स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुसुम विशेष सर्व्हेक्षण मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान

 


 

बुलढाणा, (जिमाका) दि. 27: स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहीम जिल्ह्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार हे अभियान राबविले जाणार आहे.

 

या अभियानांतर्गत पंधरवड्याच्या कालावधीत जिल्ह्यात विविध आरोग्य साक्षरतेचे उपक्रम राबविण्यात येणार असून कुष्ठरोगाविषयी जनजागृती, लवकर निदान व उपचारावर भर देण्यात येणार आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने दि. 26 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी दालनात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. हरी पवार यांच्यासह संबंधित आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

 

अभियानांतर्गत शाळांमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग प्रतिज्ञेचे वाचन, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी व कविता वाचन, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, म्हणी व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यशाळा, महिला मंडळ व बचत गटांचे मेळावे तसेच शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, नगरपालिका व महानगरपालिका दवाखान्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्व्हेक्षण मोहिमेअंतर्गत वीटभट्टी, चुना भट्टी, गिट्टी खदान, आश्रमशाळा, वसतिगृहे, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, कारागृहे, बालसुधारगृहे, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती तसेच भटके व स्थलांतरित लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या