कोरोनाशी लढत जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात संपन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
- भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन थाटात साजरा
- हात वारंवार धुणे, मास्क वापरणे व शारिरीक अंतराचे नियमाचे पालन करा
- शासनाकडून 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी
- 17 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दररोज 2000 थाळ्यांचे वितरण
- सोयाबीन न उगविलेल्या 653 शेतकऱ्यांना 28,31,735 रूपयांची नुकसान भरपाई
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : राज्य आपल्या स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. मात्र सध्या आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या अभूतपुर्व संकटातून जात आहोत. कोरोनाला मात देण्यासाठी राज्य शासन सर्व ताकदीनिशी लढत आहे. शासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली आहे. कोरोनाशी लढत आपली अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. केंद्र शासनाने आत्मनिर्भर अभियानाची घोषणा करीत अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोनाशी लढत जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात संपन्न करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतीपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे, जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात येत असलेला प्रत्येक निर्णय, दिलेली प्रत्येक सूचना याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अगदी मनापासून काम करीत असल्याचे सांगत पालकमंत्री महणाले, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स, महसूल, पोलीस तसेच अन्य सर्व प्रशासनाचे विभाग, आमचे सफाई कर्मचारी कोरोनाच्या या लढाईत सर्वात पुढे आहेत. आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील बाराशे पेक्षा जास्त कोरोना रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. नुकतेच जिल्हा मुख्यालयी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने अद्ययावत 100 बेडचे कोविड समर्पित रूग्णालय रूग्णांच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे. तसेच देऊळगांव राजा येथे 20 बेडचे रूग्णालय कार्यान्वीत करण्यात आले आहे. कोरोना विषाणू निदान करण्यासाठी बुलडाणा येथे RTPCR प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोना चाचणींची संख्या वाढून कोरोना निदान लवकर करणे शक्य होणार आहे.
ते पुढे म्हणाले, शासनाने 1 एप्रिल 2015 पासून ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत व्याजासह मुद्दल असलेले 2 लाख रूपये पिक कर्ज माफ केले आहे. त्यासाठी सरसकट कर्जमुक्ती देणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 59 हजार 534 लाभार्थी शेतकऱ्यांना 1 हजार 59 कोटी रूपये त्यांच्या थेट कर्ज खात्यात जमा झाले आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा बँकेमार्फत 1 लक्ष 17 हजार 524 शेतकऱ्यांना 935.11 कोटी रूपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषि निविष्ठा खरेदी करणे सोयीचे झाले. शासनाने हमीभावाला यावर्षी मागील 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यामध्ये कापूस पणन महासंघ, सीसीआय यांच्या माध्यमातून 87 हजार 278 शेतकऱ्यांकडून 26 लक्ष 78 हजार 329 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शासनाने 19 हजार 842 शेतकऱ्यांची 2 लक्ष 4 हजार 27 क्विंटल तूर खरेदी केली आहे.
प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2019-20 मध्ये जिल्ह्यातील 2 लक्ष 38 हजार 278 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी 1 लक्ष 29 हजार 968 शेतकऱ्यांना 189.50 कोटी रूपयांचा लाभ प्राप्त झाला आहे. तसेच या खरीपात सन 2020-21 अंतर्गत 2 लक्ष 88 हजार 734 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतकऱ्यांना थेट बांधावर खते व बियाणे पुरवठा मोहिम राबविण्यात आली. मोहिमेत 1218 शेतकरी गटांनी 20 हजार 228 शेतकऱ्यांना 582 मेट्रीक टन बियाणे व 7 हजार 993 मेट्रीक टन खते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात सौर कृषी पंप योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात 1706 सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत. शेतीमध्ये अपारंपारिक उर्जेचा वाढता वापर हे शेती क्षेत्राच्या उल्लेखनिय प्रगतीचे लक्षण असल्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात कृषी विभागाने जिल्ह्यात 1264 शेतकऱ्यांनी व 46 शेतकरी गटांनी 95 ठिकाणी 47.2 मेट्रीक टन भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना विक्री केली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी सदोष बियाण्यांमुळे अडचणीत सापडला. सोयाबीन बियाणे उगवन न झालेल्या 653 तक्रारदार शेतकऱ्यांना 28 लक्ष 31 हजार 735 रूपयांची नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली आहे. कोरेाना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शासनाने माहे एप्रिलपासून शिधापत्रीकाधारक कुटूंबातील प्रती व्यक्तीस पाच किलो मोफत तांदूळ वितरीत केला. तसेच या कोरोनाच्या संकट काळात गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना नाममात्र पाच रूपये दरात जिल्ह्यात 17 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दररोज दोन हजार शिव भोजन थाळी ‘पॅकींग फुड’ स्वरूपात देण्यात येत आहेत. जिल्ह्यात एप्रिल ते जुन या कालावधीत 1 लक्ष 73 हजार 679 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकासासाठी शासन काम करीत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, सिंदखेड राजा विकास आराखडा, लोणार सरोवर विकास आराखडा तसेच मेहुणा राजा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. मेहुणा राजा येथील संत चोखामेळा जन्म स्थळाचा विकास करण्यात येत आहे. पायाभूत सोयी सुविधा उभारून पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निश्चितच या परीसरातील रोजगारात वाढ होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून 11 हजार 863 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. सद्यस्थितीत 1 हजार 152 घरकुलांचे काम मंजूर करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात रमाई, शबरी व पारधी घरकूल योजनांच्या माध्यमातूनही घरकुल बांधून देण्यात येत आहे. जिल्ह्याला संपन्न करणाऱ्या पुर्णा नदीवरील जिगांव प्रकल्प पुर्ण करण्यासाठी अधिकचा निधी मिळावा, यासाठी नुकतीच मुंबईत बैठक झाली. पहिल्या टप्प्यातील 22 गावांमधील बाधीत जमिनी, झाडे, घरांचा मोबदला वाटप व प्रकल्पात पाणी साठवून सिंचन क्षेत्र निर्माण करण्याचे नियेाजन आहे. जिगांव सोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघु प्रकल्पांची कामे सुरू आहे. तसेच बोरखेडी, दुर्गबोरी, निम्न ज्ञानगंगा, दिग्रस लघु प्रकल्प पुर्ण करण्यात आले आहे.
आरोग्यासाठी घातक असणाऱ्या गुटख्याची राज्यात होणारी अवैध विक्री हद्दपार करण्यात येत आहे. जिल्ह्यात जानेवारी ते आजपर्यंत 64 लक्ष 46 हजार 68 रूपये किमतीच्या प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. जागतिक कोविड आजाराचे प्रादुर्भाव जिल्ह्यातही पाहावयास मिळत आहे. कोविड आजारावर मात करण्यासाठी सॅनीटायझर, मास्कचा पुरवठा जनतेस पुरेशा प्रमाणात करण्यात येत आहे. सॅनीटायझर, मास्क व कोविड संदर्भातील औषधांच्या किंमती नियंत्रीत करण्यात आल्या आहेत. औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्याचा निर्धारही यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान तंबाखू मुक्तीची शपथ पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सेनानी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, नर्सेस, कोरोनापासून मुक्त झालेला रूग्ण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहीद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या कुटूंबीयांना धनादेश वितरण
जम्मू काश्मिर राज्यात बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर या ठिकाणी कार्यरत असताना आतंकवाद्यांनी पेट्रोलिंग पार्टीवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युतर देताना जिल्ह्यातील पातुर्डा ता. संग्रामपूर येथील सीआरपीएफचे जवान चंद्राकांत भगवंतराव भाकरे हे 18 एप्रिल 2020 रोजी शहीद झाले. राज्य शासनामार्फत शहीद जवानांच्या अवलंबितांना द्यावयाच्या मुख्यमंत्री कारगिल निधीमधून 50 लक्ष रूपये आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते वरपत्नी मनिषा चंद्राकांत भाकरे, वीरपिता भगवंतराव नारायण भाकरे, वीरमाता निर्मलाबाई भगवंतराव भाकरे यांना प्रदान करण्यात आला.
******
महिला व बालविकास भवन कक्षाचे पालकमंत्री यांच्याहस्ते उद्घाटन
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : महिला व बालविकासच्या संदर्भातील सर्व योजना, उपक्रम यांची माहिती देण्यासाठी व सर्व कार्यालयाच्या एकत्रित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बालविकास भवन अस्तित्वात येणार आहे. या भवनच्या कक्षाचे उद्घाटन जिल्हा परीषदेमधील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज करण्यात आले. यावेळी जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, जिल्हाधिकारी षण्मुखराजन,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रामरामे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दरम्यान पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, महिला व बालविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या महिला व बालविकास कक्षाच्या माध्यमातून करण्यात यावी. नविन महिला व बालविकास भवनसाठी जागा बघून प्रस्ताव तयार करावा. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या जागांचा शोध घ्यावा. विभागातंर्गत असणारे कार्यालय, विभाग व योजनांचा पसारा मोठा आहे. त्यामुळे स्वतंत्र भवन आवश्यक आहे.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. रामरामे यांनी कक्षाविषयी माहिती दिली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, महिला आयोगाचे कार्य व योजना, एकात्मिक बालविकास प्रकल्पातंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना आदींविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला महिला व बालविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी स्मार्ट ग्राम स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथील सरपंचा श्रीमती कदम यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, जिल्हाधिकारी षण्मुखराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment