चार लघुपाटबंधारे प्रकल्प 100 टक्के; सांडवा प्रवाहीत
- नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
बुलडाणा,(जिमाका) दि.30: सततच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये यावर्षी समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाला आहे. जळगांव जामोद तालुक्यातील प्रकल्पांचा अपवाद वगळता लघु पाटबंधारे प्रकल्प तुडूंब होण्याच्या मार्गावर आहेत. खामगांव तालुक्यातील हिवरखेड क्रमांक 1 व 3 व ढोरपगांव तसेच टाकळी लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के पाण्याने भरले असून सांडवा प्रवाहीत झालेला आहे.
सिंचन शाखा जळगांव जामोद यांचे कार्यक्षेत्रातील लघु पाटबंधारे प्रकल्प टाकळी, सिंचन शाखा तांदुळवाडी कार्यक्षेत्रातील ढोरपगांव, हिवरखेड 1 व 3 हे 100 टक्के पाण्याने भरला आहे. या पाचही लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास सदर धरणांचा केव्हाही पूर्ण क्षमतेने सांडवा प्रवाहीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचे खाली नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे. ढोरपगांव लघु पाटबंधारे प्रकल्पाचा सांडवा प्रवाहीत झाल्यास नदी काठावरील 6 गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये ज्ञानगंगापूर, कासारखेड, पिं.राजा, भालेगांव, ढोरपगांव व वडजी भेंडी गावांचा समावेश आहे. तसेच टाकळी धरणाचा सांडवा प्रवाहीत झाल्यास नदीला पूर येवून खामगांव तालुक्यातील भालेगांव व कुंबेफळ ही दोन गावे प्रभावीत होण्याची शक्यता आहे, असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात श्रावणधारांची जोरदार बरसात…!
- सरासरी 15.6 मि.मी पावसाची नोंद
- मेहकर तालुक्यात सर्वात जास्त 23.5 मि.मी पाऊस
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : जिल्ह्यात यावर्षी सुरूवातीपासूनच वरूणराजा कृपादृष्टी ठेवीत दमदार बरसत आहे. सुरूवातीच्या पेरणी झालेली पिके आता फुल, फळधारणेच्या अवस्थेत आहे. मूग, उडीद, भुईमूग, तिळ आदी पिकांना फुले आसली आहेत. तर मका, ज्वारी, कापूस पक्वतेच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत सध्या होत असलेला पाऊस पिकांना लाभदायक आहे. मात्र सततचे ढगाळ वातावरण किंडीसाठी पोषकही आहे. काल जिल्ह्यात श्रावणधारांची जोरदार कमी अधिक प्रमाणात बरसात पाहायला मिळाली आहे. जिल्ह्यात मेहकर तालुक्यात सर्वात जास्त 23.5 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 15.6 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची
बुलडाणा : 6.6 मि.मी (473.2), चिखली : 15.7 (401.9), दे.राजा : 18.8 (338.4), सिं.राजा : 21.1 (426.7), लोणार :7.5 (332.2), मेहकर : 23.5 (373.2), खामगांव : 14.9 (320.8), शेगांव : 8 (384.6), मलकापूर : 23.4 (483.4), नांदुरा : 21 (406.6), मोताळा : 16.3 (276.4), संग्रामपूर : 11.6 (457.8), जळगांव जामोद : 14.2 (433)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5108.2 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 392.9 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 276.4 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे.
जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 40.31 दलघमी (58.15), पेनटाकळी : 34.99 दलघमी (58.35), खडकपूर्णा :68.17 दलघमी (72.99), पलढग : 2.90 दलघमी (38.62), ज्ञानगंगा : 25.27 दलघमी (74.48), मन : 26.49 दलघमी (71.93), कोराडी : 9.80 दलघमी (64.81), मस : 15.04 दलघमी (100), तोरणा : 3.75 दलघमी (47.53) व उतावळी : 14.84 दलघमी (74.99).
खास वितरण व्यवस्थेने पोहोचणार भाऊरायाला ‘राखी’..!
- महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये डाक विभाग सज्ज
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : भावनांची आसक्ती असणारा रक्षा बंधन हा सण थोड्याच दिवसांवर येवून ठेपला आहे. कोरोना विषाणू संसर्गाने यावर्षी सणांचा उत्साह पाहायला मिळत नसला, तरी भारतीय संस्कृतीत सणांचे महत्व काही औरच आहे. त्यामध्ये राखी हा सण आपले महत्व अधोरेखीत करून आहे. दरवर्षी राखींचे टपाल हाताळण्यासाठी डाक विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षी देखील राखी सणासाठी महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलमधील डाक विभाग खास वितरण व्यवस्थेसह सज्ज झाला आहे.
राखी टपालाची प्राधान्य क्रमानुसार बुकींग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफीसमध्ये करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत. यावर्षी हा सण अधिक महत्व गृहीत धरत आहे. कारण आपल्याच शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधामुळे सणासाठी भेट घेता येणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ – बहिण कंटेन्टमेंट झोन किंवा सीलबंद इमारतीमध्ये राहत असतील. या कोविड काळात पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात नक्कीच आनंद येईल, अशी डाक विभागाची धारणा आहे.
रक्षाबंधनाचा सण 3 ऑगस्ट 2020 असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट रविवार रोजी पोस्ट कार्यालयांमध्ये राखी वितरणाची विशेष वितरण व्यवस्था केलेली आहे. प्राधान्यक्रमाने व वेळेत राखी आपल्या भाऊरायाला पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचा वापर करावा, असे आवाहन बुलडाणा डाक अधिक्षक यांनी केले आहे.
अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा
- 10 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : मातंग समाजातील इयत्ता 10 वी, 12वी, पदवी व पदविका, अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमात कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेच्या लाभासाठी गुणांनुसार विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय निवड केली जाते. मातंग समाजातंर्गत येणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादिगं, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या 12 पोट जातीतील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करतेवेळी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो आदीसह सादर करणे आवश्यक आहे. या योजनेकरीता अर्ज साद करण्याची अंतिम तारिख 10 ऑगस्ट 2020 आहे, तरी अंतिम दिनांकाची प्रतीक्षा न करता इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
शेतमजुरांना कार्यक्षमता वाढविण्यासाठी मिळणार कौशल्य आधारीत प्रशिक्षण
बुलडाणा,(जिमाका)दि. 30 : शेतीची उत्पादन्न वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक महत्वाचा आहे. सध्याच्या पिक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची कटाई, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सुक्ष्म सिंचनाची देखभाल दुरूस्ती, रोपवाटीकेतील कामे, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी आदी सर्व कामे ही कौशल्यावर आधारीत आहे. याकरीता शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिल्यास कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास निश्चित मदत होऊन शेतकऱ्यांना सुध्दा मोठा फायदा होणार आहे.
ग्रामिण भागात रोजगार निर्मितीस चालना, सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, कार्यक्षम व्यवसायिक सेवांची शेतक-यांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापुर्ण शेतमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये 1 लक्ष मजूरांना प्रशिक्षित करण्याचे उदिदष्ट ठरविले असून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरूवात करण्यात आलेली आहे. तसेच शेतमजुराचे प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्राशिक्षणाचे प्रमाणपत्र सुध्दा देण्यात येणार असून त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येईल.
सद्यास्थितीमध्ये कापूस व मका या प्रमुख पिकासाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्यामुळे ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने आयोजित करण्यात आलेला आहे. जेणेकरुन किटकनाशक योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाईल.
सदर प्रशिक्षणाबाबत संबंधीत शेतमुजरांनी जिल्हयातील प्रकल्प संचालक, आत्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करुन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे अवाहन संचालक, आत्मा यांनी केले आहे.
अनु. जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य
- बटेर पालन, शेळी पालनकरीता मिळणार अर्थसहाय्य
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ओटीएसपी योजनेतंर्गत 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. पारधी समाजातील नागरिकांना बटेर पालन, शेळी पालन व्यवसाय करीता सदर अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. शेळी पालनासाठी 10 शेळ्या व 1 बोकड करीता जिल्ह्यातील एकूण 40 लाभार्थ्यांकरीता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहे.
सदर योजनेच्या अर्जाचा नमुना पंचायत समिती अंतर्गत पशुधन विकास अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. या अर्जाच्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. या योजनेतंर्गत अर्ज 5 ऑगस्टपासून स्वीकारण्यात येणार असून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2020 राहणार आहे. योजनेतंर्गत 500 जापनीज बटेर पालन नुसार एका लाभार्थ्यास 500 जापनीज बटेर पक्ष्यांचे वाटप करण्यात येईल. या पक्षांकरीता शेड, मांडव, पाडवी आदी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत: स्थानिक साहित्यातून करावयाची आहे.
लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर लाभार्थ्याने पक्षी संगोपनाकरीता उपरोक्त प्रकल्पात नमूद आकारमानानुसार निवाऱ्याची (पिंजरा) सोय केलेली असणे आवश्यक आहे. अन्यथा लाभार्थ्यास पक्षी पुरवठा करण्यात येणार नाही. निवाऱ्याची सेाय उपलब्ध असल्याबाबत संबंधीत पशुवैद्यकीय संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. पारधी समाजातील नागरिकांना 10 शेळ्या व 1 बोकड करीता 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. एका लाभार्थ्यास 10 शेळी व 1 बोकडचे वाटप करण्यात येणार आहे. दोन्ही योजनेमध्ये 30 टक्के महिला व 3 टक्के अपंग अर्जदारांचा समावेश असणे आवश्यक आहे. अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील व्यक्तीने यापूर्वी सदर योजनेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जासोबत नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो लावण्यात यावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याच दलालामार्फत किंवा खाजगी व्यक्तीमार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. अशा प्रवृत्तींपासून सावध रहावे. लाभार्थ्यास योजेनचा लाभ हा सन 2020-21 च्या प्राप्त तरतूदीस अधीन राहून देण्यात येणार आहे. तरी पात्र इच्छूक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment