Wednesday, 26 July 2023

DIO BULDANA NEWS 26.07.2023




 लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य यशस्वी करावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 25 : लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले आणि अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालके आणि गरोदर मातांचा शोध घेण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 राबविण्यात येणार आहे. येत्या ऑगस्टपासून तीन महिने हे मिशन सुरू राहणार आहे. माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे मिशन यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0बाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्यासह आरोग्य यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या मिशनमध्ये सुरवातीला दोन वर्षापर्यंतच्या लसीकरणापासून वंचित आणि गळती झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण हे 7 ते 12 ऑगस्ट, 11 ते 16 सप्टेंबर, 9 ते 14 ऑक्टोबर या तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे. ही मोहिम प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात झिरो डोस, सुटलेले व वंचित राहिलेली लाभार्थी क्षेत्र, गोवर आजारासाठी अति जोखमीचा भाग, नियमित लसीचा कार्यक्रम, स्थलांतरीतांचे लसीकरण, गेल्या वर्षात गोवर, घटसर्प, डांग्या खोकला उद्रेकग्रस्त भागात लसीकरण करण्यात येणार आहे.

या मिशनमध्ये नियमित लसीकरण सत्राव्यतिरिक्त अतिरिक्त सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. लसीकरण सत्र हे संस्था, बाह्यसंपर्क आणि मोबाईल क्षेत्र अशा तीन सत्रात राबविण्यात येणार आहे. लसीकरण करावयाच्या समुहाच्या जवळ हे सत्र आयोजित करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी प्रशिक्षण तसेच जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच वर्षांपर्यंतची एक लाख 6 हजार 798 बालके आढळून आली आहेत. यात एक वर्षाखालील 328, एक ते दोन वर्षाखालील 294 आणि दोन ते पाच वर्षाखालील 178 बालके लसीकरण मोहिमेपासून वंचित असल्याचे आढळून आले आहे. या बालकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी दिले.

000000

बुलडाणा येथे सोमवारी रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलडाणा आणि सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. सोमवार दि. 31 जुलै रोजी सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रोजगार मेळाव्यात नामांकित उद्योजकांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येईल.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तथा मॉडेल करीअर सेंटरच्या rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी दि. 31 जुलै रोजी सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जतकर कॉम्प्लेक्स, पाटबंधारे ऑफिससमोर, संगम चौक, बुलडाणा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

पात्र, गरजू व नोकरी इच्छुक महिला, पुरुष उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता अर्ज करु शकतात. आवश्यक कागदपत्रांसह सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहून आपली नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, काही अडचण आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 07262 - 242342 तसेच कार्यालयातील योगेश लांडकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7447473585 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलडाणाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना

*प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या अधिनस्त असलेल्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2023-24ची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थिनींनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्प आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, संग्रामपूर, ता. संग्रामपूर जि. बुलडाणा, या वसतिगृहाकरीता सातवी, दहावी आणि बारावीलगतच्या अभ्यासक्रमाकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.

वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थिनी ह्या अनुसूचित जमातीच्या असाव्यात. विद्यार्थ्यांनीकडे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चालू वर्षातील तहसिलदारांचा मुळ उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे. सदरचे खाते आधार कार्ड आणि मोबाईलशी संलग्न असावा. बँक खात्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहर, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावेत. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली संस्था मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्था आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा.

विद्यार्थिनी आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, प्रवेश घेतलेल्या शाळा, महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचे हमीपत्र, शाळा, कॉलेज सोडल्याचा दाखला, मार्कशिट, विद्यार्थ्यांचा फोटो, आधारकार्ड, ग्रामसेवक, तलाठी यांचे आई, वडील नोकरीवर नसल्याचे प्रमाणपत्राची मूळ प्रत, ऑनलाईन भरलेला फॉर्म ऑफलाईन प्रत काढून सदर प्रत आणि सोबत ऑनलाईन सादर केलेले आवश्यक सर्व दस्ताऐवज संबधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहिल. योजनेमध्ये विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थानी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थीनी आणि शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे.

इयत्ता दहावी, बारावीच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेशासाठी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जुलै 2023 पुर्वी नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे वसतिगृहाच्या कार्यालयात जमा करावे, असे आवाहन केले आहे.

00000


No comments:

Post a Comment