खामगावातील ‘शासन आपल्या दारी’मध्ये दहा हजार लाभ
*16 विभागांच्या दालनातून योजनांची माहिती
बुलडाणा, दि. 25 : खामगाव तहसील कार्यालयातर्फे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात 10 हजार 640 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. खामगाव तालुका प्रशासनाने गुरुवारी, दि. 25 मे 2023 रोजी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
आमदार अॅड. आकाश फुंडकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या विविध विभागांकडून देण्यात येणारे लाभ पात्र लाभार्थ्यांना एकाच छताखाली देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शासनाच्या 16 विभागांनी माहिती देणारे स्टॉल उभारले होते.
आज खामगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात महसूल विभागाचे 4 हजार 968, पंचायत समिती 1 हजार 300, कृषी विभाग 937, नगरपालिका 784, सहकार व पणन विभाग 384, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1 हजार 874, आरोग्य विभाग 393 अशा एकूण 10 हजार 640 लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. तसेच सलोखा योजनेंतर्गत शिर्ला नेमाने यांना तालुक्यातील पहिल्या अदलाबदल दस्तावेजाचे वितरण आमदार श्री. फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात मदत कक्ष, हिरकणी कक्ष यांच्यासह विविध विभागाचे 16 स्टॉल उभारले. याठिकाणी नागरिकांना योजनांची माहिती आणि पात्र लाभार्थ्याना थेट लाभ वितरीत करण्यात आले. आरोग्य विभागाने आरोग्य शिबीर घेतले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरीकांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबीरात महसूल, पंचायत समिती, नगर विकास, आरोग्य, कृषी, एकात्मिक बालविकास, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, नोंदणी व मुद्रांक, सहकार यासह तालुकास्तरीय विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
देऊळगाव राजा येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर
बुलडाणा, दि. 25 : दहावी, बारावीच्या उमेदवारांना करीअरच्या वाटा आणि त्यातील संधीची माहिती व्हावी यासाठी देऊळगाव राजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवार, दि. 23 मे 2023 रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर घेण्यात आले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सिंदखेडराजा व देऊळगाव राजा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यातर्फे देऊळगावराजा येथे शिबीर पार पडले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. चाटे अध्यक्षस्थानी होते. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उद्योजक भगवान गवई, विवेक मनियार, मोटिवेशनल स्पीकर राहुल राजगुरू, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी, प्राचार्य गणेश भावले, प्र. प्राचार्य श्री. नागरे आदी उपस्थित होते.
श्री. चाटे यांनी बदलते तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण होत असलेल्या संधीबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विद्यार्थ्यांनी आपला स्किल सेट विकसित करत करीअरचा विचार करावा, तसेच शासनाच्या योजनेचा आपल्या उत्कर्षासाठी लाभ करून घ्यावा, असे आवाहन केले. श्री. गवई आणि श्री. मनियार यांनी उद्योजकीय मानसिकता विकसित होण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. श्री. राजगुरू यांनी व्यक्तिमत्व विकासावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्य गणेश भावले यांनी प्रास्ताविक केले. गिरीश वाईकर आणि उद्धव मांटे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. नागरे यांनी आभार मानले.
00000
जळगाव जामोद येथे सोमवारी युवाशक्ती करीअर शिबीर
बुलडाणा, दि. 25 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने जळगाव जामोद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवार, दि. 29 मे रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीर घेण्यात येणार आहे.
आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी एयएमसी अध्यक्ष संजय हावरे उपस्थित राहणार आहे. यावेळी जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव या तीन तालुक्यातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि युवक, पालकांसाठी विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि उद्योगविषयक तहसीलदार समाधान सोनवणे, करीअर मार्गदर्शक सचिन वारूळकर माहिती देणार आहे.
यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य व्ही. एस. पायघन यांनी केले आहे.
00000
सोयाबीन पिकातील विषाणूजन्य मोझॅक, पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन
बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनची लागवडी अधिक प्रमाणात होणार आहे. या हंगामात सोयाबीनचे उत्पादन जादा येण्यासाठी या पिकावरील विषाणूजन्य मोझॅक, पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
मोझॅक लक्षणे ही रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात, रोगग्रस्त झाडांना शेंगा कमी लागतात, रोगग्रस्त झाडांना शेंगा कमी लागतात, रोगाचा प्रसार मावा किडी द्वारे व बियाण्यापासून होतो. तर पिवळा मोझॅक हा रोगग्रस्त झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट, तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात, रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो.
या रोगाचे व्यवस्थापन करताना सुरवातीस रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावी. पिकामधील आणि बांधावरील तण नियंत्रण करावे. रस शोषणाऱ्या किडींना रोखण्यासाठी पिवळ्या चिकट सापाळ्यांचा 15 बाय 30 सेंमी आकाराचे 10 प्रती एकर उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिकांच्या समकक्ष उंचीवर लावावे. उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी पिकांच्या समकक्ष उंचीवर लावावे. उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी 50 टक्के डब्लूजी 3 ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम 25 टक्के डब्लूजी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
00000
No comments:
Post a Comment