Thursday, 20 July 2023

DIO BULDANA NEWS 20.07.2023

 भटक्या विमुक्तांच्या निवाऱ्यासाठी मुक्त वसाहत योजना

बुलडाणा, दि. 20 : विमुक्त जाती व भटक्या जमातीचा समाज अद्यापही समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. या समाजास विकासाच्या मुळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना विमुक्त, भटक्या जमातीसाठी राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात येत आहे.

भटक्या विमुक्त समाजाचे राहणीमान उंचावे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे, त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ग्रामीण भागामध्ये अश्या कुटुंबांना प्रत्येकी पाच गुंठे जमीन उपलब्ध करून देण्यात येते. तसेच त्यावर 269 चौरस फुटाचे घरे बांधुन देण्यात येते. उरर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येते. ग्रामीण भागातील 33 जिल्ह्यामधील विमुक्त जाती व जमाती प्रवर्गाची जास्त लोकसंख्या असलेली 3 गावे निवडण्यात येवुन यातील 20 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

लाभार्थी कुटुंब हा विमुक्त जाती, भटक्या जमाती या मुळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजिवीका करणारे असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रूपयांपेक्षा कमी असावे. लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे. लाभार्थी कुटुंब हे झोपडी, कच्चे घर, पालामध्ये राहणारे असावे. लाभार्थी कुटुंब भूमिहीन असावे. लाभार्थी हा राज्याचा अधिवासी असावा. लाभार्थी कुटुंबाने राज्यात कुठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येणार आहे. लाभार्थी वर्षभरात किमान 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा, हे या योजनेचे निकष आहेत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना

विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील योजना ही रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक लाभार्थ्यांना राज्य व्यवस्थापनाच्या ग्रामीण गृहनिर्माण कक्षामार्फत थेट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांकडे घरकुल बांधण्याकरीता स्वत:ची जागा असल्यास, असे लाभार्थी वैयक्तिक लाभास पात्र आहेत. राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ, दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामासाठी प्रती घरकुल 1 लाख 30 हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. सर्वसाधारण क्षेत्राकरीता 1 लाख 20 लाख देय आहे.

धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम

भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना योजना राबविण्यात येते. अनेक वर्षे विकासापासुन दूर असलेल्या विमुक्त जाती भटक्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वांगीण विकास आणि स्थिरता यावी, यासाठी भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी राज्यातील ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे. यात धनगर समाजासाठी 10 हजार घरे बांधुन देण्याची योजना आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रूपयांपेक्षा कमी असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पनाचे प्रमाणपत्र, राज्यातील वास्तव्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्रात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. शासनाच्या नियमानुसार या योजनेचा लाभ घेता येतो. त्यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच योजना

बुलडाणा, दि. 20 : अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानामधील अन्न धान्य पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातील गळीतधान्य आणि तेलताड योजनेमध्ये फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच योजना राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामध्ये सन 2023-24 मध्ये अन्नधान्य पिके आणि गळीत धान्य अंतर्गत फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच यासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांच्याकडून तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत. गोदाम बांधकाम आणि बीज प्रक्रिया संचचा लाभ हा नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ असणाऱ्यांना आहे. त्यासाठी दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. मुदतीत अर्ज करणाऱ्या नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांचाच विचार केला जाईल. जिल्ह्यास गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संचासाठी लक्षांक प्राप्त आहे. या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याची स्थानिकरित्या सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.  

गोदाम बांधकाम

              जिल्ह्यामध्ये या योजनेंतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय देण्यात येणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहिल. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.

बीज प्रक्रिया संच

सदर योजनेंतर्गत उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रक्रिया संच उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनीने बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहिल. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर व बीज प्रक्रिया संच उभारणी पूर्ण झाल्यावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.

00000

अनुसूचित जमातीच्या मुला, मुलींसाठी शासकीय वसतिगृह योजना

*प्रवेश प्रक्रिया सुरू, अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 20 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या अधिनस्त असलेल्या आदिवासी मुलांचे आणि मुलींच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक वर्ष 2023-24ची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्प आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह चिखली रोड, कादरीया कॉलेज जवळ, बुलडाणा, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, जिजामाता कॉलेज जवळ, बुलडाणा, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, संग्रामपूर, ता. संग्रामपूर जि. बुलडाणा, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलडाणा अर्बन बँकेजवळ, संग्रामपूर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा. आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह जी. एस. कॉलेजच्या मागे, खामगाव, ता. खामगाव, जि. बुलडाणा या वसतिगृहाकरीता सातवी, दहावी आणि बारावीलगतच्या अभ्यासक्रमाकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.

वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी ह्या अनुसूचित जमातीच्या असाव्यात. विद्यार्थ्यांकडे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चालू वर्षातील तहसिलदारांचा मुळ उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे बंधनकारक आहे. सदरचे खाते आधार कार्ड आणि मोबाईलशी संलग्न असावा. बँक खात्याची प्रत सोबत जोडावी. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहर, तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवासी नसावेत. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली संस्था मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्था आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा.

विद्यार्थ्यांने आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, प्रवेश घेतलेल्या शाळा, महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुखाचे हमीपत्र, शाळा, कॉलेज सोडल्याचा दाखला, मार्कशिट, विद्यार्थ्यांचा फोटो, आधारकार्ड, ग्रामसेवक, तलाठी यांचे आई, वडील नोकरीवर नसल्याचे प्रमाणपत्राची मूळ प्रत, ऑनलाईन भरलेला फॉर्म ऑफलाईन प्रत काढून सदर प्रत आणि सोबत ऑनलाईन सादर केलेले आवश्यक सर्व दस्ताऐवज संबधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे सादर करणे आवश्यक राहिल. योजनेमध्ये विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थानी फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे.

इयत्ता दहावी, बारावीच्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशासाठी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जुलै 2023 पुर्वी नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे वसतिगृहाच्या कार्यालयात जमा करावे, असे आवाहन अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

0000000

अनुसूचित जमातीच्या युवकांना विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

बुलडाणा, दि‍. 20 : अचलपूर येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी साडेतीन महिन्यांचे विनामूल्य स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता शासनाच्या विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता विनामुल्य प्रशिक्षणाद्वारे तयारी करण्यात येते. प्रशिक्षण कालावधी दि. 1 ऑगस्ट ते दि. 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत साडेतीन महिन्यांचा राहणार आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 1 हजार रूपयांप्रमाणे विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा आभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामुल्य देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा, किमान वय 18 ते 30चे दरम्यान असावे. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा, उमेदवारांकडे रोजगार विभागाचे कार्ड असावे, शाळा सोडल्याचा दाखला. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, दहवी उत्तीर्णची गुणपत्रिका व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केलेली असावी.

या प्रशिक्षण कालावधीत अटींची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी दि. 26 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे. अर्जामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, प्रवर्ग (जात), जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड सादर करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडीसाठी दि. 27 जुलै 2023 रोजी मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरीता मुळ कागदपत्रासह उपस्थित रहावे लागणार आहे.

प्रशिक्षणार्थ्यांची निवड यादी दि. 28 जुलै 2023 रोजी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास. रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र अचलपूर यांनी केले आहे.

000000

अध्यापक महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची तासिका तत्वावर नियुक्ती

बुलडाणा, दि‍. 20: बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती तासिका तत्वावर करण्यात येणार आहे. इच्छुकांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहाय्यक प्राध्यापक नियुक्ती साठी अध्यापन शास्त्रात गणित व विज्ञानसाठी पदसंख्या 1 असून शैक्षणिक अर्हता एमएससी, एमएड्, नेट, सेट, शिक्षणशास्त्रात पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी मुलाखत दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत होणार आहे. परिपेक्ष शिक्षणामध्ये परिपेक्ष शिक्षणासाठी पदसंख्या 1 असून, शैक्षणिक अर्हता एमए सामाजिक विज्ञान, नेट, सेट, शिक्षणशास्त्रात पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी मुलाखत  दि. 1 ऑगस्ट 2023 दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

ग्रंथपाल पदासाठीचे ग्रंथालय शास्त्रासाठी पदसंख्या 1 असून बीलीब यासह एमलीब असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी मुलाखत दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. आरोग्य आणि शारीरिक शिक्षणासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयासाठी पद संख्या 1 असून एमपीएड, नेट, सेट, शारीरिक शिक्षण शास्त्रात पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी मुलाखत दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. उपयोजित कलासाठी उपयोजित कला पदासाठी पद संख्या 1 असून शैक्षणिक अर्हता उपयोजित कलामधील पदव्युत्तर पदवी किंवा एमएफए नेट, सेट, उपयोजित कलेमध्ये पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी मुलाखत दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. ललित कला शिक्षकासाठी द्रुक कला साठी पद संख्या 1 असून शैक्षणिक अर्हता एमएफए नेट, सेट, द्रुक कलेमध्ये पीएचडी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी मुलाखत दि. 3 ऑगस्ट 2023 दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी संपुर्ण माहितीसह अर्ज आणि आवश्यक त्या मुळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छाया प्रतीसह वेळापत्रकानुसार स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. घड्याळी तासिका तत्वावरील नियुक्ती ही शैक्षणिक सत्र 2023-24 साठी राहणार आहे. शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतरच मानधन देय होईल. घड्याळी तासिका मानधन शासन निर्णयातील तरतुदीनुसार देय राहील. अर्जाचा नमुना gcebedbuldan.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सिमा लिंगायत यांनी केले आहे.

0000000


No comments:

Post a Comment