डॉ झाकीर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करावे
· 30 ऑगस्ट 2022 अंतिम मुदत
बुलडाणा, दि. 24 (जिमाका) : डॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मदरशांना पायाभुत सुविधा, ग्रंथालय व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्यात येत आहे. सदर अनुदान जास्तीत जास्त 2 लक्ष रूपये इतक्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे. यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे. त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान अनुज्ञेय असणार नाही. तरी इच्छूक पात्र मदरशांनी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावे. सदर प्रस्ताव 30 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावे.
मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत, अशा मदरसांना सदर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ज्या मदरसांना स्कीम फॉर प्रोव्हाईडींग क्वालीटी एज्युकेशन इन मदरसा या केंद्र पुरस्कृत योजनेतंर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णय तरतुदीनुसार जास्तीत जास्त 3 डीएड / बीएड शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, ऊर्दू यापैकी एका माध्यमाची निवड करून त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे अनिवार्य राहील. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रस्ताव 11.10.2013 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सादर करावे. तरी जिल्ह्यातील इच्छूक मदरसांनी दिनांक 11.10.2013 च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले प्रस्ताव कागदपत्रांच्या पुर्ततेसह अल्पसंख्यांक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 30 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावे व या योजनेचा लाभ घ्यावा. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधांसाठी मिळणार अनुदान
- इच्छुक शाळांनी 31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावेत
बुलडाणा, दि. 24 (जिमाका ): अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी 2022-2023 या वर्षाकरीता वार्षिक कमाल 2 लक्ष रूपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेकरीता इच्छुक शाळांनी 31 जुलै 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावेत.
या योजनेत अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांच्या इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी, संगणक कक्ष उभारणे/अद्यावत करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर, इंग्रजी लँग्वेज लॅब, पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था करणे, प्रयोगशाळा उभारणे/अद्यावत करणे, प्रसाधनगृह/स्वच्छतागृह उभारणे/डागडुजी करणे, झेरॉक्स मशीन/एल.सी.डी.प्रोजेक्टर, संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर, ग्रंथालय अद्यावत करणे या सुविधांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेतंर्गत राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग या शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक समाजाचे शाळेत किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासनमान्य अपंग शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.
ही अनुदान योजना 7 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार राबविण्यात येणार आहे. या योजनेचा शासननिर्णय व अर्जाचा नमूना maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूक शाळांनी 31 जुलै पर्यंत या योजनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000
सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बेटी बचाओ-बेटी पढाओ सक्षमीकरण सप्ताह
- 27 ते 29 जून दरम्यान आयोजन
बुलडाणा, दि. 24 (जिमाका ): बुलडाणा डाक विभाग मार्फत 27 जून ते 29 जून 2022 या कालावधीत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बेटी बचाओ-बेटी पढाओ सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत 10 वर्षाखालील सर्व मुली भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत खाते काढण्यासाठी पात्र आहेत. या योजनेनुसार कमीत कमी 250 रूपये भरून आपण खाते उघडू शकता, 10 वर्षाखालील सर्व मुलींचे आई / वडील, पालक हे खाते उघडू शकतात. एका कुटूंबात केवळ 2 मुलींच्या नावे हे खाते उघडल्या जाते.
एका वर्षात कमीत कमी 250 रूपये व जास्तीत जास्त 1 लक्ष 50 हजार रूपये या मध्ये जमा केल्या जावू शकतात. आयकर मध्ये 80 सी अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर सूट मिळते. योजनेची वयाची परिपक्वता 21 वर्ष आहे. मुलीच्या वयाच्या 18 वर्षानंतर शिक्षण किंवा लग्नाकरीता 50 टक्के रक्कम काढता येते. या खात्याला डाक विभागामार्फत सर्वाधिक 7.6 टक्के व्याज दर देण्यात येतो. तरी सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ देण्यासाठी जवळच्या डाक कार्यालयात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडावे, असे आवाहन डाक अधिक्षक राकेश येल्लोमेल्ली यांनी केले आहे.
अनुसूचित जाती मुला-मुलींच्या शासकीय निवासी
शाळांचा इयत्ता 10 वीचा निकाल 100 टक्के
बुलडाणा, दि. 24 (जिमाका ): जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागातंर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलींच्या 5 शाळांचा इयत्ता 10 वीचा निकाल 100 टक्के लागला आहे. या शाळांमध्ये अनु. जाती मुलांची शाळा कोलवड ता. बुलडाणा, अनु. जाती मुलांची शाळा वळती ता. चिखली, अनु. जाती मुलांची शाळा लोणार, अनु. जाती मुलींची शाळा घाटपुरी ता. खामगांव व अनु. जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगांव यांचा समावेश आहे. या पाचही शाळांमध्ये इयत्ता 10 वीला 166 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व 166 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या निकालाची टक्केवारी 100 टक्के आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तरी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment