शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी
*कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 15 : शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी दक्षता घ्यावी, तसेच गुणवत्ता आणि दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून देयकासह खरेदी करावे. बिलावर बियाण्याचा संपूर्ण तपशील यात पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत आणि आपण स्वत:बिलावर स्वाक्षरी, अंगठा देऊन विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याबाबत खात्री करावी.
खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीचे देयक आणि थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केलेले असल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याची पाकीटे, बॅग सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीट, बॅगवरील अंतिम मुदत पाहून घ्यावी.
कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी नजिकच्या कृषि विभागाचे कृषि अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, मोहिम अधिकारी जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
00000
पावसाळ्यातील आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणा सतर्क
* मान्सून पूर्व आढावा बैठक
बुलडाणा, दि. 15 : येत्या मान्सूनच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच पावसाळ्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच येत्या काळात उष्णतेच्या लाटेबाबतही योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिले आहे.
मान्सून पूर्व आणि उष्णतेच्या लाटेबाबत शनिवार, दि. 13 मे रोजी आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते उपस्थित होते.
पावसाळ्याच्या दिवसात संभाव्य संपर्क तुटणाऱ्या गावाना पुरेशा प्रमाणात धान्य पुरवठा उपलब्ध करावा. आरोग्य विभागाने सतर्क राहून जलजन्य आजाराला आळा घालण्यासाठी आवश्यक औषधीसाठा उपलब्ध ठेवावा. वीज वितरण कंपनीने वी पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी दुरुस्ती पथके तैनात करावीत. रस्ता वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. याबाबत बांधकाम विभागाने सतर्क राहून कार्यवाही करावी. सध्या सुरू असलेली पुलाची कामे दि. 30 मेपर्यंत तात्काळ पुर्ण करण्यात यावे. धोकादायक असलेल्या धरणाची दुरुस्ती मान्सून सुरु होण्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाची हानी झाल्यास कृषी विभागाकडून तत्परतेने कार्यवाही करावी. महावेदने बसविलेल्या मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्र सुस्थितीत असल्याची कृषी विभागाने खात्री करावी. तसेच नागरीकांनी दामिनी ॲपचा वापर करावा, आवाहन करण्यात आले
सद्यस्थितीत मे महिन्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेण्यात आला. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची दक्षता घ्यावी, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचाराची माहिती घेऊन उष्णतेच्या लाटेसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले.
000000
No comments:
Post a Comment