Wednesday, 17 May 2023

DIO BULDANA NEWS 17.05.2023

 शेतकऱ्यांनी मे महिन्यात मशागतीची कामे करावीत

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 17 : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मे महिन्यात शेतीच्या मशागतीची कामे करावीत, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत यात नांगरणी, वखरणी करावी. समतल किंवा मुख्य उताराला आडवी करावी. त्यामुळे जमिनीची धूप कमी होऊन पावसाचे पाणी जमिनीत मुरून जमिनीची धुप होणार नाही. सेंद्रिय खते टाकण्यापूर्वी मातीचे प्रतिनिधीक नमुने ठराविक शुल्कासह मृद परिक्षण प्रयोग शाळेत पाठवून माती परीक्षण करावे. २ हेक्टर शेतीकरिता १०x२x१ मीटर आकाराचे दोन खड्डे कंपोस्ट खत करण्यासाठी खोदावेत. शेतीमधील उपलब्ध तुराट्या, पऱ्हाट्या, काडीकचरा, जनावरांचे शेण-मूत्र आदी थर टाकून भरावेत. यावेळी सेंद्रिय पदार्थ कुजविणारे सूक्ष्म जिवाणू कल्चर १ किलो प्रति १ टन सेंद्रिय पदार्थ या प्रमाणात मिसळावे. शेतात 'आगपेटी बंद' या तत्वाचा अवलंब करावा, गव्हाचे काड शेतात जाळू नये. नांगरणी किंवा रोटाव्हेटर ते जमिनीत पुरावे. कोरडवाहू पिकांकरिता हेक्टरी १० गाड्या आणि बागायती पिकांकरिता हेक्टरी २० गाड्या चांगले कुजलेले कंपोस्ट खत शेतात पसरवून वखरणी करून जमिनीच्या वरच्या थरात मिसळावे. शेतातील झूडपे, पालव्या, कुंदा, तसेच धुऱ्यावरील, पडीतातील उधळी (वाळवी) ची वारुळे खोदून आतील राणी नष्ट करावी त्यावर फॉलीडॉल भुकटी (मिथिल पॅराथिऑन २ टक्के भुकटी) टाकून जागा सपाट करावी.

खरीप पिकांचे सुधारित वाणांचे बियाण्याकरिता विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, अकोला, टोल फ्री क्रमांक १८००२३३०७२४, विद्यापीठाचे कृषि संशोधन केंद्रे, कृषि महाविद्यालय, नागपूर तसेच शेतकी शाळा येथे संपर्क साधावा. ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम गावागावात गटामार्फत राबवावा. याकरिता तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.  उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, मका, मूग या पिकांना ६ ते ८ दिवसांचे अंतराने ओलीत करावे. पक्वतेनुसार उन्हाळी मुगाच्या शेंगाची तोडणी करून मळणी करावी. बियाणे सावलीत वाळवून पोत्यात भरून कोरड्या जागेत साठवावे. धान्य विक्री करावी. ऊसाला ५ ते ८ दिवसाचे अंतराने एक सरी आड या पद्धतीने ओलीत करावे. लावणीपासून दोन अडीच महिन्यांनी बाळबांधणी आणि चार ते साडेचार महिन्यानी पक्की बांधणी करावी. लोकरी मावाग्रस्त पाने तोडून जाळावीत.

फळझाडांचे आळ्यात पाला-पाचोळा किंवा गव्हांड्याचे ५ इंच जाड आच्छादन करावे. ठिबक सिंचन पद्धतीने ओलीत करावे व १ ते ३ वर्षे वयाचे फळझाडांचे कडक उन्हापासून संरक्षण करण्याकरिता झाडावर तुराटी-पऱ्हाटी किंवा ग्रीन नेटची सावली करावी. खोडास बोंदरी गुंडाळावी, मटका पद्धतीने झाडांना ओलीत व्यवस्था करावी. संत्रा, लिंबू झाडाची साल खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी खोडावरील विष्टेची जाळी काढून छिद्रे मोकळी करून त्यामध्ये पिचकारीच्या मदतीने किटकनाशक टाकून ओल्या मातीने छिद्र बंद करावे.

खरीप भाजीपाला पिकांची रोपे तयार करण्याकरिता गादी वाफ्यावर (रोपवाटिका) बियाणे पेरावे. प्लास्टिक क्रेट, रूट ट्रेनरचा उपयोग केल्यास निरोगी व सशक्त रोपे तयार होतात. मिरची, वांगी, टोमॅटो यांच्या बियाण्यास ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून योग्य अंतरावर ओळीत टाकावे. हळद व आले पिकांची लागवड करावी. माती परिक्षणाच्या अहवालानुसार आणि घेण्यात येणाऱ्या पिक पद्धतीनुसार रासायनिक कृषि निविष्टा, बी-बियाण्याची जुळवाजुळव करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

00000

नांदुरा तालुक्यातील जप्त केलेल्या रेतीचा मंगळवारी लिलाव

बुलडाणा, दि. 17 : नांदुरा तालुक्यातील विविध कारवाईमध्ये जप्त केलेल्या रेतीचा लिलाव मंगळवार, दि. 23 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.

नांदुरा तालुक्यातील मौजे पातोंडा येथील 174.29 ब्रास, मौजे पतोंडा गावानजिक विटभट्टी विरुद्ध बाजूला 696.98 ब्रास, गअ नं. 1 मधील गावनदीपत्र 218.16 ब्रास, पूर्णा नदीपात्रातील 87.23 ब्रास असा एकुण 1176.66 ब्रास रेतीचा लिलाव यात करण्यात येणार आहे. इच्छुकांनी यावेळी उपस्थित राहून लिलावात सहभाग घ्यावा, असे आवाहन नांदुरा तहसिलदार यांनी केले आहे.

000000

बांधकाम कामगारांना सोमवारपासून सुरक्षा संचाचे वाटप

बुलडाणा, दि. 17 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत जिवीत सक्रीय बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे सोमवार, दि. 22 मे पासून तालुकानिहाय वाटप करण्यात येणार आहे.

बांधकाम कामगारांची नोंदणी 31 मार्च पूर्वी झालेली आहे, परंतु त्यांनी अद्यापही सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचा लाभ घेतलेला नाही, अशा बांधकाम कामगारांनी तालुकानिहाय ठरवून दिलेल्या दिवशीच मंडळाच्या कार्यालयास सुरक्षा संच प्राप्त करण्यासाठी अर्ज सादर करून सुरक्षा संच व अत्यावश्यक संच प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.

सोमवार, दि. 22 मे रोजी बुलडाणा, मोताळा, मंगळवार, दि. 23 मे रोजी चिखली देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, बुधवार, दि. 24 मे रोजी शेगाव, खामगाव, नांदुरा, गुरूवार, दि. 25 मे रोजी मलकापूर, मेहकर, लोणार, शुक्रवार, दि. 26 मे रेाजी जळगाव जामोद, संग्रामपूर येथे सुरक्षा संचाचे वाटप होईल.

सुरक्षा संच नोंदीत जिवीत सक्रीय बांधकाम कामगारांना शासनाकडून नि:शुल्क पुरविण्यात येते. यासाठी काणतेही शुल्क आकारल्या जात नाही. याबाबत कामगारांची फसवणूक झाल्या किंवा सुरक्षा संचास अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध नजीकच्या पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन मंडळाचे उप कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

00000

गौण खनिजांचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय पथक

बुलडाणा, दि. 17 : जिल्ह्यातील वाळू, रेती तसेच इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी जिल्हास्तरीय पथक स्थापन केले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये वाळू, रेती डेपोची निर्मिती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत गौण खनिजांचे उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच उपविभागीय आणि तालुका स्तरावर भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके 24 तास कार्यान्वित राहणार आहे.

जिल्ह्यातील वाळू, रेती तसेच इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधित गावाचे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना कळविण्यात यावे. संबंधितांनी कारवाई केली नसल्यास जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी केले आहे.

000000

पाणी टंचाई निवारणार्थ टँकर मंजुर

बुलडाणा, दि‍. 17 : जिल्ह्यातील काही तालुक्यात सद्यस्थि‍तीत पिण्याच्या स्त्रोतापासुन आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

दरडोई दरदिवशी 20 लिटर्स उपलब्ध होण्यासाठी पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. चिखली तालुक्यातील धोडप आणि डोंगरशेवली येथे प्रत्येकी एक टँकर, बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड, हनवतखेड, देव्हारी, सावळा, गोधनखेड, चौथा येथे प्रत्येकी एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे सदर गावामधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment