कुटुंबाच्या आरोग्यावरील खर्चाचे सर्वेक्षण होणार > • सांख्यिकी कर्मचारी देणार निवडक कुटुंबाना भेटी > • नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

कुटुंबाच्या आरोग्यावरील खर्चाचे सर्वेक्षण होणार

> •    सांख्यिकी कर्मचारी देणार निवडक कुटुंबाना भेटी

> •    नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 7: अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत कुटुंबाचा आरोग्यावर होणारा खर्च व मिळणाऱ्या सुविधासंदर्भात सर्वेक्षण केले जाणार आहे. सदर सर्वेक्षण फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025  या कालावधीत सांख्यिकी अधिकारी व कर्मचारीमार्फत निवडक कुटुंबाना भेटी देऊन माहीती गोळा करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सर्व माहिती उपलब्ध करुन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर कुटुंबाचा आरोग्य विषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत महाराष्ट्र राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत माहीती गोळा करण्यात येणार आहे. रॅन्डम पध्दतीने निवड झालेल्या कुटुंबांकडुन मागील 365 दिवसा मध्ये कुटुंबांच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

सदर पाहणी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असुन या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शासकिय व खाजगी रुग्णालयातील उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्य विषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशिल इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. सदर सर्वेक्षणांतर्गत कुटुंबांची निवड 'एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मुल असणारे कुटुंब' आणि ‘मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती' या मधुन करण्यात येणार आहे. सदर सर्वक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे या साठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

 

कुटुंबांकडुन सर्वक्षणाची माहीती घेणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाव्दारे नाशिक येथील कार्यशाळेत सखोल प्रशिक्षण देवुन प्रशिक्षीत करण्यात आले आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अंतर्गत अमरावती विभाग स्तरावरील प्रादेशिक कार्यालय, अमरावती तसेच जिल्हास्तरावरील जिल्हा सांख्यिकी कार्यालय येथील सांख्यिकी सहाय्यक व अन्वेषक संवर्गातील कर्मचारी फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निवडक गावे व शहरी भागातील निवडक भागातील रॅन्डम पध्दतीने निवडक कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्यविषयक माहीती गोळा करतील. या सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या कुटुंबाची आरोग्यविषयक माहिती, रुग्णालयात भरती असतांना आजारपणावर झालेल्या खर्चाबाबतची योग्य व परीपुर्ण माहीती नागरिकांनी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.

000000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या