संरक्षित सिंचनासाठी शेतकऱ्यांनी शेततळे घ्यावे
*मान्सूनपूर्व कामे हाती घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 18 : येता खरीप हंगाम जून महिन्यापासून सुरू होणार आहे. संरक्षित सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी शेतात शेततळे खोदावे. पाऊस सुरू होण्यापूर्वी १ टक्क्यापेक्षा जास्त उताराचे २ हेक्टर शेतासाठी उताराचे शेवटी २० मीटर लांब, २० मीटर रूंद आणि ३ मीटर खोलीचे शेततळे खोदावे. यात साठवलेल्या पाण्याचा उपयोग अवर्षण काळात संरक्षित ओलीत करण्यासाठी होईल, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
पावसाचे पाणी जागेवरच मुरण्याकरिता शेताची पेरणीपूर्व मशागत समतल म्हणजेच कंटूर रेषेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी करावी. ही बाब यावर्षीपासून अत्यावश्यक समजून त्याचा अवलंब करावा. शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत टाकावे. अर्धवट कुजलेले शेणखत शेतात टाकल्यास शेतात हुमणीचा प्रादूर्भाव वाढतो. खरीप पिकांच्या सुधारीत सरळ जातीचे बियाणे मिळवावे. संकरीत वाणांच्या तुलनेत सरळ वाणांच्या लागवडीचा खर्च कमी आणि निव्वळ नफा जास्त येतो. पुढील वर्षापासून या वाणांचे ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त जवळचे बियाणे पेरणी करिता यावर्षीच्या उत्पादनातून राखून ठेवण्याकरीता नियोजन करावे.
पेरणीपूर्वी सर्व बियाण्यांची विशेषतः सोयाबीनची उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्याची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. माती परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येईल. खत मात्रा उशिरा दिल्यास पिकांच्या उत्पादनात घट येते. मध्यम, खोल आणि उथळ जमिनीत कपाशीची धूळ पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेवून करावी.
पिकलेल्या व जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा करून, चांगल्या वाळवून, कोरड्या जागेत साठवाव्यात. प्रत्येक शेतकऱ्याने यावर्षी कमीतकमी १०० किलो निंबोळ्या गोळा कराव्यात. ५ टक्के निंबोळी अर्काची २ हेक्टर कपाशी, तूर, हरभरा पिकांवर दोन फवारणी केल्यास रासायनिक किटकनाशकांचे खर्चात २० ते २५ टक्क्यांपर्यंत बचत करता येईल.
शिफारस केलेल्या वाणांचे प्रमाणित किंवा सत्यस्थितीदर्शक बियाणे पेरणीसाठी वापरावे. कोरडवाहू क्षेत्रात सलग पिकाऐवजी कपाशी : ज्वारी : तूर : ज्वारी ६:१:२:१ ओळी, सोयाबीन : ज्वारी : तूर : ज्वारी ६:१:१:१ ओळी, सोयाबीन : तूर २:१ किंवा ४:२ किंवा ५:१ओळी, कपाशी : : मूग किंवा उडीद १:१ ओळी याप्रमाणे आंतरपिक घ्यावे.
पेरणीपूर्वी बियाण्यास अनुक्रमे ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे, पीएसबी आणि जिवाणू संवर्धन प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. ३ टक्क्यापेक्षा जास्त उताराच्या जमिनीत वरच्या ७० टक्के क्षेत्रात कपाशी आणि खालच्या ३० टक्के क्षेत्रात खरीपात सोयाबीन व रब्बीत हरभरा पिक घ्यावे.
संत्रा-मोसंबीच्या झाडांना मृग बहाराकरीता दिलेला ताण, पाऊस न आल्यास हलके ओलीत देऊन तोडावा. शिफारशी आणि माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खते, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. आंबिया बहाराची फळे असलेल्या संत्रा झाडांना नियमित ओलीत करावे.
पावसाळ्यापूर्वी फळझाडाचे खोडास १ मीटर उंचीपर्यंत वोर्डोपेस्ट लावावी. १ किलो मोरचूद - १ किलोकळीचा चूना - १० लिटर पाणी घेण्यात यावे. मिरची, वांगी, टोमॅटो, फुलकोबी या पिकांची ४ ते ६ आठवडे वयाचे रोपाची शेतात लागवड करावी. या महिन्यात भेंडी, वाल, चवळी, कारली, ढेमसे, भोपळा, कोहळे, दोडके, हळद व अद्रक यांची लागवड करावी. गादी वाफ्याचा उपयोग करून पालक, मेथी, शेपू, आंबटचुका यासारख्या भाजीपाल्याची लागवड करावी. गॅलार्डिया, झेंडू, मोगरा, शेवंती या फुलझाडाची लागवड करावी. तसेच जनावरांना पशुवैद्यकांचे सल्ल्यानुसार लसीकरण करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
00000
देऊळगाव राजा येथे मंगळवारी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर
बुलडाणा, दि. 18 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि देऊळगाव राजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे मंगळवार, दि. २३ मे २०२३ रोजी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करीअर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. देऊळगाव राजा येथील योगी राजमंगल कार्यालयात सकाळी १० वाजता हे शिबीर घेण्यात येणार आहे.
शिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार राजेंद्र शिंगणे उपस्थित राहणार आहेत. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उप विभागीय अधिकारी भूषण अहिरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी.बचाटे, तहसीलदार श्याम धनमाने, मुख्याधिकारी अरुण मोकड, उद्योजक भगवान गवई उपस्थित राहणार आहेत.
शिबिरात एनआरबी जालना कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून रोजगार भरती मेळावा, शिकाऊ उमेदवारी नाव नोंदणी करणार आहेत. सदर भरती मेळाव्यासाठी वेल्डर, फिटर, पत्रे कारागिर आणि यांत्रिक मोटर गाडी या व्यवसायातील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींनी उपस्थित राहावे. तसेच दहावी, बारावी, पदविका, पदवीच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य श्री. भावले यांनी केले आहे.
00000
जिल्ह्यामध्ये कृषि निविष्ठा नियंत्रण कक्ष स्थापन
बुलडाणा, दि. 18 : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध होण्यासोबत त्यांना योग्य दर्जाची बियाणे मिळण्यासाठी कृषि निविष्ठा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षातर्फे कृषि निविष्ठा विक्रेते आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकाबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या अडचणी आल्याचे निदर्शनास येते. खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांच्या अडचणी व तक्रारीचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. बियाणे, खते व किटकनाशके यांचे उत्पादन, प्रक्रीया, वाहतूक वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे.
बियाणे, खते आणि किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येऊ शकणार आहे. यासाठी संपर्क क्रमांक 07262-299034, 9527546983 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 यावरही संपर्क करता येईल. त्यासोबतच अडचणी किंवा तक्रारी dsaobuldana.qc@gmail.com मेल द्वारे पाठवता, नोंदवता येईल.
बियाणे, खते आणि किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबंधी तक्रार निवारण सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यात जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय येथे कृषि उपसंचालक व्ही. आर. बेतीवार 7719999745, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए. के. इंगळे 7588619505, कृषि सहाय्यक ए. व्ही. सिरसाट 8275340540, कार्यालयाचा फोन नं. 07262-299034 याठिकाणी संपर्क करता येऊ शकेल. जिल्हास्तरावर कृषि विभाग, जिल्हा परिषद कार्यालयात मोहिम अधिकारी व्ही. एल. खोंदील 7588041008, ग्राम विकास अधिकारी जे. एस. वायाळ 9404439004 कार्यालयाचा फोन नं. 07262-242343 हा आहे.
तालुकास्तरावर कृषि विभाग, पंचायत समिती कार्यालयात बुलडाणा येथे कृषि अधिकारी बुलडाणा श्री. राहाणे 9423961006, चिखली येथे कृषि अधिकारी प्रीती पाटील 8378874711, आर. आर. येवले 7038206077, एस. आर. सोनुने 9404034477, मलकापूर येथे गजानन पखाले 9049066291, एस. जे. तिजारे 7588502599, मोताळा येथे वाय. बी .महाजन 8788399130, एस. ए. गवई 7588689686, खामगाव येथे गजानन इंगळे 9527765549, संजय राऊत 8275329543, शेगांव येथे यू. के. जायभाये, 9313846621, यू. के. फुटाणे 9420963268, नांदुरा येथे शरद पाटील 9405660033, ए. बी. चव्हाण 9423146207, जळगाव जामोद येथे श्री. सावंत 9423001446, आर.एस. नावकार 9423721795, संग्रामपूर येथे एस. एन.पाटोळे 9421890778, आर. एस. नावकार 9423721795, मेहकर येथे उद्धव काळे 7020278840, एस. आर. परिहार 9511786145, लोणार येथे एस. एन. कावरखे 9921800999, एस. बी. गायकवाड 9423417044, सिंदखेड राजा येथे गणेश सावंत 9420082942, अंकुश म्हस्के 9130407647, देऊळगाव राजा येथे नामदेव जिंदे 9834040619, कुणाल चिंचोले 8275231914 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषि निविष्ठाबाबत बियाणे, खते आणि किटकनाशके संदर्भातील तक्रारी असल्यास संबंधितास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
00000
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबत हरकती नोंदविण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 18 : राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावित पुरस्कारार्थींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत दि. 16 ते 22 मे, 2023 या कालावधीत आक्षेप नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरस्कारार्थीबाबत आक्षेप असल्यास संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in या ई-मेल वर आक्षेप, हरकती सादर करावयाच्या आहेत. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाद्वारे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू गट. शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू गट असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
त्यानुसार सदर पुरस्काराच्या अनुषंगाने विहित नमुन्यात हरकत, आक्षेप सादर करावे, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. याबाबतचा विहित नमुना sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित कालावधीत प्राप्त होणाऱ्या हरकत, आक्षेपांचा विचार करण्यात येईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.
00000
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकप्राप्त खेळाडूंना वाढीव पारितोषिक
*रोख रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू
बुलडाणा, दि. 18 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणारी रक्कम वाढविण्यात आली आहे. या वाढीव पारितोषिकाची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंच्या रोख पारितोषिक रक्कमेत मुख्यमंत्री यांनी वाढ केली आहे. त्यानुसार पदकप्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिकाची रक्कम जाहीर केली आहे. खेळाडू व मार्गदर्शक यांच्या रोख पारितोषिकासाठी एकुण रक्कम 2 कोटी 36 लाख रूपये शासनाकडून प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संपादन केलेले पदक आणि रोख पारितोषिके सुवर्ण पदक खेळाडू 7 लाख व मार्गदर्शक 50 हजार रूपये, रौप्य पदक खेळाडू 5 लाख व मार्गदर्शक 30 हजार रूपये, कांस्य पदक खेळाडू 3 लाख व मार्गदर्शक 20 हजार रूपये रोख पारितोषिकाची रक्कम सर्व संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांनी मान्यता दिली आहे.
उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्वल करुन पदक प्राप्त खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येते. गुजरात येथील 36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे 34 खेळ प्रकारात 800 खेळाडू, व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी, मार्गदर्शक सहभागी झाले होते. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंना खेळानुसार 39 सुवर्णपदक, 38 रौप्यपदक आणि 63 कांस्यपदक असे एकूण 140 पदके प्राप्त केली आहेत. तसेच सन 2015 यावर्षी केरळ येथे झालेल्या 35व्या नॅशनल गेम्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी अनुक्रमे 5 लाख, 3 लाख आणि 1.50 लाख रोख पारितोषिक रक्कम देऊन गौरविण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment