जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'चेस द कोरोना' ही मोहीम राबविणार
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : कोरोनाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात दिवसेदिवस वाढतच चालला असून याला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. जिल्ह्यामध्ये संशयित तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची सर्वेक्षणाद्वारे माहिती संकलित करण्यात येणार आहे. संशयीतांचे एक्स-रे काढून तपासणी करण्यात येवून यामध्ये ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळून येत असल्यास त्या व्यक्तीचा चेस्ट एक्स-रे काढून त्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अशी व्यापक ‘चेस द कोरोना’ मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनामध्ये कोरोना सनियंत्रण समिती टास्क फोर्सची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, कोरोना सनियंत्रण समितीचे सदस्य डॉ. लद्धड, डॉ. तायडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी चेस द कोरोना मोहिम राबविल्यास कोरोनाचा वाढत्या संसर्गाला आळा घालणे सोपे जाणार आहे. शनिवारी आणि रविवारी जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नगरीक या बंद ला उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो व प्रशासनाला अशीच साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच याप्रसंगी औषधांचा साठा व इतर अनुषंगिक बाबींचा आढावाही पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी घेतला.
************
देऊळगाव राजा येथे 20 बेडचे कोरोना हॉस्पिटल लवकरच सुरू करण्यात येणार
-पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
बुलडाणा,(जिमाका) दि. 25 : देऊळगाव राजा तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. सिंदखेड राजा मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आपली प्राथमिकता आहे. मतदारसंघामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे 20 बेडचे कोरोना हॉस्पिटल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या काळात खाजगी दवाखाने देखील पूर्वरत सुरू करण्यात यावे, असे आवाहन पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
तालुक्यामध्ये पॉझिटिव रुग्णांचा व संशयितांचा वाढता संसर्ग बघता या पार्श्वभूमीवर आज देऊळगावराजा येथे पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, तहसीलदार सारीका भगत, नगरपालिका अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री यावेळी म्हणाले, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे सुरू होणाऱ्या कोरोना रुग्णालयास 1975 रॅपिड ॲटींजेंट किट, 50 थर्मल स्कॅनर, 199 पल्स ऑक्सीमीटर व इतर औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कोरोना रुग्णालयासाठी आवश्यक असणारे फिजिशियन व इतर स्टाफ तात्काळ नियुक्त करण्यात येणार आहे. शहरामध्ये वार्ड निहाय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असून यामध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. या टास्क फोर्समध्ये नागरिकांनी सहभाग द्यावा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, मास्क, सॅनिटायझर याचा उपयोग करावा. नियम व कायदे पाळल्यास हे संकट निश्चितच लवकर दूर होईल असा विश्वासही यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***************
No comments:
Post a Comment