मतदार यादीवर दावे व हरकती स्वीकारणार
- मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अंतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा वंचित पात्र नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी व त्यांचा मतदार यादीत समावेश व्हावा, यासाठी दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसरार मतदार यादीवर आक्षेप असलेल्या नागरीकांचे दावे व हरकती 15 डिसेंबर 2020 रोजी स्वीकारण्यात येणार आहे.
तसेच याबाबत 5 व 6 डिसेंबर व 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी विशेष मोहिमेच्या माध्यमातून संबंधित मतदार यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदाराकडून प्राप्त होणारे दावे व हरकती स्विकारतील. याबाबत बुलडाणा तहसिलदार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये आवाहन केले आहे.
उद्योजक पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रीत; इच्छूक उद्योजकांनी अर्ज करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : महाराष्ट्र शासनाचे उद्योग संचालनालय, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा पुरस्कार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षी दोन उद्योजकांना पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप प्रथम पुरस्कार विजेत्यास 15 हजार रुपये रोख, गौरव चिन्ह व द्वितीय पुरस्कार विजेत्यास 10 हजार रुपये रोख व गौरव चिन्ह देण्यात येते.
सन 2020-21 साठी जिल्हा पुरस्कारांकरीता जिल्ह्यातील पात्र उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विनामुल्य अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, दुरदर्शन केंद्रासामोर, बुलडाणा यांचे कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच पुरस्काराकरीता अर्ज करण्याकरीता उद्योग घटक उद्योग आधार नोंदणी झालेला असावा. मागील तीन वर्षामध्ये सलग उत्पादन सुरु असावे. उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा व उद्योग घटकांस यापुर्वी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कोणताही पुरस्कार प्राप्त नसावा. पुरस्कारा करीता निवड करतांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच महिला उद्योजकांना विशेष गुण दिले जातील, असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
बुलडाणा डाक विभागात स्वच्छता पंधरवडा साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : बुलडाणा डाक विभागामध्ये 16 ते 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा अभियान राबविण्यात आले. या अभियानातंर्गत जिल्ह्यातील सर्व डाक घरांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. कोरोना विषाणू संदर्भात समाजात जनजागृती करण्याकरीता सर्व डाकघरांमध्ये पोस्टर्स लावण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्याचप्रमाणे डाकघर स्वच्छतेचा तसेच प्लॅस्टीक वापर टाळण्यासाठी शिक्के मारून प्रसार करण्यात आला. मास्क, सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम अधिक्षक डाकघर ए. के इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरूनच अभिवादन करा
- जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. या दिवशी राज्य व देशभरातील लाखो लोक महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबई येथील चैत्यभुमी येथे जमतात. यावर्षी कोविड 19 साथरोग उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिन साजरा करताना काळजी घेणे गरजेचे आहे. चैत्यभुमी येथे गर्दी न करता कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर घरातून किंवा जिथे आहात तिथून अभिवादन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
अतिजोखमीच्या व्यक्तींनी समारंभात सहभागी होवू नये. ज्या व्यक्तीचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार यासारखे अतिजोखमीचे आजार आहेत. शिवाय ज्यांना सध्या सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आहेत अशा व्यक्तींनी कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे टाळावे. जी मंडळी या कार्यक्रमात सहभागी होत आहे, त्यांनी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता राखण्यासाठी सॅनीटायझर अथवा साबण आणि पाण्याचा नियमित वापर करावा. समुहामध्ये गर्दीत वावरताना दोन व्यक्तींमध्ये किमान दोन मीटर अंतर असायला हवे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे धुम्रपान म्हणजे सिगारेट बिडी ओढणे, तंबाखू गुटखा पान आदी खाणे आणि थुंकणे अशा गोष्टी टाळणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा गुन्हा आहे.
कार्यक्रमाच्या परीसरात सिगारेट, बिडी, तंबाखू अशा धुम्रपानासाठी आवश्यक वस्तूंची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कोविड 19 उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर छोट्या स्वरूपात व विशेष गर्दी न होता कार्यक्रम होतील याबाबत काळजी घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
जागतिक एड्स दिन कार्यक्रमाचे उद्घाटन
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : जागतिक एड्स प्रतिबंध दिनाचे आज 1 डिसेंबर रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲड आरिफ साजीद सैय्यद यांच्याहस्ते फित कापून सेल्फी स्टँण्डचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भुसारी, डॉ घोलप, डॉ कदम, डॉ मिलींद जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक श्री. राजपूत, मेट्रन कुरसिंगे, मिना शेळके, संगिता वाघ, मंगला उमाळे आदी उपस्थित होते. उपस्थितांना यावेळी मान्यवरांनी एचआयव्ही जनजागृती, तपासणी, कलंक व भेदभाव न पाळणे याबद्दल शपथ दिली.
पुढील काळात जिल्ह्यात ऑनलाईन जनजागृतीप कार्यक्रमात एचआयव्ही बाधीत मातेकडून बाळाला होणारा संसर्ग टाळणे, समाजाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एचआयव्ही जनजागृतीवर आधारीत एक मिनीटाचा व्हिडीओ स्पर्धा, स्लोगन सोबत सेल्फी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विविध शिबिरांचे आयोजन करून त्यामध्ये एचआयव्ही व गुप्त रोगांची तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात सापडलेल्या रूग्णांना मोफत औषधोपचार केला जाणार आहे. संचलन गजानन देशमुख यांनी, तर आभार लक्ष्मीकांत गोंदकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डापकू, आयसीटिसी, एआरटी सेंटर, नर्सिंग स्टाफ व नर्सिंगच्या विद्यार्थींनीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला मातृभूमी फाऊंडेशन, नेटवर्क ऑफ बुलडाणा चे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना अलर्ट : प्राप्त 855 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 100 पॉझिटिव्ह
• 22 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 975 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 855 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 100 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 98 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 764 तर रॅपिड टेस्टमधील 91 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 855 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 2, खामगांव तालुका : टेंभुर्णा 4, अंत्रज 1, घाटपुरी 1, जळगांव जामोद शहर : 9, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, धानोरा 1, जामोद 2, मलकापूर शहर : 8, शेगांव शहर : 5, शेगांव तालुका : जवळा बु 6, सिं. राजा शहर : 3, सिं. राजा तालुका : शेंदुर्जन 1, लोणार शहर : 2, दे. राजा शहर : 3, दे. राजा तालुका : सावखेड भोई 1, जवळखेड 1, बुलडाणा शहर : 17, बुलडाणा तालुका : सव 1, कोलवड 1, सातगांव म्हसला 1, भडगांव 1, दुधा 1, चिखली शहर : 10, चिखली तालुका : नायगांव खु 1, बेराळा 1, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : मानेगांव 1, अंबोडा 4, शेंबा 1, मोताळा तालुका : शेलापूर 1, मेहकर तालुका : मांडवा 1, गुंधा 1, हिवरा खु 1, मूळ पत्ता मुंबई 1, जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 100 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 22 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 8, सिं. राजा : 1, नांदुरा : 10, शेगांव : 1, मलकापूर : 1, मोताळा : 1.
तसेच आजपर्यंत 76001 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10802 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10802 आहे.
तसेच 1186 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 76001 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11361 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10802 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 425 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.
******
No comments:
Post a Comment