Tuesday, 20 September 2022

DIO BULDANA NEWS 19.9.2022

 



डॉ. आंबेडकरांचा पदस्पर्श झालेल्या विहिरीला

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट
खामगाव, दि.१९ (उमाका) : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ऐतिहासिक महत्व असलेल्या पातुर्डा येथे भेट दिली. पातुर्डा येथील आठवडी बाजारातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श झालेल्या विहिरीला त्यांनी भेट दिली.
भूपेंद्र यादव यांनी विहीर स्थळाची पाहणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हारार्पन करून अभिवादन केले. याठिकाणी उपस्थित नागरीक व अधिकारी यांच्याकडून गावाचे महत्व जाणून घेतले. यानंतर महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पन केले.
यानंतर सरस्वती वाचनलयाला भेट दिली. यावेळी खामगावचे  आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, विजयराव शिंदे, उपविभागीय अधिकारी श्री.  देवकर, संग्रामपूरचे तहसीलदार श्री. वरणगावकर, गटविकास अधिकारी श्री. पाटील, सरपंच शैलजा भोंगळ,  पातुर्डा ग्रामविकास अधिकारी एस. पी. मेहेंगे, सरस्वती वाचनालयाचे अध्यक्ष उत्तमराव तायडे, तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार चांडक आदी उपस्थित होते.

 00000




केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी घेतले श्रींचे दर्शन


खामगांव, दि.१९ (उमाका) : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिराला भेट देऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने निळकंठ पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी सकाळी मंदिरात पोहचून श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील यांनी संस्थानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह संस्थानचे सेवाधारी उपस्थित होते.

0000

कृषि विभागाच्या सेवा पंधरवड्यास सुरुवात

बुलडाणा, दि.19 : कृषि विभागातर्फे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यास सुरुवात करण्यात आली. यात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.

या पंधरवड्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे, अर्ज आदींचा निपटारा  करण्यात येणार आहे. या पंधरवडयामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यात येईल. शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय आणि इतर कार्यालयाशी सपंर्क साधावा. त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात येतील, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी कळविले आहे.

                                            00000000

लंपी रोगासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर

बुलडाणा, दि.19 : जनावरात आढळून आलेल्या लंपी रोगासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावरून नागरिकांनी माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लंपी आजाराची जनावरे आढळून आल्याने या रोगाचा प्रसार झालेला असून बाधित जनावरांवर वेळीच औषधोपचार करुन आजावर नियंत्रण करण्यात येत आहे. आजारासंबधी पशुपालकांच्या तक्रारी निवारण करण्याकरिता पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1962 व जिल्हाधिकारी नियंत्रण कक्षाचा क्रमांक 07262-242683 व टोल फ्री क्रमांक 1077 सुरु करण्यात आला आहे. या आजारासाठी वेळीच उपचार केल्यास जनावरे पुर्णपणे बरी होतात, तसेच मनुष्यास या आजाराच्या संसर्गाचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पशू पालकांनी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे.

                                                         00000000

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत सुधारणा

बुलडाणा, दि.19 : राज्यात उद्भवलेल्या गोवंशीय पशुधनास झालेल्या विषाणूजन्य लंपी चर्म रोगावर नियंत्रणासाठी राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामाजाच्या वेळेत सुधारणा करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सलय, श्रेणी 1, श्रेणी 2 चे सर्व दवाखाने, फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळा सोमवार ते रविवार दरम्यान सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे.  यात जेवणासाठी सुट्टीची वेळ दुपारी 1 ते 2 राहणार आहे, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोने यांनी कळविले  आहे.

                                            00000000

ज्येष्ठ नागरिकांसाठी हिवरा आश्रम येथे आरोग्य शिबीर

बुलडाणा, दि.19 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. हे आरोग्य शिबीर दि. 1 ऑक्टोंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

आरेाग्य शिबीराला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकीत्सक, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीकांनी दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी श्री स्वामी विवेकानंद संस्था, हिवरा आश्रम, ता. मेहकर येथे सकाळी ११ वाजता आरोग्य तपासणी शिबीरासाठी उपस्थित राहून आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन  समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000000




केंद्राच्या योजना राबविताना येणाऱ्या सर्व समस्यांचा निपटारा करणार

-केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

*केंद्राच्या योजनांचा वेळोवेळी आढावा घेणार

*विभागांनी माहितीचे आदान प्रदान करावे

बुलडाणा, दि.19 : केंद्र शासनाच्या विविध योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. केंद्राच्या योजना राबविताना येणाऱ्या सर्व समस्यांचा निपटारा करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री. यादव यांनी केंद्र शासनाच्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. यादव यांनी प्रामुख्याने बँकांमार्फत विविध घटकांना देण्यात येणाऱ्या कर्ज योजना, कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान, जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजना, पोषण आहार, विविध आरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, डिजिटल इंडिया, आवास योजना, कामगार कल्याण योजनांचा आढावा घेतला.

यावेळी श्री. यादव म्हणाले, केंद्र शासनाच्या सहयोगाने राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा आश्वासक विकास आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असलेल्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यात जनतेच्या विकासासाठी प्रतिबद्ध असलेले सरकार आहे. सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रशासनाने दुवा म्हणून कार्य करावे.

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. मात्र एक विभाग दुसऱ्या विभागाशी माहितीचे आदान प्रदान करीत नाही. आजच्या काळात माहितीचे आदान प्रदान याबाबीला प्रचंड महत्त्व आले आहे.  त्यामुळे प्रत्येक विभागाने आपली माहिती दुसऱ्याशी आदान प्रदान केल्यास जिल्ह्याच्या विकासासाठी लाभदायक ठरू शकते.

श्री. यादव यांनी राज्यात सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या संदर्भात राज्यात होत असलेली अंमलबजावणी, त्यात येत असलेल्या अडीअडचणी याबाबत आढावा घेतला. अडचणींचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार सदैव तत्पर राहील याची हमी दिली. केंद्र शासनाच्या योजना अधिक गतिमान पद्धतीने राबविणे आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या विभागाकडे असलेला डाटा सर्व विभागांनी एकत्र येऊन त्याचे पृथक्करण करावे आणि अधिकाधिक उद्दीष्टे निश्चित करुन त्यांच्या पुर्ततेसाठी एकत्रित कार्य करावे, असे निर्देश दिले.

केंद्र शासनाने रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे पावले उचलली आहेत.  उद्योग उभारणीसाठी कर्ज, वीज, रस्ते, विमा याबाबी उपलब्ध करून दिल्या आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरूनही रोजगार निर्मितीक्षम उद्योग उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यानिमित्त विविध विभागाच्या लाभार्थ्याना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

०००००


No comments:

Post a Comment