कोरोना अलर्ट : प्राप्त 537 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 40 पॉझिटिव्ह
• 30 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 577 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 537 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 40 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 38 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 489 तर रॅपिड टेस्टमधील 48 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 537 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 7, चिखली तालुका : सवणा 1, खामगाव शहर : 2, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : डोणगांव 6, बुलडाणा तालुका : दुधा 1, बुलडाणा शहर : 6, दे. राजा शहर : 5, दे. राजा तालुका : दिग्रस 1, उंबरखेड 1, गिरोली 1, दे. मही 1, जळगांव जामोद तालुका : मडाखेड 1, मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : बेलाड 1, मूळ पत्ता अमरावती 1, बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 40 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा येथील अपंग विद्यालय कोविड केअर सेंटर येथे सि. राजा येथील 80 वर्षीय पुरूष रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच आज 30 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : शेगांव : 10, मेहकर : 2, खामगांव : 3, जळगांव जामोद : 3, लोणार : 1, बुलडाणा : स्त्री रूग्णालय 4, सि. राजा : 7.
तसेच आजपर्यंत 79620 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11236 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11236आहे.
तसेच 1916 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 79620 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11698 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11236 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 321 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 141 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*****
शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल कार्यान्वीत
- विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांस विभागाच्या https://mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. तरी सन 2020-21 या वर्षाकरीता प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सदर महाडीबीटी प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या पोर्टलवर सर्व पात्र विद्यार्थ्यांनी योजनेच्या वेळेच्या आत अर्ज भरून लाभ घ्यावा. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज दुरूस्त करून ऑनलाईन सादर करण्याकरीता मुदत देण्यात आली असून या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
शिवभोजन थाळी योजनेमूळे भागली लाखोंची भूक..!
- शिवभोजन थाळीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
- कोरोना काळात गरजूंना योजनेचा मिळाला आधार
बुलडाणा, दि. 9 : राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेच्या ल्ज्जतदार थाळीमुळे जिल्ह्यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीची लज्जत वाढतच आहे. शिवभोजन केंद्रांवर दररोज 11 ते 3 यावेळेत थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या शहरात सर्वप्रथम शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार बुलडाणा शहरातही तीन ठिकाणी शिवभोजन योजना सुरू आहे. यामध्ये बसस्थानक, जिजामाता प्रेक्षागार परीसर व कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात 17 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू आहेत. मोताळा, मलकापूर, सिंदखेड राजा, नांदुरा, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, जळगांव जामोद, शेगांव व खामगांव येथेही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकट काळात गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना नाममात्र पाच रूपये दरात शिव भोजन थाळी योजने अंतर्गत दर्जेदार जेवण देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात 17 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दररोज दोन हजार थाळी ‘पॅकींग फुड’ स्वरूपात देण्यात येत आहेत. जिल्ह्यात मार्च ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत 4 लक्ष 83 हजार 612 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
शिव भोजन थाळीचे स्वरूप संचार बंदीच्या काळात बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये तयार जेवण दिले जात आहे. त्यामुळे एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणे शक्य झाले आहे. बंद डब्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू ,गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र ॲपवर देखील दिले जात आहे. राज्य शासनाने अतिशय गरीब लोकांसाठी सुरू केलेल्या या योजनेची उपयुक्तता लॉकडाऊनच्या काळात आणखी प्रखरतेने पुढे आली आहे. तरी ही शिवभोजन योजना संचारबंदीच्या काळात कमी मिळकत असणारे, स्थलांतरीत मजूरांसाठी जगण्याचा आधार आहे, एवढे मात्र निश्चित.
शिव भोजन थाळी योजनेला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. योजनेच्या सुरूवातीच्या काळात गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त 10 रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्यात आले. आता मात्र शासनाने या थाळीचा दर नाममात्र 5 रूपये इतका कमी ठेवला आहे.
शासनातर्फे सुरु करण्यात शिव भोजन थाळी योजनेत प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट आहे. ही शिवभोजनाची थाळी 5 रुपयात देण्यात येते. ही भोजनालये सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत कार्यरत आहेत. प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 5 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येवून त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येते.
योजनेच्या पारदर्शीपणासाठी एक ॲप्स विकसित करण्यात आले आहे. या ॲप्समध्ये दररोजची ग्राहकांची माहिती भरण्यात येते. त्यानुसार राज्यातील सर्व शिव भोजन थाळी येाजनेतील भोजनालयांमध्ये या ॲप्सच्या माध्यमातून थाळी विक्रींची संख्याही पाहता येते. योजनेमुळे गरीब, कामासाठी बाहेरगावावरून आलेले नागरिक, विविध रूग्णालयांमध्ये आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी भोजनाची उत्तम व्यवस्था झाली आहे. शिवभोजन थाळीबाबत बस स्थानकांवरील भोजनालयात जेवन केलेले लाभार्थी म्हणतात, जेवनाचा दर्जा एकदम चांगला आहे. हे जेवन करून पोटाला आधार, तर होतोच, त्याच सोबत आमच्या सारख्या गरीब लोकांची मदत होते. ही योजना चांगली असून अशीच सुरू रहावी. अनेक लाभार्थी योजनेविषयी बोलताना म्हणतात, या जेवनात भात, पोळी, वरण, भाजी असे घरच्यासारखे जेवन असते. गरीब जनतेला या जेवनामुळे खुप मदत होत असून हा उपक्रम राबविण्यासाठी शासनाचे आम्ही आभारी आहोत. योजनेमुळे निश्चितच आतापर्यंत लाखो गरजूंची भूक भागली आहे, एवढे मात्र खरे..
******
- जिल्ह्यात सीसीआय व पणन महासंघाकडून खरेदी
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : जिल्ह्यातंर्गत भारतीय कपास निगम (सिसीआय) मार्फत चिखली, मलकापूर, नांदुरा व खामगांव तसेच कापूस पणन महासंघ (फेडरेशन) मार्फत देऊळगांव राजा, शेगांव, जळगांव जामोद येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर संबंधीत यंत्रणेकडून कापूस खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कापूस खरेदीसाठी 32 हजार 875 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. आजपर्यंत 2930 एवढ्या शेतकऱ्यांचा 1 लक्ष 5 हजार 56 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र काही खरेदी केंद्रावर शेतकरी ऑनलाईन नोंदणी न करता परस्पर कापूस विक्रीला आणत असल्याचे निर्दशनास आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीकडून संदेश न येता कापूस विक्रीसाठी आणला, त्यांचा कापूस खरेदी केल्या जाणार नाही. कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असून ती कापूस विक्रीस इच्छूक शेतकऱ्यांनी करावी.
ऑनलाईन नोंदणी न करता कापूस विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांमुळे संबंधीत यंत्रणेला धोरणाप्रमाणे कापूस खरेदी करता येत नाही. परिणामी असे शेतकरी त्यांच्या गाड्या रस्त्यावर आणून सार्वजनिक वाहतूकीस अडथळा आणत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची अडचण निर्माण होत आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यांना संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समितीकडून ऑनलाईन संदेश प्राप्त होतो. अशा शेतकऱ्यांनीच खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ महेंद्र चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
भू विकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी ‘एक रकमी कर्ज परतफेड योजना’
- थकीत कर्जाचा भरणा करून योजनेचा लाभ घ्यावा
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : भू विकास बँकेच्या थकीत कर्जदार सभासदांसाठी शासनाने एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू केली आहे. या योजनेची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी भू विकास बँकेच्या थकीत कर्जदार सभासदांनी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. दिलेल्या मुदतीत कर्जाचा भरणा न केल्यास एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच 1 एप्रिल 2021 पासून बँकेच्या नियमानुसार सक्तीच्या वसुलीची कार्यवही करण्यात येणार आहे व कर्जदार सभासदांचे नाव स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी थकीत कर्जदार सभासदांनी एक रकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा, असे भू विकास बॅकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
12 व 13 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : राज्यातील कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्याचा परिणाम उद्योग, व्यवसायावर झाला होता. मात्र आता राज्यातील सदर उद्योग, व्यवसाय पुर्ववत स्थितीप्रमाणे कार्यरत होत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या विविध संधी तसेच कोविडच अनुषंगाने विविध क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी दोन दिवसांचा राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी विविध पदांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधारक पात्र पुरूष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अप्लाय करून या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या उपरोक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त पुरूष तसेच महिला उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डचा युजर आयडी व पासवर्डचा वापर करून आपल्या लॉग ईन मधून अप्लाय करू शकतात. ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या कंपनी, उद्योजक, एचआर प्रतिनिधी यांचेकडून ऑनलाईन मुलाखती घेवून निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन अप्लाय करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासख् रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. रा झळके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
संत जगनाडे महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा,(जिमाका) दि.9 : जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने 8 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे आदी उपस्थित होते.
विवेकानंद आश्रम येथील जयंती सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार
- मंदीराच्या आतील कार्यक्रमांना 10 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी
बुलडाणा,(जिमाका) दि.9: मेहकर तालुक्यातील विवेकानंद आश्रम येथे प. पू शुकदास महाराज यांचा जयंती सोहळा 12 डिसेंबर 2020 रोजी संपन्न होत आहे. मात्र कोविड 19 या साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार आणि यात्रा कायदा 1862 च्या कलम 4 अन्वये जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढु नये यादृष्टीने 12 डिसेंबर 2020 रोजी विवेकानंद आश्रम, ता. मेहकर येथील प.पू शुकदास महाराज यांचा जयंती सोहळा जास्तीत जास्त 10 भाविकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या सोहळ्यात मंगलधून, मंत्रघोष, हरीहर तिर्थावर महाआरती, महाराजश्रींचे समाधीस्थळी प्रार्थना, आरती आदी कार्यक्रम 10 व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहेत. तसेच ग्रामसफाई, परिसर स्वच्छता 10 व्यक्तींच्या उपस्थितीत गर्दी न करता सोशल डिस्टसिंगचे पालन करून करता येणार आहे. महाराजश्रींचे समाधी दर्शन व पुजनसाठी 10 व्यक्तींची उपस्थिती राहील. या दर्शनाचे ऑनलाईन प्रक्षेपण करावे. जेणेकरून इतर भाविकांना घरबसल्या दर्शनाचा लाभ घेता येईल. दुपारचे उत्सव समिती मिटींग, वृद्धाश्रमांतील वृद्धांना कपडे वाटप, मोफत् सॅनीटायझर व मास्कचे वितरण 10 व्यक्तींच्या उपस्थितीत गर्दी न करता सोशल डिस्टसिंगचे पालन करून करता येणार आहे. तसेच सायं 7 ते 9 दरम्यान होणारे भक्तीगीत गायन, प्रार्थना व आरती यासाठी व्यासपीठावर व परीसरात एकूण 10 व्यक्तींची उपस्थिती राहील. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करावे.
उपस्थित सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. सदर व्यक्तींची थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करणे बंधनकारक असणार आहे. आश्रमाचा परीसर वारंवार निर्जंतुकीकरण करावा. पुजारी व संस्थानचे कर्मचारी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे. आश्रम परीसरात हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. शासनाच्या निर्देशांचे पालन कारावे. आश्रम परीसरात सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment