चंद्रयान मोहिमेतील उद्योजकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार
बुलडाणा, दि. 18 : इस्त्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेत लागणाऱ्या दोन सुट्या भागाची निर्मिती जिल्ह्यातील खामगाव औद्योगिक वसाहतीत झाली आहे. मोहिमेसाठी विकमशी फेब्रीक्स येथे थर्मल शिट आणि श्रद्धा रिफायनरी येथे स्टरलिंग सिल्व्हर ट्युबची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात अत्युच्च्य दर्जाच्या साहित्याची निर्मिती केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी गितीका विकमशी, स्वर विकमशी, शेखर भोसले या उद्योजकांचा खामगाव येथे सत्कार केला.
चंद्रयान मोहिमेसाठी विकमशी फेब्रीक्स प्रायव्हेट लिमीटेड येथे तीन थर्मल शिल्डची निर्मिती करण्यात आली आहे. यानाच्या खालील भागात दोन आणि वरील भागात एक असे तीन थर्मल शिल्ड बसविण्यात आले आहे. हे थर्मल शिल्ड यानाचा मुख्य भागाला सुरक्षित ठेवण्याच्या कार्यासोबतच वेगवेगळ्या टप्प्यावर वापरण्यात येणाऱ्या इंधनापासूनही सुरक्षितता देते. थर्मल शिल्डसोबतच कंपनीमध्ये उत्पादित होणाऱ्या इतर उत्पादनाची माहिती संचालक स्वर विकमशी यांनी दिली. तसेच श्रद्धा रिफायनरी येथे स्टरलिंग सिल्व्हर ट्यूब तयार करण्यात आल्या आहे. या ट्यूब चांदीच्या बनविण्यात आल्या आहे. सर्वोत्कृष्ट धातूपासून या ट्यूब तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती श्रद्धा रिफायनरीचे संचालक शेखर भोसले यांनी दिली.
सुरवातीला जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी विकमशी फेब्रीक्सची पाहणी केली. याठिकाणी यंत्रसामुग्रीसह कच्चा माल ते उत्पादित होत असलेल्या शिटची माहिती घेतली. त्यानंतर गितीका विकमशी आणि स्वर विकमशी यांनी कंपनीमध्ये तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनाची निर्मिती आणि निर्यातीबाबत माहिती दिली. खामगाव येथून संरक्षण दल, पेट्रोलियम कंपनी, बंदरे, वैद्यकीय क्षेत्रात विविध उत्पादनांचा पुरवठा होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी श्रद्धा रिफायनरीला भेट दिली. याठिकाणी निर्मिती झालेल्या सिल्व्हर ट्यूब आणि सिल्व्हर कोटींग स्वीचची माहिती संचालक शेखर भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी, चंद्रयान मोहिमेत जिल्ह्यातील उद्योजकांनी खारीचा वाटा उचलला असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. जिल्ह्यात आल्यानंतर जगात निर्यात होणारा पिअर साबून उत्पादित होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आता इस्त्रोसारख्या नामांकित संस्थेमध्ये महत्वाकांक्षी चंद्रयानाला लागणारी सामुग्रीची निर्मिती करण्यात आली आहे. ही बाब देशाची प्रतिमा उंचावणारी आहे. उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण सामुग्री तयार होत असल्यामुळे इतर उद्योगांनाही यापासून प्रेरणा मिळेल. उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांच्या प्रशासन नेहमीच पाठीशी राहिल. येत्या काळातही गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी संपूर्ण सहकार्यासोबतच उद्योगांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
000000
कृषि यांत्रिकीकरणाने शेतीला मिळाली आधुनिकतेची जोड
बुलडाणा, दि. 18 : काही काळापासून शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे नफ्याची शेती करणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. खर्च कमी करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न व्हावे, शासनाकडून यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. यासाठी कृषि विभागातर्फे कृषि यांत्रिकीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कृषि यांत्रिकीकरणाने शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याने शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन नफ्याच्या शेतीस सुरवात केली आहे.
शेतकऱ्यांना शेती करताना अधिक सोईचे, सुलभ व्हावे आणि यंत्रांचा वापर वाढवून खर्च कमी व्हावा, यासाठी कृषि विभागामार्फत कृषि यांत्रिकीकरणाच्या प्रमुख तीन योजना राबविण्यात येत आहेत. त्यात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण, कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेचा समावेश आहे.
कृषि यांत्रिकीकरणाच्या या तीन योजनांव्यतिरिक्त राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य, गळीत धान्य आणि पौष्टिक तृणधान्य योजनेंतर्गत कृषि औजारे दिली जात आहे. शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, दर्जेदार कृषि औजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देणे, कृषि उत्पादन प्रक्रियेत अद्यावत यंत्र सामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी या योजना राबविण्यात येत आहे.
या विविध योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, बँक खाते आणि आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, शेताचा सातबारा आणि आठ अ, यंत्र, कृषि औजाराचे अंदाजपत्रक जोडणे आवश्यक आहे. यांत्रिकीकरणाच्या विविध योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र आणि औजारे, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर चलित यंत्र आणि औजारे, पिक संरक्षण साधने, मनुष्य आणि बैलचलीत औजारे, प्रक्रिया युनिट्स, औजारे बँक आदी अवजारे दिली जात आहे.
योजनेतील विविध प्रकारच्या साहित्यासाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के किंवा 1 लाख 25 हजार रुपये आणि इतर शेतकऱ्यांना किंमतीच्या 40 टक्के किंवा एक लाख यापैकी जी कमी असेल तितकी रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. इतर यंत्र आणि कृषि अवजारांसाठी वेगवेगळ्या औजारासाठी त्या प्रमाणात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के व इतर शेतकऱ्यास किंमतीच्या 40 टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
00000
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, युवकांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य
बुलडाणा, दि. 18 : दिव्यांगांना त्यांच्या व्यंगत्वावर मात करत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येते. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, तर युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य यासारख्या योजनांचा राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेऊन असंख्य दिव्यांग आणि युवक आत्मनिर्भर होत आहेत.
दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये शालांतपूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्याच्या समावेश आहे. योजनेंतर्गत अंध, अंशत: अंध, अस्थिविकलांग, कुष्ठरुग्णमुक्त, कर्णबधिर, पायरीच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये, मतिमंद व मानसिक आजाराच्या मतिमंदांच्या विशेष शाळेतील 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा 150, अंध, अंशतः अंध, अस्थी विकलांग, कुष्ठरुग्णमुक्त इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 150, अंध, अंशत: अंध, अस्थी विकलांग, कुष्ठरुग्णमुक्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दर दरमहा 200 रुपये, तर दिव्यांग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थ्याना दरमहा 300 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा अनुत्तीर्ण झालेला नसणे आवश्यक आहे.
शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. या अंतर्गत वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी, ॲग्रीकल्चर, व्हेटरनरी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार 200, तर वसतिगृहात राहत नसलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 550 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. कला, विज्ञान, वाणिज्यमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम, तसेच व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाच्या वसतिगृहात राहणाऱ्याना दरमहा 820 तर वसतिगृहात राहत नसलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 530 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार करता यावा, यासाठी वित्तीय सहाय्य योजना राबविण्यात येते. यासाठी वार्षिक उत्पन्न एक लाख रूपयांपेक्षा कमी असावे. वय 18 ते 50 वर्षे यामधील असावे. योजनेंतर्गत 1 लाख 50 हजार रुपयापर्यंतच्या व्यवसायाकरिता 80 टक्के बॅंकेमार्फत कर्ज, 20 टक्के अथवा कमाल 30 हजार रुपयांपर्यंत अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य दिले जाते.
दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास सहाय्य
योजनेंतर्गत दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा दिव्यांगत्व नसलेल्या वधू किंवा वराने दिव्यांगत्व असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. अर्थसहाय्यामध्ये 25 हजाराचे बचत प्रमाणपत्र, 20 हजार रोख, 4 हजार 500 संसार उपयोगी वस्तू, तर 500 रुपये स्वागत समारंभ खर्चासाठी देण्यात येते. यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत विवाह नोंदणी दाखला, वर, वधूचे शाळा सोडल्याचे दाखले, एकत्रित लग्नाचा फोटो, अधिवास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
00000
पाच लाखांपर्यंत मोफत उपचारासाठी आयुष्मान भारत कार्ड
*आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना आरोग्य विम्याची सुविधा
बुलडाणा, दि. 18 : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतात. त्यासाठी आयुष्मान भारत कार्ड काढणे आवश्यक आहे. मोफत उपचारासाठी नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड काढावे लागणार आहे.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्मान भारत योजना संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेत समाजातील आर्थिकदृष्ट्या नागरिकांना आरोग्य विम्याची सुविधा मिळते. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब, उपेक्षित कुटुंब, तसेच शहरी गरीब कुटुंबातील सदस्यांना ५ लाखांपर्यंत आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे.
आरोग्य विम्याच्या लाभासाठी आयुष्मान भारत कार्ड असणे अनिवार्य आहे. नागरिकांनी जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सार्वजनिक सेवा केंद्रामध्ये कार्ड काढल्या जाते.
पाच लाखांपर्यंत उपचार मोफत
आयुष्मान भारत योजनेत लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना पैसे भरावे लागत नाही. रुग्णालयात दाखल झाल्यापासून उपचाराचा पाच लाखांपर्यंतचा खर्च या योजनेतून मिळतो. जिल्ह्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्रे, सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय व महात्मा फुले योजनेंतर्गत अंगीकृत असलेली रुग्णालये यामध्ये कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ७५ हजार ६९७ लाभार्थ्यांनी या योजनेंतर्गत उपचार घेतले आहेत. या रुग्णांवरील उपचारासाठी शासनाने ३५३ कोटी २ लाख ४९ हजार ४१९ रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे या योजनेचा मोठा आधार गरजू रूग्णांना मिळत आहे. केंद्र सरकारने सन २०११मध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबाची जनगणना केली होती. त्यात नाव असणाऱ्या गरीब कुटुंबांना हे कार्ड मिळते. जिल्ह्यात ७ लाख ४५ हजार १९९ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत कार्ड वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३ लाख १६ हजार १८५ नागरिकांना कार्डचे वितरण करण्यात आले आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत कार्डचे वितरण करण्यात येत आहे. उर्वरित कार्ड वितरीत करण्यासाठी तालुकास्तरावर आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment