Wednesday, 10 May 2023

DIO BULDANA NEWS 10.05.2023

 मका, ज्वारी खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दरात मका, ज्वारी खरेदी करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणीचा कालावधी दि. ४ मे ते २० मे २०२३ पर्यंत आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी हंगाम २०२२-२३चा सातबारा उतारा, पिकपेरा, बँक पासबुकची झेरॉक्स, जनधन पासबुक देऊ नये, आधारकार्ड, बँक खाते सुरु असल्याची खात्री करुन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.

जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी नोंदणीसाठी १३ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलढाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद आणि खामगाव. संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु. केंद्र - साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्यादित चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड, ता. देऊळगावराजा केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा, केंद्र- वाडी या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

00000








उन्हाळी प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप

बुलडाणा, दि. 10 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 25 एप्रिल ते 5 मे 2023 दरम्यान आयोजित विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आणि  व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप करण्यात आला. 

यावेळी आमदार संजय गायकवाड, तहसिलदार रुपेश खंडारे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सुधाकर अहेर, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन उपाध्यक्ष राजू पाटील, डॉ. अश्विनी जाधव चिखलकर, राजेश डिडोळकर आदी उपस्थित होते.

आमदार श्री. गायकवाड यांनी क्रीडाविषयक सुविधेची माहिती सांगितली. खेळामुळे राज्य शासनासह केंद्रात ही नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध होते, तसेच येत्या काळात जिल्हा क्रीडा संकुलात 400 मीटरचा सिंथेटीक धावपथ, इनडोअर व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, स्केटींग आदी क्रीडा सुविधांची निर्मिती होणार असल्याचे सांगितले. श्री. खंडारे यांनी मोबाईल, टीव्हीचे दुष्परिणाम सांगून पाल्यांना खेळाकडे वळविण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी विविध खेळांत आत्मसात केलेल्या प्रशिक्षणाचे कौशल्य सादर केले. कार्यक्रमात जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त तथा सहभाग खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात 110 मीटर हर्डल्स तामिलनाडू येथील तिरुमलाई राष्ट्रीयस्तर गोल्ड मेडल नयन सरडे, राज्यस्तरीय खेळाडू सिद्धी डिडोळकर, पुनम बंगाळे, प्रणव राजू सोनुने, यशराज राजपूत, स्वरुप सराफ, वैष्णवी चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. शिबिरातील प्रशिक्षक सुनिल जोशी, मनोज श्रीवास, विजय वानखेडे, डॉ. प्रा. बाबाराव सांगळे, राहुल औशलकर, निलेश शिंदे, गजानन घिरके, शशीकांत पवार, संजय चितळे,  मोहम्मद सुफीयान, प्रा. विद्या साळवे वानखेडे, विभा जोशी, हर्षल काळवाघे, दिपक जाधव, भुषण शिरसाठ, सुहास राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

सदर शिबीराचे आयोजन व नियोजन मा.श्री.गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्री.अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा शिबीर प्रमुख यांनी उत्कृष्टपणे केले त्याबद्दल प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. शिबीरासाठी वरिष्ठ लिपिक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, भीमराव पवार, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी पुढाकार घेतला.

00000

महिला तक्रार निवारणासाठी समाधान शिबिर

         बुलडाणा, दि. 10 : महिला लोकशाही दिनाच्या अनुषंगाने दि. 12 ते 31 मे 2023 या कालावधीत प्रत्येक तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेला यात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

तालुका, जिल्हा, विभागीय आणि मंत्रालयीनस्तरावर महिला लोकशाही दिन हा अनुक्रमे प्रत्येक महिन्याचा चौथा, तिसरा, दुसऱ्या सोमवारी घेण्यात येतो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो.

राज्य्‍ घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क‍ दिला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्‍त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपिठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यासाठी महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी आणि समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन सादर करण्यात येतो.

शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीरामध्ये महिलांनी सहभागी होऊन शासकीय कार्यालयाशी संबंधित तक्रारी असल्यास तालुकास्तरावर तहसिलदार आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

00000


No comments:

Post a Comment