Thursday, 30 June 2022

DIO BULDANA NEWS 30.6.2022

 पंढरपूर यात्रेसाठी एसटी सज्ज; 210 बसेस धावणार

बुलडाणा, (जिमाका) दि.30 : आषाढी पंढरपूर यात्रा 6 जुलै ते 16 जुलै पर्यंत पंढरपूर जि. सोलापूर येथे असणार आहे. यात्रोचा मुख्य दिवस आषाढी शुद्ध एकादशी 10 जुलै 2022 रविवार राहणार आहे. तसेच बुधवार, 13 जुलै 2022 रोजी पौर्णिमा आहे. या यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे.

   पंढरपूर करीता जिल्ह्याच्या विविध आगारांमधून प्रवाशांसाच्या सोयीसाठी 210 बसेस धावणार आहे. कोणत्याही गावामध्ये कमीत कमी 50 प्रवाशी थेट मिळत असल्यास त्या प्रवाशांकडून प्रवास भाड्याची पूर्ण रक्कम आगाऊ भरणा करून त्या गावातून भाविकांना पंढरपूरकरीता थेट बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.  प्रवाशांच्या सुरक्षित सेवेसाठी एसटी महामंडळ सर्व आगारातून खास पंढरपूर यात्रेकरीता जादा बसेस सोडण्याची व्यवस्थाही करीत आहे. तरी प्रवाशांनी पंढरपूर यात्रेसाठी अवैध, खाजगी वाहनातून जीव धोक्यात घालून प्रवास न करता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनेच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार व विभागीय वाहतूक अधिकारी अमृतराव कच्छवे यांनी केले आहे.

यात्रेकरीता आगारनिहाय अशा आहेत बसेस

बुलडाणा : 44, चिखली : 30, खामगांव : 32, मेहकर : 40, मलकापूर : 25, जळगांव जामोद : 24, शेगांव : 15 असे एकूण 210 बसेस आहेत.

*****

सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

बुलडाणा,(जिमाका) दि.30 : विश्वविख्यात संख्या शास्त्रज्ञ स्व. प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा सांख्यिकी कार्यालयात सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) ज्ञा.व आंबेकर यांनी दिपप्रज्वलन करून अध्यक्षस्थान भुषविले.

  प्रास्ताविक सांख्यिकी सहायक अमोल तोंडे यांनी केले. त्यांनी संख्याशास्त्राचे महत्व विषद केले.  यावर्षीच्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकन्ल्पना ‘शाश्वत विकास ध्येयाकरीता सांख्यिकी’ अशी होती.  या संकल्पनेवर आधारीत नवीन ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी सांख्यिकीय माहितीची उपयुक्तता यावर संशोधन सहायक अनिल शेवाळे यांनी भर दिला.   जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आंबेकर यांनी स्व. महालनोबिस यांचे संशोधनात्मक अधिष्ठानाबाबत माहिती दिली. सांख्यिकी दिन म्हणजे सांख्यिकीचे जन्मदात्यांचा दिवस असल्याचे प्रतीपादन केले.

आभार प्रदर्शन संशोधन सहायक डी. पी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सांख्यिकी सहायक श्रीमती अ. म. तायडे, अ.रा. तोंडे, प्र.रा. बोदडे, उ.अ डाबेराव, अन्वेषक कि. भ. शिरसाट, लिपीक र.ना हातलकर, श्रीमती सु.सु पवार आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

                                                                        *********

आदिवासी मुला- मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

• पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

• http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.30: आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह बुलडाणा येथे आहे. या वसतिगृहासाठी शैक्षणिक सत्र सन 2022-23 करीता अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता इयत्ता 11 वी व पुढील शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाकरीता वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी http://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपले ऑनलाईन अर्ज भरून मुलींनी हार्डकॉपीसह शैक्षणिक कागदपत्रे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, राऊत मंगल कार्यालय, सर्क्युलर रोड, जिजामाता महाविद्यालयजवळ, बुलडाणा येथे सादर करावे. तर मुलांनी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, मॉडेल डिग्री महाविद्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावे.    

   प्रवेशीत विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डिबीटीद्वारे निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहलभत्ता व इतर भत्ते देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक नोंद करावा. हा मोबाईल क्रमांक बँक खात्यासोबत तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना तेआधार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतंत असावे. आधार क्रमांकाची नोंद करताना तो स्थगित झाला नसल्याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थ्यांनी बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर खाते कार्यरत असल्याची खात्री करून घ्यावी. प्रवेशासाठी जातीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, वर्ग 10 वी चे बोर्ड प्रमाणपत्र, मेडीकल प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड छायांकित प्रत, गुणपत्रिका, विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार संलग्न बँक खाते पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आदी अचूकपणे अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल आदिवासी शासकीय मुलींचे वसतिगृह, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                                        ***********

जुलै महिन्याच्या लोकशाही दिनाचे 4 जुलै रोजी आयोजन

• मोबाईल क्रमांक 9021353670 वर ऑनलाईन तक्रारी कराव्यात

• व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि. 30: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. जुलै महिन्याचा लोकशाही दिन सोमवार दि. 4 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.

   या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 9021353670 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून तक्रारी द्याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांना दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

    तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                                ******

 

 


--

No comments:

Post a Comment