Thursday, 2 July 2020

DIO BULDANA NEWS 2.7.2020

जिल्हाधिकारी कार्यालयात
6 जुलै रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन यावेळी सोमवार दि. 6 जुलै 2020 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
********
                        जिल्ह्यात टाळेबंदीची मुदत 31 जुलैपर्यंत वाढविली
·        सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत
        ·       आरोग्यसेतू ॲप वापरण्याचे आवाहन
·        रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू
·        सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक, थुंकण्यास बंदी
बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने देशभर 30 जुन 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्य शासनाने राज्यभर 31 जुलै 2020 पर्यंत टाळेबंदीला मुदतवाढ दिली आहे.  त्यानुसार  जिल्ह्यात टाळेबंदी 31 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याचे  नवीन आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लागू केले आहेत. या कालावधीत सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 5 या वेळेत कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकाने / बाजारपेठ येथे गर्दी किंवा सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आल्यास बाजारपेठ व दुकाने बंद करण्यात बाबतचे आदेश काढण्यात येणार आहे. दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची काळजी दुकान मालकाने घ्यावी. दुकानात ग्राहकामध्ये 6 फुटाचे अंतर असावे.
    सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनीटायझेशन या अटींसह  जिल्ह्यातंर्गत बस वाहतूकीस 50 टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी आहे.  जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. या काळात कुणीही विनाकारण बाहेर फिरू नये. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, शारिरीक अंतर राखणे (किमान 6 फूट)  बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने थुंकणे गुन्हा आहे. अशा व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
   आरोग्य सेतू वापरामुळे कोव्हिड 19 आजाराच्या प्रादुर्भावाबाबत त्वरित सूचना मिळते. त्याचा फायदा व्यक्तीश: व समाजाला सुद्धा होतो. त्यामुळे ॲण्ड्राईड फोनचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे.  जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.  
   जिल्ह्यात या सेवांना दिली परवानगी : जिल्ह्यात पुढील परवानगी / मुभा देण्यात येत आहे. सदर मुभा ही घोषित करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोन व मलकापूर उपविभागाकरीता लागू असणार नाहीत.   आंतरजिल्हा संचार करण्यास मलकापूर उपविभाग वगळता परवानगी असेल. संपूर्ण मालवाहतूकीस राज्या बाहेर जाण्यास व येण्यास परवानगी असणार आहे.  सर्व दुकाने / बाजारपेठा (अत्यावश्यक सेवा वगळून) सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व मेडीकल, दवाखाने व तत्सम सेवा, अत्यावश्यक सेवा 24 तास सुरू राहण्यास परवानगी असेल.  
  विवाह समारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या मर्यादीत उपस्थितीने खुले लॉन, विना वातानुकूलीक मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत करता येईल, यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल.  अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी राहील. निर्बंधासह खुल्या मैदानात व्यायाम करण्यस मुभा असेल. खाजगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, हॉटेल्स/ रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थांची केवळ पार्सल घरपोच सुविधा सुरू करण्यास परवानगी आहे. त्याचप्रमाणे एका व्यक्तीसह दुचाकी, चालकासह दोन व्यक्तींसाठी थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांना परवानगी राहील. ऑनलाईन / आंतर शिक्षण देण्यास मुभा आहे. तसेच शासनाने वेळोवेळी परवानगी दिलेल्या शाळा सुरू करण्यात येतील.
   जिल्ह्यात ह्या सेवा प्रतिबंधीत असणार आहे : जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात येत असून जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीस विना परवानगी बंदी असेल, सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील,  सर्व सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर,  शॉपिंग मॉल, बार व तत्सम, असेंब्ली हॉल,  सामुहिक खेळांसाठी क्रीडा कॉम्प्लेक्स बंद राहतील, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे भविकांसाठी बंद राहतील.  तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे आदी बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने, चहा कॉफी सेंटर, पानठेला बंद राहतील. तसेच कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम बंद राहतील. विकलेले कपडे बदलवून देण्याचे धोरण अवलंबू नये. तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे नियम : कामाच्या ठिकाणी हॅण्ड वॉश, सॅनीटायझर, प्रवेश व जाण्याच्या ठिकाणी ठेवावे. तसेच कामाच्या ठिकाणी नियमित सॅनीटायझेशन, नागरिकांच्या प्रवेश ठिकाणी सर्व सुरक्षा बाळगावी. सोशल डिस्टसिंग, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल ठेवावा.  वारंवार निर्जंतुकीकरण करावे.
   या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,  भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
*******
खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू
  • शेतकऱ्यांनी 31 जुलै 2020 पर्यंत योजनेत सहभाग घ्यावा
  • कापूस व सोयाबिनला 45 हजार रूपये विमा संरक्षण
  • प्रति हेक्टरी कापसाला 2250, तर सोयाबीनला 900 रूपये हप्ता
  • जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त
  • सन 2020-21, 2021-22 व 2022-23 तीन वर्षासाठी पिक विमा
बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढील तीन आर्थिक वर्षासाठी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये सन 2020-21, 2021-22 व 2022-23 वर्षांचा समावेश आहे. ही योजना आता खरीप व रब्बी हंगामातील अधिसुचीत पिकांकरीता लागू करण्यात आली असून  या योजनेची खरीप हंगाम 2020 ची अंतिम दिनांक 31 जुलै 2020 आहे. या योजनेकरीता खरीप ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तुर, कापूस व मका पिके अधिसुचीत करण्यात आली आहे.
    शेतकऱ्यांना शेतमालच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामुहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबींकरीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. खरीप हंगाम सन 2020-21 पासुन योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत.   या योजनेसाठी जिल्ह्याकरीता रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लि. ब्लॉक अे, हेरिटेज हाऊस, तळ मजला, 6 अ, रमाबाई आंबेडकर, पुणे- 411001 या  कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे.
    अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणुन या हंगामापासून गावपातळीवर अधिकची सुविधा म्हणुन आपले सरकार सेवा केंद्राद्वारे म्हणजेच महा ई सेवा केंद्रावर सदर योजनेत सहभागी होता येणार आहे. विमा अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. किंवा पिक विमा www.pmfby.gov.in या पोर्टलवर थेट अर्ज करू शकतील. तरी शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलै 2020 पर्यंत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.  विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबबतची सुचना विमा कंपनी संबंधित बँक, कृषि / महसुल विभाग, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ब्लॉक अे, हेरिटेज हाऊस, तळ मजला, 6 अ, रमाबाई आंबेडकर, पुणे – 411001 ई मेल rgicl.maharashtraagri @relianceada.com टोल फ्री क्रं 18001035499 या क्रमांकावर कळविण्यात यावी.
  योजनेत सहभागासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एन. एम नाईक यांचेवतीने करण्यात येत आहे.   
-         असा आहे विम्याचा हप्ता व संरक्षीत रक्कम
  पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे – खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 25 हजार, हप्ता 500 रूपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 35 हजार, हप्ता 700 रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 20 हजार, हप्ता 400 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 20 हजार, हप्ता 400 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 45 हजार, हप्ता 900 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 45 हजार, हप्ता 2250  रूपये राहणार आहे.
                                                            अर्ज भरताना ही लागणार कागदपत्रे
अर्ज भरताना आपला फोटो असलेल्या खातेपुस्तकाची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टे करार असलेलया शेतकऱ्याचा करारनामा / सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र,  आधार कार्ड प्रत, आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती किंवा किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉबकार्ड कार्ड, वाहन चालक परवाना व मतदान ओळखपत्र यापैकी एक पुरावा सोबत आणावा.
*******
कोरोना अलर्ट : प्राप्त 94 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 7 पॉझिटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.2 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 101 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 94 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये खामगांव येथील 18 वर्षीय महिला व 32 वर्षीय महिला, साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 35 वर्षीय महिला, शक्तीनगर मलकापूर येथील  75 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 24 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 19 वर्षीय तरूण व  माळवंडी ता. बुलडाणा येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रूग्ण पॉझीटीव्ह आढळले आहे.
 तसेच आजपर्यंत 2792 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 154 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 154 आहे.  तसेच आज 2 जुलै रोजी 101 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 7 पॉझीटीव्ह, तर 94 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 293 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2792 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 260 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 154 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 94 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 12 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment