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या 23 मे 2021 पर्यंत बंद राहतील. त्यापुढे टोकन पद्धतीने नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था यांची राहणार आहे. आठवडी बाजार बंद राहतील. बॅटरी, इन्व्हर्टर, युपीएस आदी साहित्याची दुकाने आरोग्य यंत्रणेच्या अत्यावश्यक कामासाठी उघडता येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत दुकान उघडून मालाची विक्री करता येणार नाही. नगर पालिका व नगर पंचायत हद्दीतील टायर पंक्चरची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत सुरू राहतील. तसेच हद्दीबाहेरील दुकाने नियमित वेळेनुसार सुरू राहतील. सार्वजानिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा,उदयाने,बगीचे पुर्णत: बंद राहील. तसेच सार्वजानिक ठिकाणी मॉर्निंग वॉक व इवेनिंग वॉक करण्यास बंदी राहील. याबाबत संबधीत नगरपालिका तसेच पोलीस विभाग यांनी आवश्यक तपासणी करुन संबधीतांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. सर्व केशकर्तनालये,सलुन,स्पा,ब्युटी पार्लर संपुर्णत: बंद राहील. शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था,प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णत: बंद राहतील तथापी ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. नियोजन व नियंत्रण करण्याची जबाबदारी सबंधीत शिक्षणाधिकारी (प्राथमीक/माध्यमीक) यांची राहील. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल हे पुर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास तो साध्या पध्दतीने घरगुती स्वरुपात करण्यात यावा. लग्नामध्ये मिरवणुक, जेवणावळी,बँड पथक यांना परवानगी राहणार नाही. लग्न समारंभाकरीता केवळ 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल व सदरचा लग्न सोहळा 2 तासापेक्षा जास्त चालणार नाही याची दक्षता घ्यावी. विवाह सोहळा बेकायदेशीररित्या पार पडणार नाही याची दक्षता शहरी भागात संबधीत मुख्यधिकारी नगर पालिका तसेच ग्रामीण भागात संबधीत गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी घ्यावी व नियमानुसार त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. लग्न समारंभाबाबतचे नियोजन व नियंत्रण संबधीत स्थानीक स्वराज्य संस्था,पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची राहील. सर्व चित्रपटगृहे,व्यायामशाळा,जलतरण तलाव,करमणुक व्यवसाय नाटयगृहे, कलाकेंद्र,प्रेषक गृहे, सभागृहे संपुर्णत: बंद राहील. सर्व खाजगी व सार्वजानिक वैदयकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहतील. गॅस एजन्सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण सकाळी 7 ते सायं 6 या वेळेत करण्यात यावे. परंतु ग्राहकांनी गॅस एजन्सी मध्ये प्रत्यक्ष येऊन गॅस नोंदणी करण्यास अथवा सिलेंडर घेण्यास प्रतिबंध राहील. गॅस एजन्सी येथे ग्राहक आढळुन आल्यास संबधीत एजन्सी कारवाईस पात्र राहील. सदर पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. सर्व शासकीय, निमशासकीय,खाजगी कार्यालये व आस्थापना सदर कालावधीत बंद राहतील. वित्त व्यवसायाशी निगडीत सर्व कार्यालये यांचा देखील समावेश राहील. या सर्व कार्यालयांना आपले कामकाज सुरु ठेवायचे असल्यास ते केवळ ऑनलाईन पध्दतीने सुरु ठेवता येईल आणि सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती ही ऑनलाईन नोंदवावी. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचेशी संबधीत शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरु राहतील. सर्व आपले सरकार सेवा केंद्रे व सेतु केंद्रे नगारीकांकरीता बंद ठेवण्यात येत आहेत तथापी नागरीकांना ऑनलाईन स्वरुपात वेगवेगळया प्रमाणपत्र व सुविधांकरीता अर्ज सादर करता येतील. उक्त कालावधीत नागरीकांसाठी दस्त नोंदणीचे काम पुर्णपणे बंद राहील. MIDC, उदयोग, कारखाने, सुतगिरणी येथे केवळ in-situ पध्दतीने कामकाज सुरु राहील. याबाबत सनियंत्रणाची जबाबदारी व्यवस्थापक,जिल्हा उदयोग केंद्र बुलडाणा यांची राहील. शासकीय यंत्रणामार्फत मान्सुन पुर्व विकास कामे आवश्यक पाणी पुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहतील. संबंधीत शासकीय यंत्रणांना या करीता वेगळया परवानगीची आवश्यकता नाही. याकरीता त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधु नये. सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पुर्णत: बंद ठेवण्यात येत आहेत. निवेदन/अर्ज केवळ ऑनलाइन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. ई कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरु राहतील तसेच स्थानीक दुकानदार, हॉटेल यांचे मार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांचे कडे ग्राहकांच्या घरी जातांना बिल व संबंधीत दुकानदारामार्फत देण्यात येणार ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. याबाबतचे नियोजन संबधीत स्थानीक स्वराज्य संस्था यांनी करावी. संबधीत कर्मचा-यांना निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील, सदर अहवालाची वैधता 7 दिवसांकरीता असेल. सर्व सार्वजानिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतुक नागरीकांना फक्त अत्यावश्यक कामाकरीता अनुज्ञेय राहील. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. तसेच रुग्णांकरीता रिक्षा व खाजगी वाहनांस परवानगी राहील. याबाबतीत नियंत्रण व नियोजनाची जबाबदारी पोलीस वाहतुक शाखेकडे राहील. जिल्हयाच्या सर्व सिमा या आदेशाद्वारे सिल करण्यात येत असुन, मालवाहतुक व रुग्णवाहतुक करणा-या वाहनास व शासकीय वाहनास केवळ बुलडाणा जिल्हयात प्रवेश देण्यात येईल. याकरीता वेगळया स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. अत्यावश्यक वेळेस जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा यांचे कडुन रितसर परवागनी प्राप्त करुन घ्यावी. जिल्हयाच्या मालवाहतुक व रुग्णवाहतुक करणा-या वाहनास व शासकीय वाहनास स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही. तथापी मालवाहतुक साठा, खत साठा इत्यादी बाबतीत फक्त लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी राहील. इतर कारणांकरीता व अत्यावश्यक वैदयकीय कारणांकरीता जिल्हयाबाहेर वाहतुक करावयाची असल्यास http: //covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरुन ई-पास काढुन वाहतुक करता येईल. पावसाळयापुर्वी राष्ट्रीय महामार्गाचे कामे पुर्ण होण्याच्या दृष्टीने केवळ in-situ पध्दतीने सुरु राहील. पाणी टंचाई तसेच पाणी पुरवठा संबधीत कामे सुरु राहतील. प्रसामाध्यमांशी संबंधीत व्यक्ती/पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांचे कार्यालय, सर्व प्रकारचे दैनिक नियतकालिके, वृत्तपत्रांचे वितरण तसेच टि.व्ही. न्युज चॅनल सुरु राहतील. उक्त निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शहरी भागात संबधीत मुख्याधिकारी नगरपालिका/नगर पंचायत तसेच ग्रामीण भागाकरीता संबधीत गटविकास अधिकारी यांची राहील व या सर्व प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी हि संबधीत तालुक्याचे incident commander तथा तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील. वरील प्रमाणे आदेश सर्व आस्थापनांना काटेकोरपणे लागु होतील तसेच कोणत्याही क्षेत्रास, संस्थेस, व्यक्तीस कामकाज सुरु ठेवण्याकरीता विशेष परवानगी दिनांक 1 जुन 2021 पर्यंत देण्यात येणार नाही. सर्व आस्थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्याकरीता आप आपल्या स्तरावरुन त्रिसुत्री पध्दतीची अमलबजावणी करावी. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे. ****** रासायनिक खते छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास कारवाई करणार कृषी विभागाचा इशारा विक्रेत्यांनी जादा दराने खते विक्री करू नये बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून येणारा खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीचे लगबग सुरू असून माहे एप्रिल 2021 पासून युरिया वगळता इतर रासायनिक खताच्या किमतीमध्ये रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी वाढ केलेली आहे. तरी खत विक्रेत्यांनी छापील दरापेक्षा जादा दर शेतकऱ्यांना आकारू नये, असे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषि विभागाने दिला आहे. जिल्ह्यामध्ये एप्रिल 2021 पूर्वीचा व त्यानंतर पुरवठा झालेला डीएपी, एमओपी, 10:26:26, 12:32:16, 20:20:0:13, 19:19:19, 24:24:0 तसेच सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहेत. जुन्या व नवीन दराचे रासायनिक खते बाजारात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी करताना खताचे गोणी वरील किरकोळ कमाल विक्री किंमत (एम.आर.पी) पाहूनच खतांची खरेदी करावी. तसेच रासायनिक खत विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये जुन्या व नवीन रासायनिक खताचे दर वेगवेगळे नोंदविलेल्या असल्याने शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना ही ई-पॉस मशीनची पावती विक्रेत्याकडून घ्यावी व त्यावरून रासायनिक खताचे किमतीचे पडताळणी करता येईल, केंद्रशासनाच्या एन.बी.एस (न्यूट्रीयंट बेस्ड सबसिडी) धोरणानुसार युरिया वगळता इतर खताचे दर निश्चित करण्याचा अधिकार खत उत्पादक कंपनीचे असल्याने बाजारामध्ये एकाच प्रकारचे खताचे वेगवेगळ्या कंपनीचे भाव वेगवेगळे असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी वेळी वरील बाबींची खात्री करावी. तसेच काही विक्रेत्याकडे जुन्या दराचे रासायनिक खत उपलब्ध असून देत नसल्यास किंवा जास्त पैशाची मागणी करत असल्यास व इतर रासायनिक खत, बियाणे व कीटकनाशक बाबत तक्रारी असल्यास आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा स्तरावर कृषी निविष्ठा कक्षातील श्री अरुण इंगळे जिल्हा गुणवंत नियंत्रण निरीक्षक यांच्या 7588619505 व विजय खोंदील, मोहिम अधिकारी जि.प यांच्या 7588041008 या मोर्बाइल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक व कृषी विकास अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे यांनी केले आहे. ***** महाडिबीटी पोर्टलवर बियाणे घटकासाठी अर्ज करण्यास 20 मे पर्यंत मुदतवाढ बुलडाणा,(जिमाका) दि. 19 :  महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थीनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आदी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2021 कळविण्यात आली होती. परंतु क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व पदाधिकारी यांच्या मागणी नुसार बियाणे घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांन अर्ज करण्याच्या प्रक्रियेस दिनांक 20 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. असा करा महाडीबीटी पोर्टलवर अर्ज महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा- डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा- डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. **** खरीप हंगाम 2021 मध्ये शेतक-यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे *कृषि विभागाचे आवाहन *गावनिहाय बियाण्याची माहिती कृषी विभागाच्या www.buldanaagriculture.com संकेतस्थळावर उपलब्ध बुलडाणा,(जिमाका) दि. 19 : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातुन येणारे बियाणे पुढील 2 वर्षापर्यंत वापरात येते. शेतक-यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकयांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासुन उत्पादित झालेले सोयाबीन चालु वर्षी बियाणे म्हणून शेतकरी वापरु शकतात. गावनिहाय बियाणे उपलब्धता जाणून घेण्यासाठी कृषी विभागाच्या www.buldanaagriculture.com संकेतस्थळाला भेट द्यावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी, बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यापेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टीक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवतांना सोयाबीनची सातपेक्षा जास्त थर बियाण्याची पोती एकमेकावर ठेवू नये. बियाणे उन्हात ठेवू नये. बियाणे हाताळतांना जास्त प्रमाणात आदळ आपट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पेरणीसाठी राखून ठेवलेल्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासावी. शेतकऱ्यांनी 60 टक्के पेक्षा जास्त उगवण क्षमता असलेल्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीन निवड करताना बाजारातून आणायचे असल्यास कोरडवाहू शेतीसाठी एम ए यू एस 71, एम ए यू एस 158, फुले कल्याणी, जे.एस 95, जे. एस 9305 या वाणांची निवड करावी. पेरणीच्या एक पूर्ण दिवस पूर्वी कार्बोकजिम 37.5 टक्के अधिक थायरम 37.5 टक्के ग्रॅम / किलो बियाण्यास लावावे. पेरणीच्या दोन तास पूर्वी 20 ग्रॅम रायझोबियम किंवा 6 मि.ली पि.एस.बी व ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मी ली /किलो बियाण्यास लावावे. यापैकी जी पद्धत उपलब्ध असेल त्याचा बीजप्रक्रिया करण्यासाठी वापर करावा. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन पिकाची पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करावा. ते शक्य नसल्यास प्रत्येक 4 ते 6 ओळी मागे 1 ओळ सोडावी म्हणजेच पट्टा पद्धतीने पेरणी करावी. बियाणे 3 ते 5 से मी पर्यंत खोल पडल्याची खात्री करावी. रात्रीच्या वेळी पेरणी करू नये. बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे नंतर त्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. बियाण्याची उगवण क्षमतेनुसार एकरी बियाण्याचा वापर उगवण क्षमता 70 टक्के बियाणे एकरी 30 किलो, उगवण क्षमता 69 टक्के बियाणे एकरी 30.50 किलो, उगवण क्षमता 68 टक्के बियाणे एकरी 31 किलो, उगवण क्षमता 67 टक्के बियाणे एकरी 31.50 किलो, उगवण क्षमता 66 टक्के बियाणे एकरी 32 किलो, उगवण क्षमता 60 टक्के बियाणे एकरी 35 किलो. ****** पाणी टंचाई निवारणार्थ तीन गावांसाठी टँकर मंजूर बुलडाणा, (जिमाका) दि.19 : बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, चौथा व देव्हारी या तीन गावांमधील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. डोंगरखंडाळा येथील 8630 लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. सदर टँकर गावाला दररोज 2 लक्ष 2 हजार 600 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. देव्हारी येथील 649 लोकसंख्येसाठी एक टँकर 35 हजार 580 लीटर, चौथा येथील 2000 लोकसंख्येकरीता एक टँकर 52 हजार 440 लीटर पाणी पुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) बुलडाणा यांनी कळविले आहे. *****

No comments:

Post a Comment