Monday, 6 July 2020

DIO BULDANA NEWS 6.7.2020


जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 7 ते 21 जुलैपर्यत लॉकडाऊन
-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
  • सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच सर्व दुकाने उघडण्यास परवानगी
  • त्याचदिवशी दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत कडक कर्फ्यु
  • बुलडाणा येथे तपासणी प्रयोगशाळेसाठी प्रस्ताव सादर
  • जालना येथूनही होणार जिल्ह्यातील कोरोना तपासण्या
  • जिल्ह्यात 2000 रॅपिड अँटीजेंट टेस्ट किट उपलब्ध
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. 7 जुलै ते 21 जुलै 2020 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी नियमांचे पालन करीत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियेाजन समिती सभागृहात पालकमंत्री यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मलकापूरचे आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ उपस्थित होते.
  जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यात यापूर्वीच 15 जुलैपर्यंत प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश लागू केले असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या तालुक्यांमध्ये 15 जुलै नंतर 21 जुलै पर्यंत जिल्ह्याचे एकत्रित आदेश लागू होणार आहेत. मलकापूर उपविभाग वगळता या लॉकडाऊन कालावधीत सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उघडण्यास मुभा असणार आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत अत्यंत कडक कर्फ्यु लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाकडून पासेस वितरीत करण्यात येतील. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. जिल्ह्यात प्रशासनाने चांगले कार्य करीत, समन्वय ठेवीत कोरोनाला नियंत्रीत ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे.
  ते पुढे म्हणाले, बुलडाणा येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. या लॅबचा अंदाजीत खर्च 1.50 कोटी रूपये आहे .तसेच डॉक्टरसह 10 मनुष्यबळ  लॅबसाठी लागणार आहे. जिल्ह्यातील नमुने तपासणीसाठी अकोला, यवतमाळ व नागपूर येथे पाठविण्यात येत आहेत. पुढील काळात जालना येथे तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत असून याठिकाणी जिल्ह्यातील नमुने तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नमुन्यांचे निदान लवकर होणार आहे. त्याचप्रमाणे जलद तपासणीसाठी 2000 रॅपिड ॲन्टीजेंट टेस्ट किट जिल्ह्याला मिळाल्या आहेत. या माध्यमातून 30 मिनीटात निदान होणार आहे.
  लॉकडाऊन काळात दुचाकीवर एक, चार व तीन चाकी वाहनांमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना परवानगी असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या काळात अत्यावश्यक असणाऱ्यांनीच बाहेर पडावे. विनाकारण कुणीही बाहेर फिरू नये. सर्वांनी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल वापरावा. चेहऱ्यावर काही बांधलेले नसल्यास दंड आकारण्यात येईल. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रत्येकाने स्वत:जवळ छत्री ठेवावी. जेणेकरून पावसापासून बचाव होईल व आपोआप सोशल डिस्टसिंग नियमाचे पालन होईल.   
कोरोनाची सांख्यिकी
  जिल्ह्यात विदेशातून आलेल्या 3026 नागरिकांची तपासणी करण्यात आली. सध्या गृह विलगीकरणात 3352 नागरिक असून संस्थात्मक विलगीकरणात 484 नागरिक आहेत. आयसोलेशनमध्ये 118 नागरिक आहेत. आतापर्यंत 3832 नमुने तपासणी करण्यात आले. त्यामध्ये 300 पॉझीटीव्ह, 3106 निगेटीव्ह व 372 नमुने प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत 190 रूग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण 105 प्रतीबंधीत क्षेत्र असून 20 कमी झाले आहेत. सध्या 85 प्रतिबंधीत क्षेत्र आहेत.                        
*******
कोरोना अलर्ट : जिल्ह्यात पॉझीटीव्ह अहवाल प्राप्त होणारी चेन ‘ब्रेक’
  • 14 रूग्णांनी केली कोरानावर मात, 31 अहवाल निगेटीव्ह
  • आज एकही पॉझीटीव्ह अहवाल नाही
बुलडाणा,(जिमाका) दि.6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. संपूर्ण 31 अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना संसर्ग  अहवाल प्राप्त होत असल्याची चेन आज ब्रेक झाली आहे. आज एकही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही.
      तसेच आज 14 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये घासलेटपुरा नांदुरा येथील 43 वर्षीय पुरूष, वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील 51 वर्षीय पुरूष, निवाणा ता. संग्रामपूर येथील 34 व 46 वर्षीय पुरूष, राणी पार्क जळगांव जामोद येथील 67 वर्षीय पुरूष, 53 व 56 वर्षीय पुरूष रूग्णांचा समावेश आहे.  तसेच आळसणा ता. शेगांव येथील 45 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरूणी, 18 वर्षीय तरूण, 33 वर्षीय पुरूष, 11 वर्षीय मुलगा व 72 वर्षीय महिला रूग्णांना आज वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
    आजपर्यंत 3106 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 190 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 190 आहे.  तसेच आज 6 जुलै रोजी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 31  निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 372 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 3106 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 300 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 190 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 97 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 13 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
                                                                        ***********

निकृष्ट सोयाबीन बियाणे संदर्भात तक्रारी द्याव्यात
  • कृषि सभापती यांचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.6 : या वर्षी खरीप हंगामात विविध बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना विक्री केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाले असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे शेतामध्ये पेरले आहे. मात्र पेरल्या गेलेल्या या दोन्ही बियाण्यांची उगवन न झाल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. तरी या खरीप हंगामात रासायनिक खते, किटकनाशके व बियाणे संदर्भात शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास संबंधीत पंचायत समिती, कृषि अधिकारी यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. अशा तक्रारींची तातडीने दखन न घेतल्यास कृषि सभापती यांचेकडे तक्रारी द्याव्यात, असे आवाहन कृषि व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र सदाशिव पळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                                ******

No comments:

Post a Comment