Thursday, 22 September 2022

DIO BULDANA NEWS 22.09.2022

 

जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी व्हावे

*ऑनलाईन अर्ज  सादर करावे लागणार

बुलडाणा, दि. 22 : नेहरु युवा केंद्रातर्फे स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावनां वृध्दींगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा उत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी दि. 28 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

युवा उत्सवात चित्रकला, कार्यशाळा आणि स्पर्धा, कविता लेखन कार्यशाळा आणि स्पर्धा, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धा, जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संमेलन भारत @ 2047 युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धक बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असावा, दि. 1 एप्रिल 2022 रोजी वय 15 ते 29 वर्षे पर्यंत असावे, एका व्यक्तीला एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल, तसेच विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व  स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र कार्यशाळा व स्पर्धेसाठी प्रत्येकी 30 युवकांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 1 हजार रूपये, द्वितीय 750 रुपये, तृतीय 500 रुपये आणि स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेसाठी 10 युवकांना सहभागी होता येईल. यासाठी प्रथम बक्षीस 5 हजार रूपये, द्वितीय 2 हजार रुपये, तृतीय 1 हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात 10 समूह संच सहभागी होऊ शकतील. एका समूहनृत्यात किमान 5, तर कमाल 20 स्पर्धक सहभागी होऊ शकतील. यासाठी प्रथम बक्षीस 5 हजार रूपये, द्वितीय 2 हजार 500 रुपये, तृतीय 1 हजार 250 रूपये,  स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय युवा सम्मेलन भारत @ 2047 युवा संवाद’मध्ये  100 युवक सहभागी होऊ शकतील. यात सहभागी युवकांमधून विषयाची मांडणी, वक्तृत्व शैली या आधारावर चार युवकांची परिक्षकांतर्फे निवड करुन प्रत्येकी 1 हजार 500 रुपये बक्षीस देण्यात येईल. 

सदर कार्यक्रम ऑक्टोबर 2022 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी युवकांनी https://forms.gle/Yp76n8w2D8hVWaQt7 या लिंकवर दि. 28 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, तसेच अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे. 

00000

क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, मार्गदर्शकांनी माहिती सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यातील आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासन क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, तसेच विविध खेळाचे क्रीडा मार्गदर्शक यांनी आपली माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पात्र खेळाडूचे नाव, खेळ प्रकार, पुरस्काराचे नाव, उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे नाव, खेळाडूचा पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, तसेच क्रीडा मार्गदर्शकांची पात्रता एनआयएस, डिप्लोमा कोर्स, आंतरराष्ट्रीय खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, फक्त कोचिंगबाबतचा अनुभव आदी माहिती दि. 26 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव बुलढाणा यांनी केले आहे.

00000

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास

30 सप्टेंबर अंतिम मुदत

बुलडाणा, दि. 22 : केंद्रशासन पुरस्कृत धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सन 2022-23 करीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येत आहे. यासाठी दि. 30 सप्टेबर 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन नवीन आणि नुतनीकरण विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे. यासाठी अंतिम मुदत दि. 30 सप्टेंबर 2022 आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा होणार

बुलडाणा, दि. 22 : डाक विभागामार्फत या वर्षीचा राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यासाठी देशातील 75 शहर निवडण्यात आली आहे. यात बुलडाणा विभागातील खामगाव प्रधान डाकघराचा समावेश सुकन्या समृद्धी योजनेच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आला आहे.

बुलडाणा डाक विभागातर्फे नागरिकांमध्ये लहान बचत योजना खाते, सुकन्या समृद्धी योजनेची जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाकघरांमध्ये दि. 24 ते 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत मोहिम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत 10 वर्षाखालील प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडून त्यांचे भविष्य सुरक्षित करणे आहे. सुकन्या समृद्धी खाते सर्व बचत योजनांमध्ये सर्वाधिक 7.6 टक्के व्याज दर देते. हे खाते किमान 250 रुपयांच्या ठेवीवर उघडले जाते. या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल 1 लाख 50 हजार रूपये जमा केली जाऊ शकते. तसेच ही रक्कम  80 सी अंतर्गत आयकरामध्ये कर सवलतीसाठी देखील पात्र ठरते. या खात्याचा लॉक-इन कालावधी खाते काढलेल्या तारखेपासून 15 वर्षे आणि परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे. यातील 50 टक्के रक्कम ही मुलीच्या उच्च शिक्षणासाठी काढता येते. तसेच लग्नासाठी खाते बंद सुद्धा करता येते.

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड 7.1 टक्के, बचत ठेवी 4 टक्के, एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवी 5.5 टक्के, पाच वर्षांच्या मुदत ठेवी 6.7 टक्के, आवर्ती ठेव 5.8 टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजना 7.4 टक्के, मासिक आय योजना 6.6 टक्के, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 6.8 टक्के, 124 महिन्यात दाम दुप्पट होणारे किसान निवास पत्र 6.9 टक्के योजना आहेत.

नागरिकांनी नजिकच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट देऊन आपले बचत खाते, मुदत ठेव खाते, तसेच आपल्या मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते काढण्याचे आवाहन डाक अधिक्षक राकेश येल्लामेल्ली यांनी केले आहे.

00000



मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय प्रमाणपत्राचे वितरण

बुलडाणा, दि. 22 : मोताळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तहसीलदार डॉ. सारिका भगत हस्ते राष्ट्रीय प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार डॉ. भगत यांनी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोगाराबद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थ्यांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ बस थांबा मिळवून देणे, पीओटीएसची कामे मिळवून देणे, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

मोताळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या सुविधेकरीता संस्थेमध्ये वैद्यकीय तपासणी आणि रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी संस्थेतील वडील हयात नसलेल्या विद्यार्थिनी आकांक्षा गवई हिचे प्रवेश शुल्क भरून शैक्षणिक पालकत्व स्विकारले. प्राचार्य एस. डी. गंगावणे यांनी आकांक्षा गवई हिच्या गणवेश आणि स्टेशनरी खर्चाचे पालकत्व स्विकारले. अनंता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रुचिका मोरे यांनी आभार मानले.

00000

सोयाबीनवरील विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन करावे

*कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

बुलडाणा, दि. 22 : जिल्ह्यातील सोयाबीनवर पिवळ्या मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादूर्भाव झालेला दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावरील विषाणूजन्य रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

सोयाबीन वरील पिवळ्या मोझॅक रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळ्या रंगाचे छोटे छोटे चट्टे दिसतात. त्यानंतर पानावर चमकदार पिवळ्या रंगाचे मोठ्या आकाराचे चट्टे दिसतात आणि पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुजी राहतात ही लक्षणे आहेत. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: रोगग्रस्त बियाण्याद्वारे व  दुय्यम प्रसार हा पांढऱ्या माशी द्वारे होते,

सोयाबीन मोझॅकची विषाणूची लक्षणे ही रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटलेली दिसते पाने आखूड, लहान, जाडसर सुरकुतलेली होतात. पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानांमध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. पानाचा काही भाग हिरवा, तर काही भाग पिवळसर दिसून येतो.  रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो. या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलून करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यत: रोगग्रस्त बियाण्याद्वारे व दुय्यम प्रसार हा मावा किडी द्वारे होतो.

यावर सुरुवातीलाच रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढून नष्ट करावे, पिकामधील व बांधावरील तन नियंत्रण करून प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. या रोगावर नियंत्रण करताना पांढरी माशी व मावा किडी चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५ बाय ३० सेंमी आकाराचे एकरी २० ते २५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर लावावेत.

रोग, किडीचा प्रादूर्भाव दिसून येताच प्रादूर्भाव रोखण्यासाठी पांढरी माशी व मावा या किडीच्या व्यवस्थापनाकरीता इमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लोनीकामाईड ५० टक्के डब्ल्यूजी ३ ग्रॅम किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून या रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करताना किटकनाशके आलटून पालटून वापरावी. शेतकऱ्यांनी पायरेथ्रो ईड किटकनाशकाचा वापर टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

          बुलडाणा, दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2022-2023 करीता शिक्षण शुल्क, परीक्षा शुलक्‍ अर्ज आणि भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. या प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दि. 21 सप्टेंबर2022 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसेच बहुजन कल्याण इतर मागास विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनाचा लाभ देण्यात येतो.

           समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती, इमाव, विजाभज आणि विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी करुन परिपूर्ण अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसंबंधी अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी महाविद्यालयाची आहे. सर्व महाविद्यालयांनी सामाजिक न्याय विभाग, तसेच बहूजन कल्याण इतर मागास विभागामार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून नोंदणी करावी.

जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ, व्यावसायिक, अव्यावसायिक महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता प्राचार्य यांची घ्यावी. महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी mahadbt.mahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000

बालकांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून अर्ज आमंत्रित

          बुलडाणा, दि. 22 : बालकांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुकांनी यासाठी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

          बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 नुसार बालकांची काळजी. संरक्षण आणि उपचाराकरिता आवश्यक असेल अशा कालावधीसाठी बालकाला तात्पुरता ताब्यात घेण्यास सक्षम असेल अशा व्यक्ती, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती योग्य व्यक्ती म्हणून घोषित करेल. सदर व्यक्ती हे मुलांचे सामाजिक पुर्नवसन, कायदेविषयक सल्ला देण्याचे कार्य करेल.

बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समितीस व्यक्तीची विश्वसनीयता, योग्यता, विद्वत्ता, व्यावसायिक अर्हता, बालकांना हाताळण्याचा अनुभव आणि बालक स्विकारण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असून अशा इच्छुक व्यक्तींनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बसस्थानकामागे, डॉ. जोशी नेत्रालयाजवळ, बुलडाणा येथे अर्ज करावा, अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.

बालकांच्या क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी अर्ज करावा. यासाठी अर्जदार व्यक्तीस बालकांना हाताळण्याचा अनुभव आणि बालक स्वीकारण्याची इच्छा असावी. सदर व्यक्तीवर अधिनियमातील कोणत्याही अपराधाचा आरोप ठेवण्यात आलेला नसावा किंवा तो कोणत्याही अनैतिक कृत्यात किंवा बालकाशी दूर्वतनाच्या कृत्यांमध्ये किंवा बालकामगारास कामावर ठेवण्यासाठीच्या कृत्यांमध्ये किंवा नैतिक अध:पतनाचा अंतर्भाव असलेल्या अपराधामध्ये गुंतलेला नसावा. बाल न्याय मंडळ, बालकल्याण समिती गरजेनुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून एखाद्या व्यक्तीच्या विश्वसनीयतेचा यथोचितरित्या पडताळणी केल्यानंतर आणि जिथे शक्य असेल तिथे अशा व्यक्तीची पोलिसांकडून पडताळणी करून घेतल्यानंतर बालक किंवा बालकांसाठी योग्य व्यक्ती म्हणून नियुक्ती करेल. बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती किंवा बाल न्यायालय बालकाच्या गरजेवर आधारित व योग्य व्यक्तीशी विचार विनिमय करून ज्या कालावधीसाठी बालक योग्य व्यक्तीकडे राहील तो कालावधी निर्धारित करील. बाल न्याय मंडळ, बालकल्याण समितीचे कोणत्याही वेळी काळजी व संरक्षण यांच्या दर्जाबाबत किंवा इतर कोणत्याही कारणामुळे समाधान झाले नाही तर मंडळास किंवा समितीस कोणत्याही वेळी आदेशाद्वारे अशा मंडळ किंवा समितीच्या आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या तारखेपासून योग्य व्यक्ती म्हणून असलेली अशा व्यक्तीची मान्यता काढून घेता येईल. सदर सेवा ही विनामूल्य राहील, योग्य व्यक्तीला या कामाचा कोणताही मोबदला दिला जाणार नाही, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी यांनी कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment