पात्र मुलीचे खाते काढून डाक विभागाच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्या
- जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
- सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बालिका सशक्तीकरण मोहिमेचे उद्घाटन
बुलडाणा, दि. 27 (जिमाका): डाक विभाग हा गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेला आहे. या विभागाचा पोस्टमन सर्वांना परिचीत आहे. डाक विभागात आता केवळ डाकसंबंधीत कामकाज होत नाही, तर बँकिंग, विमाविषयक योजनाही राबविण्यात येतात. त्यामुळे 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते काढून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बालिका सशक्तीकरण मोहिमेच्या उद्घाटनीय कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डाक अधिक्षक राकेश एलोमल्ली उपस्थित होते.
दरम्यान जिल्हाधिकारी श्री. रामामूर्ती यांच्याहस्ते मुलींना प्रातिनिधीक स्वरूपात सुकन्या समृद्धी योजनेचे पासबुक वितरीत करण्यात आले. त्यानंतर बुलडाणा डाक विभागाने तयार केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवरील जनजागृती पर लघु चित्रफीत दाखविण्यात आली. डाक अधिक्षक राकेश एल्लामेल्ली यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक डाक अधिक्षक गणेश अंभोरे यांनी केले. या कार्यक्रमास सहाय्यक डाक अधिक्षक नरेश शिंदे, उपविभागीय डाक निरीक्षक मेहकर निलेश वायाळ, पोस्टमास्तर रामप्रभू देशपांडे तसेच ग्रामीण डाक सेवक, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
अशी आहे सुकन्या समृद्धी योजना
डाक विभागाने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने सुकन्या समृद्धी योजनेती अनजागृती करण्यासाठी बालिका सक्षमीकरण मोहिम 27 जून पासुन सुरु केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश 10 वर्षाखालील प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खाते उघडून संपुर्ण जिल्हा ऑगस्ट 2022 पर्यंत 100 टक्के सुकन्या समृद्धी जिल्हा घोषित करणे असा आहे. सुकन्या खाते सर्व बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याज दर 7.6 टक्के देते. हे खाते किमान 250 रूपयाच्या ठेवीवर उघडले जाऊ शकते. या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल रक्कम 1.5 लाख रूपये जमा केली जाऊ शकते. जी कर सवलती साठी देखील पात्र ठरेल. या खात्याचा लॉक-इन कालावधी खाते काढलेल्या तारखेपासून 15 वर्षे व परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे. या खात्यातून 50 टक्के रक्कम ही मुलीच्या उच्च शिक्षणासाठी काढता येते. तसेच लग्नासाठी खाते बंद सुद्धा करता येते.
**********
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा बडगा
* 10 गुन्हे नोंदवून आरोपींना अटक
* 9 लाख 16 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
* पहिल्यांदाच ढाब्यांवर कारवाई
बुलडाणा, दि. 27 (जिमाका): राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, निर्मिती व वाहतूक तसेच अवैध ढाबेविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. विभागीय उप-आयुक्त व्ही. पी चिंचाळकर व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात 24 व 25 जून रोजी धडक मोहिम राबविण्यात आली. या दोन्ही दिवशीच्या कारवाईत एकूण 10 वारस गुन्हे नोंदविण्यात आले असून 9 लक्ष 16 हजार 527 रूपये किंमतीचा दारू बंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धडक मोहिमेदरम्यान 24 जून रोजी भानखेड ता. चिखली येथील मेहकर फाट्यावर सापळा रचीत एक चार चाकी महिंद्रा बोलेरो पिकअप मद्यासह जप्त करण्यात आली. सदर कारवाईमध्ये देशी दारु 529.2 लिटर, विदेशी दारु 105.29 लिटर व एक चार चाकी वाहनासह 8 लक्ष 88 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या कारवाईत अक्षय पांडुरंग भोजने रा. तिंत्रव ता. शेगांव याला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच 25 जून रोजी बुलडाणा शहरातील भिलवाडा, कैकाडीपूरा व सुंदरखेड येथील कारवाईत अवैध हात भट्टी निर्मिती एकूण 6 गुन्हे नोंदविण्यात आली आहे. या ठिकाणी गावठी दारू 72 लीटर, सडवा 591 लीटर सह एकूण 19 हजार 64 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच मलकापूर पांग्रा ता. सिं.राजा व लोणार येथील अवैध ढाबेवर तीन गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये लोणार शहरातील राजधानी ढाबा व हॉटेल सुजर, हॉटेल भारत यांचा समावेश आहे. यातील ढाबामालक बाबाराव बाजीराव बकाळ, पंढरी रामकिसन मुळे, शंकर मारोती बाजड, शिवानंद लक्ष्मण कायंदे यांच्यावर दारू पिण्याची सोय केल्याबद्दल दारू बंदी कायदा कलम 68 नुसार गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच या ढाब्यावर दारू पित असताना सुदाम देवराम खारोड, भास्कर रामकिसन तळेकर, आत्माराम अर्जुन गिरी, सुनील साहेबराव मापारी, कृष्णा मोतीराम मोरे, विजय सदाशिव गरूडकर यांच्यावर कलम 84 नुसार गुन्हा नोंदविण्यात आले. या ग्राहकांची वैद्यकीय तपासणी केली असता दारू नशेत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत तीनही ढाब्यावरील देशी विदेशी दारूसह 28 हजार 817 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या मोहिमेत चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे, मलकापूर चे दुय्यम निरीक्षक पी. व्ही मुंगडे, बुलडाणा येथील ए. आर आडळकर, मेहकरचे एस. डी. चव्हाण, खामगांवचे एन. के मावळे,भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक आर.आर उरकुडे, दुय्यम निरीक्षक चिखली येथील हरी सोनवणे, मलकापूरचे पी. व्ही मुंगडे, सहायक दुय्यम निरीक्षक श्री. पहाडे, एन.ए देशमुख, जवान परमेश्वर चव्हाण, अमोल तिवाने, राजु कुसळकर, अमोल सोळंके, नितीन सोळंकी, प्रदीप देशमुख, अमोल अवचार, संजु जाधव, मोहन जाधव, शरद निकाळजे, विशाल पाटील, रामेश्वर सोभागे, गणेश मोरे, अमोल सुसरे, प्रफुल्ल साखरे, कु. सोनाली उबरहंडे यांनी सहभाग घेतला.
बनावट मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे जिवीतहानी किंवा गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मद्यसेवन करणाऱ्या नागरिकांनी उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे. ढाबा, हॉटेल व रेस्टॉरंट किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी बसून दारू पिवू नये आढळल्यास संबंधितांविरूद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायदाचे 68 अंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सदर गुन्ह्यात 3 ते 5 वर्षाचा कारावास किंवा 25 ते 50 हजार रूपये पर्यंत दंडाची शिक्षा होणार आहे, असे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment