Wednesday, 1 June 2022

DIO BULDANA NEWS 1.6.2022,2

 वृद्ध साहित्यिककलावंत मानधन योजेनत पात्र अर्जांची यादी प्रसिद्ध

·         अपात्र कलावंतांनी 13 जुनपर्यंत आक्षेप सादर करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग कार्यालयास वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेतंर्गत कलावंतांचे मानधन मंजुरीसाठी सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 1753 अर्ज प्राप्त झाले. प्रतिवर्षी तीन व सहा महिन्यातून एकदा जिल्हा वृद्ध साहित्यिक व कलावंत निवड समितीची बैठक घेवून इष्टांकानुसार शासन निर्णयान्वये एक वर्षात 100 तर तीन वर्षात 300 कलावंतांची मानधनासाठी निवड करण्याचे निकष आहेत. पात्र अर्जांची यादी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

   पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 7 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर एकूण 1753 प्राप्त अर्जांची अटी व शर्तीनुसार समाज कल्याण कार्यालयाने छाननी केली. छाननी बाबत अहवाल तयार करण्यात आलेला आहे. या योजनेतंर्गत सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वित्तीय वर्षातील एकूण 191 पात्र  अर्जांची यादी समाज कल्याण, जि.प कार्यालयात उपलब्ध आहे. कार्यालयात दर्शनी फलकावर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ज्या वृद्ध साहित्यिक, कलावंत यांना अपात्र यादीबाबत आक्षेप असल्यास अशा वृद्ध साहित्यिक, कलावंतांनी त्यांचे मूळ कागदपत्रावरून खात्री करून घ्यावी. त्याकरीता 8 जुन 2022 पर्यंत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे उपस्थित रहावे. तसेच आक्षेप 13 जुन 2022 पर्यंत आक्षेप सादर करावे. यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी, असे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        ******    

                                 जागतिक सायकल दिवसाच्या निमित्ताने सायकल रॅलीचे आयोजन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र व जिल्हा प्रशासनाच्या वतिने आजादी का अमृत महोत्सवा’ निमित्ताने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन शुक्रवार दि. 03 जून रोजी जागतिक सायकल दिवसनिमित्ताने जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथून सकाळी 6.30 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते होणार आहे.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, प्रमुख उपस्थितीत सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड, महाराष्ट्र राज्य अथेलेस्टिक असोसिएशनचे उपाध्यक्ष गोपालसिंग राजपूत, निलेश इंगळे राहणार आहे.  सायकल रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यर्थ्यांनी 13 देशांची सायकल यात्रा करणारे संजय मयुरे, क्रीडा प्रशिक्षक  विजय वानखेडे, राजेश डिडोळकर यांच्याकडे (जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल,बुलडाणा) किंवा नेहरु युवा केंद्र कार्यालयामध्ये दिनांक 2 जून रोजी  सायं 5 पर्यंत  नाव नोंदणी करावी. सहभागींना नेहरु युवा केंद्राव्दारा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी सर्व स्वयंसेवक, सायकल प्रेमी, पर्यावरण प्रेमी, क्रीडा प्रेमी युवक –युवतींनी  व अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राव्दारे करण्यात आले आहे.

                                                            *********


जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्ताने जनजागृती

  • बस स्थानक येथे चित्रप्रदर्शन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पथनाट्याचे अयोजन

 बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्ताने 31 मे रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रूग्णालय,  ब्रह्म्याकुमारीज व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करण्यात आली. तंबाखू पर्यावरणाला धोका या संकल्पनेनुसार ही जनजागृती करण्यात आली. यामध्ये बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालयाजील नियोजन समिती सभागृहात व आयटीआय येथे पथनाट्य सादर करण्यात आले. सभागृहात उपस्थित सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील आदी उपस्थित होते.

    बस स्थानक येथे  वैज्ञानिक पद्धतीने व्यसनांची कारणे, व्यसनांचे दुष्परीणाम, व्यवसनमुक्तीच्या उपाययोजना, यावर आधारीत चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनीचे उद्घाटन ॲड जयश्री शेळके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मारोती चाटे, दंतरोगतज्ज्ञ डॉ. माधुरी चाटे, स्वप्नील धनाड, आगार व्यवस्थापक श्री. मोरे यांची उपस्थिती होती. तसेच आयटीआय बुलडाणा येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत 200 विद्यार्थ्यांसाठी तंबाखू सेवनाचे दुष्परीणाम व उपाययोजना यावर विवेचन करणारे व्याख्यान व चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी प्राचार्य श्री. राठोड उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, सामाजिक कार्यकर्ता अर्चना आराख, ब्रह्म्याकुमारीज केंद्र संचालीका बी. के उर्मिला, सलाम मुंबई फाऊंडेशनचे महेंद्र सोभागे यांनी प्रयत्न केले.   

*

No comments:

Post a Comment