पर्यावरणपूरक जीवनपद्धती कार्यशाळेचा समारोप
बुलडाणा, दि. 24 : केंद्र शासनाच्या लाईफ मिशन अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनपद्धतीस प्रोत्साहन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि आत्मातर्फे जिल्हा प्रशिक्षण केंद्रात सोमवार, दि. २२ मे २०२३ रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. तारू यांनी बदलत्या हवामानाशी सुसंगत पिकाच्या वाणांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. मनेश येदुलवार यांनी मान्सून आणि हवामानाच्या अंदाजाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. श्रीमती तिजारे यांनी हवामान अनुकूल शेतीपद्धती बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, पाण्याचा सूक्ष्म वापराबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी वातावरणानुकुल शेतीपद्धतीसाठी कृषी विभागाच्या योजनाबाबत माहिती दिली. पोकराचे प्रकल्प विशेषज्ञ उमेश जाधव यांनी मुलस्थानी जलसंधारण, पाण्याचा सुयोग्य वापराबाबत मार्गदर्शन केले. आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे यांनी जैवविविधता, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले.
सप्ताहात तालुका आणि ग्रामस्तरीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. रविवार, दि. २८ मे रोजी कृषी विज्ञान केंद्रात समारोपीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
00000
भारतीय डाक विभागाची महिला सन्मान बचतपत्र योजना
बुलडाणा, दि. 24 : भारतीय डाक विभागाने महिलांसाठी महिला सन्मान बचत योजना सुरू केली आहे. वार्षिक दोन लाख रूपयांपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजना 1 एप्रिल 2023 पासून देशातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमधून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेत महिला खातेदार स्वतःसाठी किंवा पालक अल्पवयीन मुलीच्या नावे कमीत कमी एक हजार रूपये ते कमाल 2 लाख रूपये जमा करून वार्षिक 7.5 टक्के त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकतात. यासाठी खातेदाराला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे.
सदर खाते दि. 31 मार्च 2025 पर्यंत एक खातेदाराच्या नावे दोन खात्यांमध्ये 3 महिन्यांचे अंतर ठेवून काढले जाऊ शकते. जिल्ह्यातील महिलांनी महिला सम्मान बचत पत्र योजनेसह डाक विभागाच्या बचत खाते, आवर्ती जमा खाते, बचत ठेव खाते, मासिक उत्पन्न योजना खाते, ज्येष्ठ नागरिकांसाठी खाते, आयकर सवलत करिता पीपीएफ खाते, मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते, राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र काढण्याचे आवाहन डाक अधिक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment