पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेचे फळपिकांना मिळणार ‘कवच’
- संत्रा, पेरू, लिंबू फळासाठी 14 जून अंतिम मुदत, तर मोसंबी फळपिकाकरिता 30 जून
- चिकूसाठी 30 जून, डाळींबसाठी 14 जुलै व सिताफळासाठी 31 जुलै अंतिम मुदत
बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या तीन वर्षासाठी मृग बहारातील फळपिकांना शासन निर्णयानुसार पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, डाळींब, चिकू, पेरू, लिंबू आणि सिताफळ या 7 फळपिकांकरिता राबविण्यात येत आहे. तसेच आंबिया बहारातील आंबा, केळी, डाळींब, द्राक्ष, मोसंबी व संत्रा अशा 6 फळपिकांसाठी लागू करण्यात येणार आहे. योजनेतंर्गत फळपिकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात 13 तालुक्यांमध्ये फळपिकांनुसार महसूल मंडळात करण्यात येत आहे. त्यामुळे निश्चितच फळपिकांना नुकसानीच्या काळात विम्याचे कवच प्रदान होणार आहे.
ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचीत फळपिकासाठी ऐच्छीक आहे. अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान, जादा आर्द्रता, जास्त पाऊस, कमी पाऊस, पावसाचा खंड व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक सहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळ पिके घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मृग बहार व आंबीया बहरासाठी अधिसुचीत फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण फळपिक निहाय धोके (ट्रिगर) लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय होते. विमा क्षेत्र घटक हा महसुल मंडळ असणार आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसुचीत फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादीत केला आहे. त्यामुळे 30 टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. तसेच 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले आहे. तर 35 टक्क्यावरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी 50 टक्के प्रमाणे भरावयाचे आहे. अधिसुचीत फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येणार आहे.
मृग बहारासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक मोसंबी फळपिकाकरीता 30 जून, संत्रा, पेरू व लिंबू फळपिकासाठी 14 जून, डाळींबकरीता 14 जुलै, चिकूसाठी 30 जून व सिताफळ फळपिकासाठी 31 जुलै 2022 अंतिम मुदत आहे. तरी शेतकऱ्यांनी अधिसूचीत फळपिकासाठी नजिकच्या ई सेवा केंद्र, बँक / वित्तीय संस्था यांचेशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी भरावयाचा एकूण विमा हप्ता व एकूण विमा संरक्षण रक्कम
मोसंबी : शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 4 हजार व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 80 हजार. डाळींब : शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 6500 रू व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 1 लक्ष 30 हजार. संत्रा : शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 4 हजार 800 रूपये व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 80 हजार. चिकू : शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 13 हजार 200 रूपये व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 60 हजार. पेरू : शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 3 हजार रूपये व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 80 हजार. लिंबू : शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 3 हजार 850 रूपये व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 70 हजार. सिताफळ : शेतकऱ्यांना भरावयाचा एकूण विमा हप्ता प्रति हेक्टर 2 हजार 750 रूपये व एकूण विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर 55 हजार.
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी व संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
फळपिक निहाय समाविष्ट महसूल मंडळ
मोसंबी : सिं.राजा, सोनोशी, किनगांव राजा, दुसरबीड, मलकापूर पांगरा, शेंदुर्जन व साखरखेर्डा ता. सिं.राजा, म्हसला बु ता. बुलडाणा, चिखली ता. चिखली. डाळींब : पेठ, चिखली, चांधई, कोलारा, अमडापूर, शेळगांव आटोळ व हातणी ता. चिखली. बुलडाणा व धाड ता. बुलडाणा, शेलापूर, बोराखेडी, मोताळा, पिंप्री गवळी, पिं. देवी व धा. बढे ता. मोताळा. हिवरखेड व काळेगांव ता. खामगांव. दे.राजा, दे.मही, तुळजापूर, मेहुणा राजा व अंढेरा ता. दे.राजा. जामोद ता. जळगांव जा. जांबुळधाबा व नरवेल ता. मलकापूर. संत्रा : डोणगांव, हिवरा आश्रम, मेहकर, शेलगांव दे, जानेफळ, नायगांव दत्तापूर व वरवंड ता. मेहकर. अंजनी खुर्द व सुलतानपूर ता. लोणार. आडगांव ता. खामगांव. दे. मही, मेहुणा राजा व अंढेरा ता. दे.राजा. बावनबीर, सोनाळा व संग्रामपूर ता. संग्रामपूर. जामोद, जळगांव, आसलगांव ता. जळगांव जामोद. चिकू : चिखली ता. चिखली. पेरू : साखळी बु ता. बुलडाणा, चिखली, हातणी, चांधई, मेरा खु, एकलारा, कोलारा व शेलगांव आटोळ ता. चिखली. लोणार व टिटवी ता. लोणार. सिं.राजा व किनगांव राजा ता. सिं.राजा. चांदुर बिस्वा व निमगांव ता. नांदुरा. दे.मही ता. दे.राजा. पिं. काळे, जळगांव, जामोद, वडशिंगी ता. जळगांव जामोद. लिंबू : निमगांव ता. नांदुरा. पिं. काळे, जळगांव, जामोद, वडशिंगी ता. जळगांव जामोद. शेगांव ता. शेगांव, शेलापूर बु ता. मोताळा. आडगांव व पारखेड ता. खामगांव. सिताफळ : चांधई, मेरा खु, कोलारा व शेलगांव आटोळ ता. चिखली. लोणार, सुलतानपूर, हिरडव व टिटवी ता. लोणार. सिं.राजा, शेंदुर्जन, साखरखेर्डा व किनगांव राजा ता. सिं.राजा. जळगांव, जामोद, वडशिंगी व आसलगांव ता. जळगांव जामोद. संग्रामपूर ता. संग्रामपूर, वरवंड, जानेफळ, नायगांव दत्तापूर, हिवरा आश्रम ता. मेहकर.
No comments:
Post a Comment