Tuesday, 27 September 2022

DIO BULDANA NEWS 27.09.2022

 

बुलडाणा आयटीआयमध्ये राष्ट्रीय प्रमाणपत्राचे वितरण

बुलडाणा, दि. 27 : बुलडाणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अखिल भारतीय व्यवसाय  परिक्षेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या कौशल्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना दिक्षांत समारंभात राष्ट्रीय प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

दिक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थपाक सुनिल पाटील होते. आमदार संजय गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बालाजी लोकरे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता उद्योजक एस. डी. जाधव, उद्योजक सुनिल मोडेकर, सुरेश चौधरी, मुत्यूंजय गायकवाड, गजेंद्र दांदडे आदी उपस्थित होते. विविध व्यवसायातून राज्यस्तरावर मिरिटमध्ये आलेल्या 42 उमेदवारांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

संस्थेचे प्राचार्य पी. के. खुळे यांनी प्रास्ताविक केले. गटनिदेशक भुजंग राठोड आणि एस. एस. सावरकर यांनी सुत्रसंचालन केले. संजय खर्चे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गटनिदेशक के. बी. इंगळे, बी. जी. राठोड, श्री. सराग, श्री. सावळे, श्री. चितारे, श्री. सानप, श्री. पवार, श्री. खत्री, श्री. वरोकार, श्री. आडे, रमेश काळे, संजीव बावणे, श्री. झगरे, श्री. कोलते, श्री. मोरे, श्री. सुर्यवंशी, अविनाश गवई, संतोष चवरे यांनी पुढाकार घेतला. 

0000000000

मध केंद्र योजनेसाठी अर्ज आमंत्रित

बुलडाणा, दि. 27 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे.

या योजनेत मध उद्योगाचे विनामूल्य प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनासाठी सहाय्य देण्यात येते.

या योजनेत वैयक्तिक मधपाळासाठी लाभार्थी हा साक्षर व 18 वर्षे वयावरील असावा. शेती असल्यास प्राधान्य मिळेल. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ या घटकासाठी व्यक्ती वय 21 वर्षापेक्षा जास्त व दहावी उत्तीर्ण असावी. व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या नावे किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्वावरील शेतजमीन असावी, तसेच मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

केंद्रचालक संस्था या घटकासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेची किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.

लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. याशिवाय मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावे लागेल. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, अरूणोदय बिल्डींग, सुवर्ण नगर, बुलडाणा, दूरध्वनी क्रमांक 07262-299076, मोबाईल क्रमांक 8329908470 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

00000

राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठानकडून ग्रंथालयांना अर्थसहाय्य

*28 ऑक्टोंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याकडून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत राबविण्यात येते. त्यानुसार यावर्षीसाठी ग्रंथालयांनी दि. 28 ऑक्टोंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2022-23 या वर्षासाठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन अर्ज सादर करावेत.

 समान निधी योजनांमध्ये इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना, योजनेच्या व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत. असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरीता अर्थसहाय्य देण्यात येते.

योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी www.rrlf.gov.in या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. आवश्यकता असल्यास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 28 ऑक्टोंबर 2022 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, मुंबई यांनी केले आहे.

000000

अंबिका बावणे यांनी जिल्हा पषिदेत उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 27 : कार्यालयास कोणतीही सुचना न देता सतत गैरहजर राहणाऱ्या अंबिका बावणे यांनी जिल्हा परिषदेत उपस्थित राहावे, असे प्रकटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

जवळा बु., ता. शेगांव येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे कार्यरत अंबिका ज्ञानदेव बावणे ह्या दि. 3 जुलै 2018 पासून कार्यालयास कोणताही अर्ज सादर न करता अनधिकृतरित्या गैरहजर आहेत. या गैरहजेरीच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा ‘शिस्त व अपील’ नियम, 1964 (6) नुसार खाते चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. या कार्यवाहीनुसार अंतिम कारणे दाखवा  नोटीस रहिवाशी पत्यावर पाठविण्यात आली आहे. या पत्यावर राहत नसल्याने अंतिम कारणे दाखवा नोटीस पोच करता आलेली नाही. या प्रकटनाद्वारे श्रीमती बावणे यांनी 10 दिवसाच्या आत कार्यालयास उपस्थित राहून अंतिम कारणे दाखवा नोटीस स्विकारावी अथवा एकतर्फी कार्यवाही अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.

                                      00000000000

मॅरेथॉन स्पर्धेमुळे वाहतूक मार्गात बदल

बुलडाणा, दि. 27 : बुलडाणा अर्बन को-ऑप सोसायटीतर्फे दि. 9 ऑक्टोंबर 2022 रोजी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव मार्गावरील वाहतूक सकाळी सहा ते दहा वाजेदरम्यान वळविण्यात आली आहे.

बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव मार्गावरील वाहतूक वरवंड-उदयपूर(उंद्री)- खामगांव, बुलडाणा मोताळा-नांदुरा-खामगांव, बुलडाणा-मोताळा-तरवाडी-पिंपळगाव राजा-खामगाव या मार्गावर दि. 9 ऑक्टोंबर 2022 रोजी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धक येण्याची शक्यता असल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक सुरु असल्यास मॅरेथॉन स्पर्धेस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment