Wednesday, 1 June 2022

DIO BULDANA NEWS 1.6.2022

 जिल्ह्यातील 292 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण कार्यक्रम जाहीर

  • आरक्षण सोडतीमध्ये सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांचे आवाहन

  बुलडाणा, (जिमाका) दि. 1 :  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण आदेश 2021 अन्वये जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 292 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या 30 मे 2022 आदेशानुसार आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 292 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27 मे 2022 रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 या आरक्षण कार्यक्रमानुसार आरक्षण सोडत काढण्याकरीता विशेष ग्रामसभेची सूचना 3 जुन पर्यंत देण्यात येईल. विशेष ग्रामसभा बोलावून, तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, प्रारूप प्रभाग रचनेवर (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला) आरक्षणाची सोडत 6 जुन रोजी काढण्यात येणार आहे. सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे हरकती व सूचना 7 ते 10 जुन पर्यंत दाखल करण्याचा कालावधी असेल. उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेवून अभिप्राय 15 जुन पर्यंत द्यावयाचा आहे.

   तसेच उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेवून अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांनी 17 जूनपर्यंत मान्यता द्यावयाची आहे. जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) ला 20 जुनपर्यंत व्यापक प्रसिद्धी द्यावयाची आहे. या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीची मुदत सन 2022 पर्यंत संपत आहे, अशा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. याबाबतची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी व जास्तीत जास्त आरक्षण सोडतीमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.

                                                                        ***********

     जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता

  • हरकती व सुचना असल्यास 8 जुनपर्यंत सादर कराव्यात

  बुलडाणा, (जिमाका) दि. 1 :  महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील विविध कलमान्वये जिल्हा परिषद व 13 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुक – 2022 होणार आहे. त्याअनुषंगाने प्रभागांच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या प्रारूप रचनेची प्रसिद्धी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास 31 मे रोजी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे.

     या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना 2 जुन रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर ज्या नागरिकांना सुचना व हरकती दाखल करावयाच्या असल्यास त्यांनी 8 जुनपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात याव्यात. त्यासाठी 2 जुन रोजी परिशिष्ट 3 व 3 अ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाचे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निवडणूक विभाग 22 जुनपर्यंत गण रचना अंतिम करणार आहे. अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात 27 जुन रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  तरी याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

                                                                        **********

No comments:

Post a Comment