राष्ट्रध्वजाचा राखा सन्मान.. वाढेल देशाचा अभिमान !...
· हँण्ड स्पून राष्ट्रध्वज पायदळी तुडवू नका
बुलडाणा,(जिमाका) दि.13 : दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लास्टीकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले दिसतात, असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्ड स्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीमध्ये असावा. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती, त्याची उंची व रुंदी 3:2 असावी. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात पुढीलप्रमाणे असायला पाहिजे. त्याचा आकार प्रकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 - लांबी, रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मी.मी, प्रकार 2 – लांबी व रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3- लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4- लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 - लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7- लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8- लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 - लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मी.मी असावी. राष्ट्रध्वजाचा व्हीव्हीआयपी विमानासाठी आकार 450 बाय 100 मी.मी, मोटार कारसाठी 225 बाय 150 मी.मी आणि टेबलसाठी 150 बाय 100 मी.मी असावा.
भारतीय ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेल्या, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट व अन्य राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्या वेळी विद्यार्थी व नागरिक प्लास्टीक राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. याठिकाणी पायदळी तुडविलेले राष्ट्रध्वज गोळा करून तालुका व जिल्हा स्तरावर निर्मित करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहे. त्यांनी असे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावे. खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सुर्यास्तानंतर व सुर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक जाळून नष्ट करावे. हे करताना उपस्थितांनी उभे रहावे व जाळून पुर्णपणे नष्ट होईपर्यंत जागा सोडू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून युवक – युवतीचे समुपदेशन
बुलडाणा,(जिमाका) दि.13 : सद्यास्थित कोविड -19 मुळे राज्यात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतीसाठी रोजगाराच्या संधीबाबत माहिती मिळावी या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा व खामगांव येथील गो. से महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन वेबिनार मार्फत कौन्सीलींगाचे आयोजन गुगल्स मीटच्या माध्यामातून करण्यात आले होते .
सदर ऑनलाईन वेबिनार सत्रामध्ये पुणे येथील डॉ. प्रशांत पवार, खामगांव येथील गो. से महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एस. तळवनकर, महालक्ष्मी कृषी विद्यालय, माटरगांव ता. शेगांव येथील कृषी विद्यालयाचे अनुप वानखडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु .रा झळके उपस्थित होते.
वेबिनार सत्रामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना मार्गदर्शनामध्ये कॅरिअर निवडतांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने स्वत:मधले कौशल्य कसे विकसित करावे, कौशल्य विकासामुळे होणारे फायदे, 10 वी व 12 वी नंतरचे वेगवेगळया क्षेत्रामधील उपलब्ध संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. पुणे येथील करिअर कौन्सीलचे प्रशांत पवार यांनी उमेदवारांना करिअरच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध असून योग्यप्रकारे नियोजन केले तर शासकीय व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रात यश मिळवता येते. त्याचप्रमाणे करिअर निवडतांना कोणकोणत्या गोष्टी उमेदवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे, स्वत:मधील कौशल्य कशाप्रकारे विकसित करावी जेणेकरुन उमेदवारांची योग्य दिशेने वाटचाल होईल, याबाबत उमेदवारांना सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर डॉ. प्रशांत पवार यांनी उमेदवारांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
तसेच गो. से. माविद्यालय खामगांवचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवनकर यांनी ऑनलाईन वेबिनारमध्ये कोरोना च्या परिस्थितीमध्ये मुबलक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. सहाय्यक आयुक्त श्री. झळके यांनी रोजगारांच्या कोणकोणत्या उपलब्ध असलेल्या संधी, वेबपोर्टलवर नोंदणी कशी करावी या बद्दल मार्गदर्शन केले. विविध जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ कशाप्रकारे घ्यावा याबाबत उमेदवारांना सविस्तर मार्गदर्शन केले.
संचालन व आभार प्रदर्शन गो. से. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्हि. एस. आठवर यांनी केले. या कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थी गुगल मीटद्वारे सहभागी झाले होते, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोरोना अलर्ट : प्राप्त 212 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 38 पॉझिटिव्ह
- 2 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.13 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 250 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 212 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 38 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 29 व रॅपिड टेस्टमधील 9 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 82 तर रॅपिड टेस्टमधील 130 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 212 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा : 1, भावसार देवी मंदीराजवळ 1, शिवाजी नगर 2, दे. राजा : माळीपुरा 1, कोलारा ता. चिखली : 2, चिखली : 4, सोनेवाडी ता. चिखली : 1, बुलडाणा : सोळंके ले आऊट 1, विष्णूवाडी 1, चैतन्यवाडी 1, पिंपळगांव सराई ता. बुलडाणा : 1, धाड ता. बुलडाणा : 2, मलकापूर : 3, सुलतानूपर ता. लोणार : 1, तपोवन ता. मोताळा : 1, भालेगांव ता. मलकापूर : 3, झोडगा वसर ता. खामगांव : 1, खामगांव : जुना फैल 3, अनिकेत रोड 3, घाटपुरी नाका 1, गोपाल नगर 1, खती ले आऊट 1,शेगांव: धनोकार नगर 1, सुरभी कॉलनी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 38 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे नांदुरा येथील 50 वर्षीय पुरूष व चैतन्यवाडी, बुलडाणा येथील एका 77 वर्षीय पुरूष रूग्णांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे.
तसेच आज 2 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : 2.
तसेच आजपर्यंत 13225 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1234 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 1234 आहे.
आज रोजी 126 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 13225 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 2067 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 1234 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 795 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 38 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
कोरोना संसर्ग सुरक्षेचे नियम पाळून स्वातंत्र्य दिन कार्यक्रमांचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.13 : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिन शनिवार, 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता, दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यावर मर्यादा येणार आहेत. या कार्यक्रमासाठी काहीच लोकांना निमंत्रीत करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग सुरक्षा नियम पाळून यावेळी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 9.05 वाजता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे.
संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होणार आहे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. दिवसभरात वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीने वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध स्पर्धा व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. कोरोना विषाणू संसर्गाची व्याप्ती लक्षात घेता कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करावा, याची खबरदारी आयोजकांनी घ्यावयाची आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. सदर दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करू नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजे नंतर आयोजित करावा. अशा सूचना शासनाने परिपत्रकान्वये दिलेल्या आहेत.
No comments:
Post a Comment