नेहरु युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन
बुलडाणा, दि. 6 : आजादी का अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नेहरु युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय युवा उत्सव दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला, कविता लेखन आणि छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पुरस्कार 1 हजार रूपये, द्वितीय 750 रूपये, तृतीय 500 रूपये बक्षीस देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पुरस्कार 5 हजार रूपये, द्वितीय 2 हजार रूपये, तृतीय 1 हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील विजेते स्पर्धक राज्यस्तर आणि राज्यस्तरावरील विजेते स्पर्धक राष्ट्रीयस्तरावरील भाषण स्पर्धेकरीता पात्र ठरतील. राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार 25 हजार रूपये, द्वितीय 10 हजार रूपये, तृतीय 5 हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. राष्ट्रीयस्तरावर प्रथम पुरस्कार 2 लाख रूपये, द्वितीय 1 लाख रूपये, तृतीय 50 हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धेकरीता स्पर्धक हा बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असावा, 15 ते 29 वर्षे वयोगटातील असावा, तसेच मागील वर्षामधील भाषण स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना यामध्ये सहभागी होता येणार नाही. एका व्यक्तीला फक्त एकाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
समूहाकरीता जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रथम पुरस्कार 5 हजार रूपये, द्वितीय 2 हजार 500 रूपये, तृतीय 1 हजार 250 रूपये आणि जिल्हास्तरीय युवा संमेलन भारत @ 2047 युवा संवादमध्ये सहभागी युवकांमधून चार युवकांची निवड करुन त्यांना प्रत्येकी 1 हजार 500 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी स्पर्धेच्या संदर्भातील नियम व अटी, स्पर्धेचे विषय यासाठी नेहरु युवा केंद्राशी संपर्क साधावा. जिल्हास्तरीय युवा उत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील युवक-युवतींनी विहित नमुन्यातील नोंदणी फॉर्म दि. 13 सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यालयात सादर करावेत. विहित नमुन्यातील नोंदणी फॉर्म नेहरु युवा केंद्र कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. युवक-युवतींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.
नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि मुल्ये जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृद्धींगत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात चित्रकला, कविता, छायाचित्र, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हा युवा संमेलन ‘भारत @ 2047 युवा संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
00000
ई-पोस्ट सेवेमार्फत संदेश पाठविण्याची सुविधा
बुलडाणा, दि. 6 : पोस्ट ऑफिसच्या ई-पोस्ट सेवेमार्फत फक्त 10 रुपयात संपूर्ण भारतात कोठूनही कोठेही संदेश पाठवता येईल.
या सेवेमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नेमणुकीसाठी शुभेच्छा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा आपल्या प्रियजनांना गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, नववर्ष, वाढदिवस शुभेच्छा, संदेश देता येणार आहे.
कंपनी, फर्म, संस्थांकरिता दरात विशेष सवलत देण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिस बुलढाणा विभागातील सर्व उप आणि मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये ई-पोस्ट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-पोस्ट सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन बुलढाणा डाकघर विभागाचे अधिक्षक राकेश येल्लामल्ली यांनी केले आहे.
00000
क्रीडा पुरस्कार 2022साठी नामांकन करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : केंद्र शासनाच्या वतीने मेजर ध्यानंचद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, विद्यापीठांकरीता मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन अवॉर्ड 2022 पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचे प्रस्ताव दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावयाचे आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुकांनी नामांकने सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वर्षीपासून पात्र खेळाडूंनी सदर पुरस्काराकरीता मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे विहित नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभाग किंवा व्यक्तीच्या शिफारसीशिवाय थेट केंद्र शासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टल, वेबसाईटवर सादर करावे लागणार आहे. तसेच ऑनलाईन अर्जा करण्याबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At sectionsp4-moyas@gov.in किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी आणि कार्यालयीन वेळेत सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 पर्यंत संपर्क करावा. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती नियमावली व विहित नमुनातील अर्ज yas.nic.in/sports या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर पुरस्काराकरीता जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
00000
बनावट मद्यासाठी प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्या
दोघांवर राज्य उत्पादन शुल्काची कारवाई
*गणेशोत्सवात विविध ठिकाणी कारवाई
बुलडाणा, दि. 6 : बनावट विदेशी मद्यासाठी जिवंत प्लास्टिक बुचे बाळगणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. यात दोघांवर गुन्हे नोंदविण्यात आले, तर यातील एक आरोपी फरार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधीक्षक भाग्यश्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव कालावधीमध्ये अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि विक्री विरोधात दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी बुलडाणा ते खामगांव रस्त्यावर वरवंड शिवारातील दिव्य सेवा फांउडेशनसमोर एक पांढऱ्या रंगाची इंडीका कार क्र. एमएच 30 एई 1405 ची दारूबंदी गुन्ह्याकामी तपासणी केली असता कारमध्ये बनावट विदेशी मद्यासाठी वापरण्यात येणारे इंम्पेरीयल ब्ल्यू व्हिस्कीचे 2 हजार 500 नवीन वुचे आणि मॅकडॉल नं. 1 व्हिस्कीचे 2 हजार 500 नवीन बुचे असे एकुण पाच हजार नवीन बुचे महेंद्र नामदेवराव गोदे, रा. भारती प्लॉट, बाळापूर नाका, अकोला, ता. जि. अकोला आणि श्रीकृष्ण दादाराव गावंडे, रा. घुसर, ता. जि. अकोला या दोघांच्या ताब्यातून सापळा लावून जप्त करण्यात आले. यात कारसह एकुण १ लाख ७३ हजार ८० रूपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम ६५ ऐ, एफ व ८३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच चिखली परिसरात दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजी चिखली ते मेहकर रस्त्यावरील लव्हाळा चौफुली, ता. मेहकर येथे सापळा लावून एक सुझूकी कंपनीची एस-प्रेसो क्र. एमएच 28 बीके 6684 पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये देशी दारूचे 17.5 बॉक्स यात एकुण 892 देशी दारूच्या सिलबंद बाटल्या असा एकूण 3 लाख 8 हजार 940 रूपयांचा मुद्देमाल शाम किसन चांगाडे, पवन सुभाष अवसरे, दोघेही रा. अमडापूर, ता. चिखली या दोघांकडून जप्त करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोरडे दिवस जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कमी प्रतीचे बनावट मद्य विक्री होत असल्याने ही कार्यवाही करण्यात आली. जिल्ह्यात बनावट मद्य आढळण्याची शक्यता असल्याने, मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरात अशी अवैध मद्य वाहतूक, निर्मिती आणि विक्री होत असल्याचे आढळल्यास टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ किंवा व्हॉट्सऍप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.
या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक ए. आर. आडळकर, प्र. निरीक्षक आर. आर. उरकुडे, एन. के. मावळे, दुय्यम निरीक्षक आर. एम. माकोडे, जवान एस. आर. एडसरकर, एन. ए. देशमुख, एन. एम. सोळंके, ए. पी. तिवाने, पी. ई. चव्हाण आणि आर. ए. कुसळकर, वाहनचालक पी. टी. साखरे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास श्री. आडळकर करीत आहेत.
00000
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान
बुलडाणा, दि. 6 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हॉकीचे महान खेळाडू स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मुव्हमेंट, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यातील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
येथील जिजामाता क्रीडा आणि व्यापारी संकुलात खो-खो आणि कबड्डीच्या स्पर्धा घेण्यात आल्या. कबड्डी, खो-खो स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक श्री. पठाण, मंगलसिंग राजपूत, श्री. काठोके, हर्षल काळवाघे आदी उपस्थित होते. यातील विजयी आणि उपविजयी संघांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी क्रीडा अधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, विनोद गायकवाड, औरंगाबाद येथील जलतरण प्रशिक्षक जी. सुर्यकांत, खो-खोचे प्रशिक्षक सागर उबाळे उपस्थित होते. सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आयोजित स्पर्धांची माहिती दिली.
कबड्डीमध्ये मातृभूमी क्रीडा मंडळ, बुलढाणा संघाने प्रथम पारितोषिक, शिवाजी क्रीडा मंडळाच्या संघाने द्वितीय पारितोषिक पटकाविले. खो-खोमध्ये शिवसाई विद्यालयाच्या चमूला प्रथम, तर क्रीडा कार्यालयाच्या चमूला द्वितीय पारितोषिक मिळाले.
00000
चौथा येथे महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबीर
बुलडाणा, दि. 6 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघाच्या वतीने मदर तेरेसा यांच्या जन्मदिनानिमित्त चौथा येथे महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबीर पार पडले.
शिबीरामध्ये सरकारी वकिल अॅड. सोनाली सावजी यांनी महिलांविषयक कायद्याची माहिती सांगितली. डॉ. लता बाहेकर यांनी महिलांना मानसिक आजार आणि महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर हेमंत एस. भुरे यांनी, जनजागती शिबीराच्या आयोजनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमास उपस्थित महिलांना कायदेविषयक पुस्तक देण्यात आले.
अॅड. सुबोध तायडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी आर आर. चाकोतकर, अधिक्षक सुनिल मुळे, गजानन मानमोडे, आकाश अवचार, प्रविण खर्चे, वैभव मिलके, संजय नारखेडे, प्रताप खंडारे, ग्रामंचायत सचिव योगेश मुळे यांनी पुढाकार घेतला.
00000
शारदा ज्ञानपीठात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
बुलडाणा, दि. 6 : फिट इंडीया मुव्हमेंट, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शारदा ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संजय गायकवाड अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार रुपेश खंडारे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शेषनारायण लोढे, ॲथलेटीक्स असोशिएशनचे उपाध्यक्ष गोपालसिंग राजपुत, प्राचार्य जोत्स्ना जगताप, आंतरराष्ट्रीय सायकलपटू संजय मयुरे, शारीरिक शिक्षण शिक्षक रविंद्र गणेशे, राजेश डिडोळकर उपस्थित होते.
सुरवातीला दिप प्रज्ज्वलन आणि मेजर ध्यानचंद आणि शारदा मातेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. आमदार संजय गायकवाड यांनी आधुनिक संसाधने आणि सोशल मिडीयामुळै मुलांचा शारिरीक विकास खुंटला आहे. तसेच योग्य आहार, विहारामुळे मुलांची शारिरीक क्षमता कमी होत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकासासाठी शासनाने प्रत्येळ शाळेत एक तास खेळांची तासिका केली असल्याचे सांगितले.
तहसिलदार श्री. खंडारे यांनी मेजर ध्यानचंद यांच्याबाबत माहिती सांगून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात खेळाला महत्त्व देवून खेळाशी नाळ जुळवावी. तसेच अभ्यासासह क्रीडा क्षेत्रात करीयर करावे, असे असे सांगितले. रविंद्र गणेशे यांनी मेजर ध्यानंचद यांचा जीवनपट सांगून आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कार्य केलेल्या खेळाडूंचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच कराटे, सिकई मार्शल आर्ट, बॉक्सिंग आणि महिलांसाठी स्वसंरक्षणाकरीता स्वंयसिद्धा खेळाचे सादरीकरण करण्यात आले. आमदार संजय गायकवाड यांनी शारदा ज्ञानपीठ येथील मैदानावर फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले.
क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार सुत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ लिपीक विजय बोदडे, सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, भिमराव पवार, गणेश डोंगरदिवे, गिरीष चौधरी, संदीप पाटील, चंद्रकांत इलग, अक्षय गोलांडे, राहुल औशालकर, श्री. माहोरे, अरविंद अंबुसकर, विठ्ठल इंगळे, मो. सुफीयान, संकेत धामंदे, सागर उबाळे, दिपक जाधव आदी उपस्थित होते.
00000
शेतकऱ्यांनी सोयाबीनवरील मोझॅक रोगांचे व्यवस्थापन करावे
*कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाचे शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
सोयाबीन पिकावरील मोझॅक हा विषाणूजन्य असून तो सोयाबीन मोझॅक व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होतो. रोगग्रस्त झाडांच्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात, तसेच फिक्कट हिरवे व पिवळसर हिरवे रंगाचे पट्टे पानांवर दिसून येतात. झाडांची पाने गुंडाळली जातात. पानांवरील पेशी नष्ट होतात व झाड वाळते. त्यानंतर रोगग्रस्त झाडापासून तयार होणारे बियाणे आकाराने लहान व सुरकतलेले असते. त्याची उगवण क्षमता कमी होते. साधारणपणे जास्त तापमान या रोगास पोषक असून या हवामानास रोगांची लक्षणे ठळकपणे दिसून येतात, ही या रोगाची लक्षणे व परिणाम आहेत. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा किडीद्वारे तसेच बियाणेद्वारे होते.
शेतकऱ्यांनी रोग व्यवस्थापन करताना विषाणूरहित चांगल्या प्रतीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. रोगाची लक्षणे दिसताच विषाणूजन्य रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. विषाणूजन्य रोग प्रभावित क्षेत्रातील सोयाबीन बियाण्यासाठी वापरू नये. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा किडीद्वारे होत असल्याणे मावा किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस कीटकनाशकाची 15 मिली, 10 लिटर पाण्यात किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के एसएल या कीटकनाशकाची 4 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिवळामोझॅक हा विषाणूजन्य सोयाबीन पिकावर रोग असून तो मुगबिन येलो मोझॅक या विषाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी किटकाद्वारे होतो. या रोगाची लक्षणे व परिणाम ही रोगट झाडांच्या पानाचा काही भाग हिरवट तर काही पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. बाधित झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते. पाने सुरकतून जातात. फुले व शेंगांची संख्या कमी होते. सोयाबीनच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.
या रोगाचे व्यवस्थापन करताना या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. त्यामुळे पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकाचा वापर करावा. डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली किंवा मिथिल डेमेटॉन 25 टक्के प्रवाही 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाची लक्षणे दिसताच शेतातील रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सोयाबीन पिकात आंतरपिक व मिश्र पिक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी आढळते. पिवळे चिकट सापळे सोयाबीन पिकात हेक्टरी 10 ते 12 याप्रमाणे लावावेत, असे कृषि विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
00000
शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 6 : जिल्ह्यातील कापूस पिकावर आढळणाऱ्या गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची आढावा सभा पार पडली. यात गुलाबी बोंडअळी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिनिंग मिल प्रमुखांना जिनिंग मिलमध्ये कामगंध सापळे लावण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच क्रॉपसॅपमधील नियमित सर्वेक्षणांतर्गत खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक नुकसान पातळीवर आलेली असल्याने. आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेल्या गावामध्ये कृषि विज्ञान केंद्र आणि कृषि विभागामार्फत क्षेत्रिय स्तरावर भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तालुकासतरावर वितरीत करण्यात आलेल्या आपत्कालिन निविष्ठाची फवारणी गावात करुन घेण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. कापूस पिकाचे सर्वेक्षण करुन गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करताना सर्वप्रथम पिक 90 दिवसाचे होईपर्यंत दर आठवड्यात पिकांचे सर्वेक्षण करुन मजुराच्या सहायाने डोमकळ्या वेचून अळ्यासहित नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीचे सर्वेक्षणासाठी प्रति एकर 2 याप्रमाणे कामगंध सापळे लावण्यात यावे. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवडयात नष्ट करावे. आवश्यकतेनुसार 20 ते 25 दिवसातून सापळ्यातील ल्यूर बदलण्यात यावे.
सापळ्यामध्ये पतंग अडकण्यास सुरुवात झाल्याबरोबर 5 टक्के निबोळी अर्काची किंवा अॅझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलामध्ये 5 टक्के प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस 20 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणत फवारणी करावी. 5 ते 10 टक्के प्रादुर्भाव आल्यास थायोडिकर्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भाव 10 टक्केपेक्षा जास्त आढळुन आल्यास भिश्र किटकनाशकाची जसे प्रोफेनोफॉस 40 टक्के अधिक सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 अधिक सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 अधिक इंडोक्झाकार्ब 10 टक्के एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. जिनिंग मिल प्रमुखांनी मिलमध्ये प्रकाश सापळे कामगंध सापळे, फेरामन ट्रॅप्स लावून त्यात अडकलेले पंतग नियमित गोळा करुन नष्ट करावेत. कापूस पिकाचा खोडवा किंवा फरदड पिक घेण्याचे टाळावे. फरदड घेतल्याने गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम कायम राहुन या किडीचा प्रादूर्भाव पुढील वर्षाच्या हंगामात वाढण्याची शक्यता अधिक असते, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस. जी. डाबरे यांनी कळविले आहे.
00000
जनावरावरील लंपी स्कीन आजाराबाबत सतर्कता बाळगावी
*पशू संवर्धन विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : ग्रामीण भागात जनावरावरील लंपी स्कीन डिसीजचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याबाबत पशूपालकांनी सतर्कता बाळगून जनावरांवर उपचार करावे, असे आवाहन पशू संवर्धन विभागाने केले आहे.
लंपी हा आजार विषाणूजन्य आहे. अत्यंत संसर्गजन्य आजार देवी विषाणू गटातील कप्रिपाक्स प्रवर्ग आहे. या रोगाचा प्रसार चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे, बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने किंवा दूषित चारा व पाण्यामुळे होतो.
या रोगाची लक्षणे ही अंगावर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी, सुरुवातीस भरपूर ताप, डोळे, नाकातून चिकटस्राव, चारापाणी खाने बंद किंवा कमी, दूध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सूज येऊन लंगडणे आदी लक्षणे दिसतात. या रोगावर नियंत्रणासाठी गोठ्यामध्ये डास, माश्या, गोचिड होणार नाही याची दक्षता घ्यावी, जनवरांवर उपचार करताना नविन सिरींज निडलचा वापर करावा, गोठ्यामधील बाहेरील व्यक्ति, डॉक्टर येणार असतील तर सर्व प्रथम त्यांचे निर्जंतुकीकरण करावे, तसेच साथीचा आजार सुरु असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी विक्री थांबवावी.
रोगावर नियंत्रणासाठी बाधित जनावरे तत्काळ वेगळे करावे, गोठ्यामध्ये सोडीयम हायपोक्लोराईड, फिनाईलची फवारणी करावी, जनावरांना आयव्हरमेक्टिन इंजेक्शन दिल्यास कीटक गोचिड यांचे नियंत्रण होते. गावामध्ये कीटकनाशक औषधाची फवारणी करावी. या रोगाच्या नियंत्रणासाठी पशूसंवर्धन विभागाकडून जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामध्ये डॉ. ए. बी. लोणे, टी. एस. पाटील, डी. वि. जुंदळे, पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद बुलडाणा, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती तालुकास्तर, नजीकचा पशू वैद्यकीय दवाखाना, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय कक्ष आणि संबंधित पशूवैद्यकीय दवाखाना, संस्था प्रमुखांचे संपर्क क्रमांक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment