कोरोना अलर्ट : प्राप्त 154 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 45 पॉझिटिव्ह
• 25 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 199 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 154 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 42 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 73 तर रॅपिड टेस्टमधील 81 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 154 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 9, मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : धरणगांव 1, बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : मोहाडी 1, सिं. राजा शहर : 5, सिं. राजा तालुका : चिंचोली 1, अकोला देव 1, धारकल्याण 2, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 1, दे. राजा शहर : 3, खामगांव शहर : 12, जळगांव जामोद शहर : 2, मूळ पत्ता दहीगांव ता. तेल्हारा जि. अकोला येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 45 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 25 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : अपंग विद्यालय 4, आयुर्वेद महाविद्यालय 5, खामगांव : 3, मोताळा : 1, सिं. राजा : 9, नांदुरा : 2, शेगांव : 1.
तसेच आजपर्यंत 81738 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 11404 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 11404 आहे.
तसेच 1631 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 81738 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11898 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 11404 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 350 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 144 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
***
केंद्र शासनाच्या फिट इंडीया मोहिमेत सहभागी व्हावे
- जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, फिट इंडीया मुव्हमेंट अंतर्गत फिट इंडीया कॅम्पेन-डिसेंबर 2020 राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट 2019 रोजी देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “फिट इंडिया मुव्हमेंट” या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेमध्ये देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचे फिटनेस असेसमेंट टेस्ट घेण्याचे निर्देशीत करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने डिसेंबर महीन्यामध्ये “फिट इंडीया कॅम्पेन-डिसेंबर 2020” फिट इंडीया हा उपक्रम जाहीर केलेला आहे. हा उपक्रम संपुर्ण डिसेंबर महीन्यामध्ये जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेतंर्गत फिट इंडिया थेमॅटीक कॅम्पेन – वर्च्युअल, फिटनेस का जोड-आधा घंटा रोज 1 डिसेंबरपासून सुरू, फिटनेस असेसमेंट थ्रु फिट इंडिया ॲप, फिट इंडिया स्कूल वीक 1 ते 31 डिसेंबर दरम्यान, फिट इंडिया क्वीज, फिट इंडिया प्रभातफेरी, फिट इंडिया सायक्लोथॉन 7 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान आयोजीत करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारा शासन निर्णय नुसार इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग, आश्रमशाळा, वसतीगृह दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासुन मार्गदर्शक सुचना देऊन सुरु करण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमामधुन सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यायाम करुन तंदुरुस्ती / सुदृढता अंगी आणण्याच्या प्रक्रीयेमध्ये सहकार्य होऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होणार आहे. याकरीता सद्यस्थितीत असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वेळापत्रकामध्ये दररोज अर्धा तास व्यायाम व खेळाकरीता विशेष राखुन ठेवण्याचे निर्देश देण्यात येत आहे.
त्याप्रमाणे फिट इंडिया स्कूल वीक, फिट इंडिया प्रभातफेरी, फिट इंडिया सायक्लोथॉन या उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्याप्रमाणात आयोजन करावे. असे करुन दैनंदिन किमान 30 मिनिटे व्यायामाचे महत्व पटवुन देणे अपेक्षीत आहे. सदर उपक्रमाचे आयोजन करताना कोविड-19 साथीच्या रोगा संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारा निर्गमीत सुचनांचे तसेच शासनाच्या सुचनांचे पालन करावे. सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी फिट इंडीया मुव्हमेंट कार्यक्रम अंतर्गत फिट इंडीया कॅम्पेन डिसेंबर 2020 या कार्यक्रमाचे आपल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात आयोजन करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. बुलडाणा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा च्या वतीने करण्यात येत आहे.
--
रानगव्याच्या अस्तित्वामुळे पर्यटकांनी ज्ञानगंगा अभयारण्यात यावे
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : जिल्हामध्ये सन 1997 रोजी निर्माण करण्यात आलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात दि. 30 नोव्हेंबर 2019 रोजी सी – वन – टी – वन या पट्टेदार वाघाचे आगमण झाले होते. यावेळी ज्ञानगंगा अभयारण्याच्या क्षेत्रात वास्तव्य आहे. मात्र आता ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये दि. 6 डिसेंबर 2020 रोजी वन कर्मचारी हे जंगलगस्त करीत असतांना वन्यजीव परिक्षेत्राअंतर्गत आलेल्या देव्हारी बिटात अचानकपणे रानगवा निदर्शनास आला आहे. तसेच योगायोग म्हणजे वाघाच्या आगमना नंतर बरोबर एका वर्षात या परिसरात रानगवा आढळून आल्याने ज्ञानगंगा अभयारण्यात पुन्हा नवीन पाहुण्यांचे पर्यटकांना दर्शन होणार आहे.
जिल्ह्यासाठी आनंदाची वन्यप्रेमीनसाठी सुखद करणारी बाब आहे. रानगवा नेमका कोठून आला असावा, याबाबत लवकरच शोध घेण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्यातील भरपुर प्रमाणात पाऊस पडला असून वन्यजीन परिक्षेत्राअंर्गत असलेल्या संपूर्ण बिटांचे काळजीपुर्वक काटेकोरपणे संरक्षण केल्यामुळे फार मोठया प्रमाणात गवत वाढले आहे. गवताची उंची सुमारे 9 ते 10 फुट असल्यामुळे वन्यप्राण्यांना संचार करणसाठी पुरेपुर वाव आहे. पुढील काळात पुन्हा वन्यप्राणी मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पर्यटकांनी ज्ञानगंगा अभरण्यात जास्तीत जास्त संख्येने पर्यटनास यावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी(वन्य जीव) म. द. सुरवसे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
************
हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा
- कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.15 : सद्यस्थितीत हरभऱ्याचे पिक हे वाढीच्या अवस्थेत आहे. साधारणत: 8 ते 10 दिवसानंतर फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल व दरम्यान घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड असून या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातुन 2 ते 3 दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पान प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खावून फस्त करतात. त्यामुळे झाडावर केवळ फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पिक फुलोऱ्यावर आल्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खावून घाटे पोखरतात. एक अळी साधारणत: 30-40 घाट्यांचे नुकसान करते. त्यामुळे हरभरा पिकावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.
घाटेअळीचे परभक्षक बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी आदी पिकामध्ये फिरून घाटे अळ्या वेचून त्याचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटक नाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटक नाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीच्या नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे तयार करून शेतात लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सेापे होते. कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे या प्रमाणे लावावे. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस 8 ते 10 पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्यात. पहिली फवारणी 50 टक्के फुलोऱ्यावर असताना करावी. निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही (1 x 10 पीओबी / मिली) 500 एल ई / हे. किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी 20 मि.ली या घटकाची फवारणी करावी. तसेच दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणीच्या 15 दिवसानंतर करावी. या फवारणीवेळी इमामेक्टीन बॅझोएट 5 टक्के एस जी 3 ग्रॅम किंवा इथिऑन 50 टक्के इसी 25 मिली किंवा फ्लुबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युजी 5 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 टक्के एस सी 2.5 मिली या घटकाची करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment