Friday, 17 July 2020

DIO BULDANA NEWS 17.7.2020

डाक विभागाच्यावतीने स्टॅम्प डिझाईन स्पर्धेचे आयोजन
बुलडाणा, दि.17 (जिमाका) : भारतीय डाक विभागाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर स्टँम्प डिझाईन (फोटोग्राफी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी युनेस्को वर्ल्ड हेरीटेज साईट ईन इंडिया (कल्चरल) हा विषय आहे. स्पर्धेचा कालावधी 27 जुलै 2020 पर्यंत असणार आहे. सदर स्पर्धेसाठी सर्व वयोगटातील भारतीय नागरीक सहभागी होवू शकतात. त्यासाठी स्वत: काढलेले वरील विषयाशी संबधीत छायाचित्र MY GOV पोर्टलवर https://www.mygov.in/task/design-stamp-themed-unesco-world-heritage-sites-india-cultural  या लिंकवर अपलोड करावे. ज्याचे अनावरण 15 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 50 हजार, द्वितीय 25 हजार व तृतीय 10 हजार रूपये रोख देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ पाच स्पर्धकांना 5000/- रूपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचा अंतिम दिनांक 27 जुलै आहे. तरी या स्पर्धेत नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन डाक अधिक्षक, डाक कार्यालय यांनी केले आहे.
                                                                        **********
सोयाबीन, मुंग व उडीद पिकास युरीयाच्या दुसऱ्या मात्रेची आवश्यकता नाही
  • युरीयाचा वारेमाप वापर करू नये
  • जिल्हा कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा, दि.17 (जिमाका) : जिल्ह्यात खरीप हंगामात एप्रिल पासून आजअखेर 21 हजार मेट्रीक टन युरीया, 19 हजार 900 मे. टन डीएपी, 2150 मे. टन एमओपी, संयुक्त खते 43 हजार मे.टन व एसएसपी 12 हजार 200 मे.टन खतांचा पुरवठा झालेला आहे. खताच्या विक्री अहवालानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा व विशेषत: युरीयाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.सोयाबीन, मुंग व उडीद पिक द्विदल वर्गीय असल्यामुळे या पिकांच्या मुळांशी नैसर्गिक गाठी असतात. या गाठीद्वारे हवेतील उपलब्ध असलेले नत्र शोषून घेवून पिकास उपलब्ध होते. त्यामुळे या पिकांना युरीयाची दुसरी मात्रा देण्याची आवश्यकता नाही. मात्र जिल्ह्यातील शेतकरी पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी परत युरीया देताना दिसत आहे. ही शास्त्रीय दृष्ट्या चुकीची पद्धत असून त्यामुळे पिकांची केवळ कायिक वाढ मोठ्या प्रमाणात होते. पंरतु फुले व फळधारणा कमी होऊन व मुळांवरील गाठी निष्क्रीय होऊन उत्पादनात घट येते.
    त्याचप्रमाणे नैसर्गिक नत्र उपलब्ध होत असुनही परत नत्रयुक्त खते दिल्याने खतांवरील खर्चही वाढतो.  तसेच हिरवेगार पिक किडींना आकर्षित करून किडींचा प्रभाव वाढतो. पाऊसाचा खंड पडल्यावर अशा परिस्थितीत पिकांवर ताण पडतो. तरी शेतकरी बंधुंनी नत्र, स्फुरद व पालाश खतांचा संतुलीत व जमिन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीच्या मात्रेनुसार खते देण्यात यावी. तसेच पिकांना कुठलेच खत फेकून देवू नये. खत पिकांच्या मुळाशी, मातीच्या आड, डवऱ्याच्या मागे द्यावे. खत फेकून दिल्यास हवेमुळे ते उडुन जाते व पाऊस पडल्यानंतर ते वाहून जाते. त्याचा फायदा पिकाला होत नाही. याशिवाय जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खते उपलब्ध आहे. त्यामुळे खते खरेदी करण्यासाठी कृषि केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये. त्याचप्रमाणे खतांचा साठा करून ठेवू नये. सद्यस्थितीत कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर कृषि सेवा केंद्रावर कृषि निविष्ठा खरेदी करतांना सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. तसेच शेतकऱ्यांनी युरीया खताचा वारेमाप वापर करू नये, असे आवाहन कृषि विकास अधिकारी , जि.प बुलडाणा श्रीमती महाबळे यांनी केले आहे.
                                                                                    ****


जिल्ह्यात 20 जुलैपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन
       बुलडाणा, दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा मार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर मेळावे 20 जुलै 2020 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी एकूण 400 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
   पात्र पुरूष व महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळावा ऑनलाईन आयोजित करण्यात आलेला असून या मेळाव्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही. कौशल्य विकास विभागाच्या www. mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर  नाव नोंदणी केलेल्या दहावी, 12 वी, पदवी, पदविका, आयटीआय उत्तीर्ण, पदव्युत्तर उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डाचा आयडी व पासवर्ड चा वापर करून आपले लॉग ईन मधून ऑनलाईन अर्ज करावा.  यात सहभागी होऊन रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरीता सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात. तरी आजच आपल्या सेवायोजन कार्डच्या आयडी व पासवर्डचा वापर करून आपले लॉग इन मधून ऑनलाईन अर्ज करावे.
  तसेच नोकरी इच्छूक उमेदवारांनी देखील ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी  महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध रिक्त पदांना ऑनलाईन अप्लाय करावे. उद्योजकांकडून उमेदवारांच्या मुलाखती टेलिफोन अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
 याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाचे 07262 – 242342, 8308942283 व 9922738712 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे. 
********
मका पिकावरील अमेरीकन लष्करी अळीचे व्यवस्थापन करावे
  • कृषि विभागाचे आवाहन
 बुलडाणा, दि. 17 (जिमाका) :  मका पिकावर अमेरीकन लष्करी अळीचे जिवनक्रम अंडी, अळी,कोष, व पतंग अशा चार अवस्थेत पुर्ण होतो. एक मादी सरासरी 1500 ते 2000 अंडी देऊ शकते. पुंजक्यात घातलेली अंडी घुमटाची आकाराची
असुन अंडी अवस्था सुमारे दोन ते तीन दिवसांचे असते. अळी अवस्था 15 ते 30 दिवसात सहा वेळा कात टाकुण पुर्ण होते. प्रथम अवस्थेतील अळी आकाराने लहान, रंगाने हिरवी असुन त्याचे डोके काळ्या रंगाचे असते. दुस-या अवस्थेत अळीचे डोके नारंगी रंगाचे असते. तिसऱ्या अवस्थेत अळीच्या शरीराच्या दोन्ही बाजुने पांढ-या रेषा दिसण्यास सुरूवात होते व अळी तपकीरी रंगाची होते. चौथ्या, पाचव्या व सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर उंचवटयासारखे ठिपके दिसतात.
      पुर्ण वाढ झालेली अळी 2 ते 8 सेंमी. जमीनीत जावुन मातीचे आवरण करते आणि आवरणात कोषावस्थेत जाते. हा कोष
लालसर तपकीरी रंगाचा असुन वातावरणानुसार कोषावस्था 8 ते 30 दिवसात पुर्ण होते. प्रौढ पतंग निशाचर असुन उष्ण व दमट वातावरणात सक्रीय असतात. नर पतंगामध्ये समोरच्या पंखावर राखाडी व तपकीरी रंगाची छठा असुन टोकाला त्रीकोणी पांढरे ठिपके असतात. मादीमध्य समोरचे पंख नरापेक्षा कमी चिन्हांकीत असुन एकसमान राखाडी तपकीरी रंगाचे असतात.     
   अशा प्रकारे ही लष्करी अळी आपला जिवनक्रम 30 दिवसात पुर्ण करते.  अमेरीकन लष्करी अळी पाने खाऊन पिकाचे नुकसान करते. नुकत्याच अंडयातुन बाहेर आलेल्या अळया पाणाचा हिरवा पापुद्रा खातात. या अळया मक्याच्या पोंग्यामध्ये राहुन पानाला छिद्रे करतात.
असे करा अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
 मका पिकात तुर, चवळी, उडीद, घेवडा ईत्यादी कडधान्य वर्गीय आंतरपिकाची 2:1 ते 4:1 या प्रमाणात लागवड करावी. पक्षाव्दारे अमेरीकन लष्करी अळीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रणाचे दृष्टीने पक्षांना आकर्षित करण्यासाठी प्रती एकरी 10 पक्षी थांबे उभारावेत. पिक पेरणीनंतर लगेच प्रती एकरी 4 कामगंध सापळे उभारुन त्यात अडकलेल्या पतंगाची नियमीत पाहणी / सर्वेक्षण करावे. रेती किंवा माती+ चुनकळी यांचे 9:1 या प्रमाणातील मिश्रण पिकाच्या पोंग्यात सोडावे.
 अमेरीकन लष्करी अळीचे प्रादुर्भाव 5 ते 10 टक्के पर्यंत असल्यास खालील पैकी कुठल्याही एका जैविक कीटकनाशकाचे द्रावण पोग्यात सोडावे. मेटा-हायझियम अॅनिसोप्ली अथवा बिव्हेरीया बॅसीयाना 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा एसएनपिव्ही 3 मिली प्रती लीटर पाणी किंवा सुत्रकृमी 20 ग्रॅम प्रती लिटर पाणी. लष्करी अळी चा प्रादुर्भाव हा 5 टक्के पर्यंत असल्यास निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझॅडीरेक्टीन 1500 पीपीएम 5 मिली प्रती लीटर पाण्यात फवारावे.
   रासायनिक व्यवस्थापन :- लष्करी अळी चा प्रादुर्भाव 10 % पेक्षा जास्त आढळुण आल्यास असल्यास क्लोरॅनट्रानीलीप्रोल
18.5 टक्के एस.सी. (80 मीली प्रती एकरी) 0.8 मीली प्रती लिटर पाणी. थायोमेथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 1.5 टक्के झेड.सी. ( 50 मीली /एकर) 0.25 मीली प्रतीलिटर पाणी किंवा स्पिनेटोरम 11.7 टक्के एस.सी. (100 मीली/ एकर) 0.5 मीली प्रती लीटर पाणी किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के एस.जी. (80 ग्रॅम/एकर) 0.4 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे पोंग्यामध्ये द्रावन पडेल त्या पध्दतीने फवारणी करावी म्हणजे अळयांची प्रभावी नियंत्रन करता येईल, असे उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी कळविले आहे.
                                                                                                ********

No comments:

Post a Comment