सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

 




सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा

                                                    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

* दहावी, बारावी परीक्षेच्या तयारीचा घेतला आढावा

* बुलढाण्यात बारावीच्या ३४,६३५ विद्यार्थ्यांची परीक्षा ; ११६ परीक्षा केंद्र

 

बुलढाणा दि. 11 (जिमाका) : दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते.तसेच बुलढाण्यातून प्र.जिल्हाधिकारी सदाशीव शेलार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून १८ मार्चपर्यंत कालावधीत ३,३७३ परीक्षा केंद्रावर होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

 

कॉपीमुक्त परीक्षेची अंमलबजावणी

 

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाईल इ.) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी , भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना दिल्या.

 

विशेष बैठ्या पथकांची नियुक्ती होणार

सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठया पथकाने परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परिक्षा केंद्रावर पोहोचावे व परिक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे,संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिका-यांची बैठया पथकात नेमणूक करावी. असेही त्यांनी सांगितले.

 

संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर

 संवेदनशील परिक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेराव्दारे आणि व्हिडीओ कॅमेराव्दारे पूर्णवेळ निगराणी करावी, सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग-प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या.

 

बुलढाण्यात बारावीच्या ३४,६३५ विद्यार्थ्यांची परीक्षा ; ११६ परीक्षा केंद्र

 

बुलढाण्यात बारावी परीक्षा आजपासून ते १८ मार्चपर्यंत होणार असून, ३४,६३५ विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान होणार असून, ४०,१९४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यात बारावीचे ११६ व दहावीचे १५९ परीक्षा केंद्र आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एक जिल्हास्तरिय तर १३ तालुक्यात प्रत्येकी एक भरारी पथक नेमण्यात आले आहेत. तसेच कायदा व सुरक्षा व्यवस्थेदृष्टीने परीक्षा केंद्रांवर गस्त घालण्यासाठी पोलीसांचे ३३ पथक आणि जिल्हा परिषद यंत्रणेचे २३ पथक नेमले आहेत.

या परीक्षांवर कडक लक्ष देण्यात येत आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना शांततेत देता यावी यासाठी कॅापामुक्त अभियान राबवले जात आहे. केंद्रावर कॅापी पुरविणाऱ्या पालक, अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बुलढाण्याच्या कॅापीमुक्त अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचे प्र. जिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी यावेळी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या