जिल्हा बँकेने एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न करावे
-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड
*जिल्हा बँकेच्या मोबाईल एटीएम सेवेस सुरवात
बुलडाणा, दि. 14 : जिल्हा बँक ही सर्वसामान्य नागरिकांची बँक आहे. बँक करीत असलेल्या विविध उपक्रमामुळे भविष्य उज्ज्वल आहे. पुरेशी यंत्रणा हाती असली तरी अडचणी या प्रत्येकाला येतात. मात्र या अडचणीवर मात करून गौरवास्पद कामगिरी करण्याची संधी बँकेकडे आहे. सध्या असलेला एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केली.
दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने नाबार्डच्या अर्थसहाय्याने सुरु केलेल्या मोबाईल व्हॅनमधील एटीएम सेवेची सुरवात आज दि. 14 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांचे हस्ते करण्यात आली.
सदर मोबाईल एटीएम व्हॅन ही जिल्ह्यातील एकमेव मोबाईल एटीएम व्हॅन आहे. ही व्हॅन जिल्ह्यातील ग्रामीण भाग, एटीएम सुविधा उपलब्ध नसलेले शहरी भाग, तसेच आठवडी बाजाराचे ठिकाणी एटीएम सेवा उपलब्ध करून देणार आहे. मोबाईल एटीएम व्हॅन ही जिल्हा सहकारी बँकेची एक परीपूर्ण शाखा म्हणून कार्य करणार आहे. याद्वारे जिल्हा बँकेचे खातेदार आपले सर्वप्रकारचे व्यवहार करू शकतील. तसेच कुठल्याही बँकेचे कार्डद्वारे एटीएममधून व्यवहार करू शकतील. यासोबतच मोबाईल एटीएम व्हॅनचा उपयोग खास करून ग्रामीण भागामध्ये आर्थिक व डिजीटल साक्षरता प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी बँक करीत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच बँकेचा एनपीए कमी करून बँक सुस्थितीत येण्यासाठी उपयुक्त सुचना देऊन बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपनिबंधक तथा प्राधिकृत अधिकारी समिती अध्यक्ष संगमेश्वर बदनाळे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री. गाढे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक नरेश हेडाऊ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, मुख्य व्यवस्थापक मनिष ठाकरे, एकनाथ गाढे, सोमीनाथ इथापे आदी उपस्थित होते.
00000
जिल्हाधिकारी कार्यालयात देशी वाणाचे वृक्षारोपण
बुलडाणा, दि. 14 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कळम, बकुल, व्याळा, कडुनिंब या देशी वाणाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, मुख्याधिकारी गणेश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार आदी उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षारोपण केले.
00000
दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान
बुलडाणा, दि. 14 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा दि. 18 जुलै 2023 पासून घेण्यात येणार आहे. परीक्षा सुयोग्य प्रकारे व्हावी, केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये, यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे.
सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच कलम 144 लागू करण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत केंद्रावर बाह्य उपद्रव होणार नाहीत, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा चालू असताना केंद्र परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.
कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षापूर्व कालावधीत परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाहीत, याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उद्बोधन, जनजागृती व वातावरण निर्मिती विविध माध्यमातून करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याने गैरमार्गाचा अवलंब केल्यास मंडळाकडून होणाऱ्या शास्तीची पूर्वकल्पना सर्व विद्यार्थी आणि पालक, तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मार्फत देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षा निर्धारित कालावधीत सुरू होईल तसेच निर्धारित वेळेत संपेल याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी हे जिल्ह्यातील सर्वसाधारण संवेदनशील, तसेच अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रे निश्चित करून त्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयास देतील. परीक्षा केंद्रांना भेटी देताना दक्षता पथकातील अधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख, उपकेंद्र प्रमुख यांचे सोबत परीक्षा दालनास भेटी देतील. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलीस अधिनियमाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच बाह्य उपद्रव कमी होत नसल्यास अशा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार आहे. तसेच सर्व परिरक्षण केंद्रावर हत्यारी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील व अति संवेदनशील परीक्षा केंद्रावर सर्वसाधारण परीक्षा केंद्रापेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.
परिरक्षण केंद्रातून प्रश्नपत्रिकांची पाकिटे मुख्य परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची जबाबदारी सहाय्यक परिरक्षकाकडे असते. प्रश्नपत्रिका वाहतूक करताना सहाय्यक परिरक्षकासोबत सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारी अथवा होमगार्ड शिपाई देण्यात येणार आहे. परीक्षेचे संचालन सुरळीत होण्यासाठी, तसेच विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी परिवहन विभाग विभागास सूचना देण्यात येणार आहे. तसेच परीक्षा कालावधीत अखंडित विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यास येणार आहे.
परीक्षा सुरू असताना भरारी पथकाचे परीक्षा केंद्र भेटीचे नियोजन करीत असताना प्रत्येक भरारी पथक दर दिवशी वेगवेगळ्या तालुक्याला भेटी देतील. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध असल्यास ती यंत्रणा कार्यरत असून चित्रीकरणासाठी साठवणूक होत असल्याबाबत खातर जमा करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या विषयांच्या विशेषतः दहावीसाठी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि बारावीसाठी इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, चिटणीसाची कार्यपद्धती, पुस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन, अर्थशास्त्र आदी परीक्षेच्या दिवशी सर्व केंद्रांवर भरारी पथके जातील, याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ इतर विभागातून उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.
संवेदनशील व अति संवेदनशील परीक्षा केंद्रावर आवश्यकता भासल्यास बैठे पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. बैठक परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर, तसेच परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका परिरक्षण केंद्रावर पाठविण्यापर्यंत हे पथक थांबणार आहे. सहाय्यक परिरक्षकाकडून केंद्र संचालकाकडे प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे हस्तांतरित करताना व सीलबंद प्रश्नपत्रिका पाकिटे परीक्षार्थ्यांचे समक्ष परीक्षा दालनात उघडताना व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. परीक्षेशी संबंधित घटकांनी नियमबाह्य पद्धतीने मोबाईल अथवा तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर परीक्षा केंद्रावर होणार नाही याची दक्षता घेण्यात देण्यात येणार आहे. ज्या परीक्षा केंद्रावर दिव्यांग विद्यार्थी आहेत, त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या विषयाची परीक्षा आहे, त्या दिवशी त्या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना दालन पर्यवेक्षकाचे काम देण्यात येणार नाही.
जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी परीक्षा केंद्रांना, तसेच परिरक्षण केंद्रांना पूर्व सूचना न देता आकस्मिकपणे भेट देतील. परीक्षा संचालनात कोणत्याही स्तरावर गैरप्रकार आढळून आल्यास राज्य मंडळांनी विहित केलेल्या नमुन्यात नमूद करून संबंधित केंद्र संचालकामार्फत विभागीय मंडळास पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याजवळ कॉपीचे साहित्य सापडल्यास त्याची उत्तर पत्रिका, कॉफीचे साहित्य हस्तगत करण्यात येणार आहे. कॉपी प्रकरणाबरोबर पाठवावयाच्या परिशिष्ट ‘ब’ मध्ये कॉपी पकडणारे अधिकारी, सदस्य यांनी त्यांचे नाव, स्वाक्षरी व हुद्दा आदी बाबी सुस्पष्ट अभिप्रायासह नमूद करणार आहे. गैरमार्ग प्रकरण पकडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठभागावर कॉपींग केस असे लिहिण्यात येणार आहे. त्यावर परीक्षार्थीचे निवेदन घेणे व स्वाक्षरी करण्यात येणार आहे. गैरमार्ग प्रकरण पकडल्यानंतर कॉपी साहित्य, उत्तरपत्रिका व प्रपत्र आदी माहिती अचूकपणे केंद्रभेट पुस्तिकेत नमूद करावे लागणार आहे, या प्रकारची कार्यवाही करण्यात येणार आहे.
00000
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेने शालेय क्रीडा स्पर्धेस सुरुवात
*जिल्हास्तरीय स्पर्धेत शारदा ज्ञानपीठ विजयी
बुलडाणा, दि. 14 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद तसेच नवी दिल्ली येथील सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर मुले, ज्युनिअर मुले,मुली क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव एन. आर. वानखेडे, सहसचिव मुकेश बाफणा, रविंद्र गणेशे उपस्थित होते.
स्पर्धेतील पहिला सामना रमेशचंद्र बेगाणी इंटरनॅशनल स्कुल, देऊळगाव मही विरुद्ध सेंट जोसेफ हायस्कुल, बुलडाणा यांच्यात होऊन सेंट जोसेफ हायस्कुलने 3-0 विजयी झाले, शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा विरुद्ध प्रबोधन विद्यालय, बुलडाणा यांच्यात सामना होऊन शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा 1-0 ने विजयी झाला. पहिली सेमीफायनल सहकार विद्या मंदिर, बुलडाणा विरुद्ध सेंट जोसेफ हायस्कुल, बुलडाणा यामध्ये होऊन सेंट जोसेफ हायस्कूल ट्रायब्रेकरमध्ये विजयी झाला. दुसरा सेमिफायनल यशोधाम पब्लिक स्कुल, मलकापूर विरुद्ध शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा यांच्यामध्ये होऊन शारदा ज्ञानपीठ, बुलडाणाने एकतर्फी 5-0 गोलने विजय संपादन केला. अंतिम सामन्यात शारदा ज्ञानपीठ, बुलडाणाने सेंट जोसेफ इंग्लिश स्कुल, बुलढाणाचा 2-0 गोलने पराभव केला.
स्पर्धेला पंच म्हणून मोहसिन अहेमद , फव्वाद अहेमद, शे. माजिद, अकीब खान यांनी कार्य केले. तांत्रिक सल्लागार म्हणून मुकेश बाफणा, संजय भंडारी, रज्जन श्रीवास, शेख अहेमद शेख सुलेमान, दिलीप हिवाळे यांनी सहकार्य केले. सुरवातीला गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. मनोज श्रीवास यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी पोलिस प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सहकार्य लाभले.
00000
टोमॅटो लागवड, उत्पन्न, दराबाबतची वस्तुस्थिती लवकर स्पष्ट होणार
बुलडाणा, दि. 14 : राज्यात टोमॅटोचे दर अचानक वाढल्याने कृषी आयुक्त पुणे यांनी नुकतीच राज्यातील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत टोमॅटो लागवड, उत्पन्न व दराबाबत अधिक वस्तुस्थिती स्पष्ट होण्याकरिता संबंधीतांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल प्राप्त होताच टोमॅटो लागवड, उत्पन्न व भावाबाबतची वस्तुस्थिती लवकर स्पष्ट होणार असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त यांनी कळविले आहे.
राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण 56-57 हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे 40 ते 42 हजार हेक्टर तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण 16 ते 17 हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून सर्वसाधारणपणे 10 लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते. जुलै-2023 मध्ये बाजारात टोमॅटो चे वाढलेले दर लक्षात घेता यावर सविस्तर माहिती आणि उपयोजना साठी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 1 जुलै आणि दिनांक 11 जुलै रोजी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, जिल्ह्यांचे अधीक्षक कृषी यांच्या समवेत या प्रश्नांचे अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत टोमॅटो पिकाखालील खरीप 2023 हंगामातील क्षेत्र आणि उत्पादन याबाबत माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात गेल्या डिसेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान टोमॅटोला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने (डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान 6 ते 9 रुपये प्रति किलो, मार्च 2023 दरम्यान 11 रुपये प्रति किलो व एप्रिल 2023 ते मे 2023 दरम्यान 8 ते 9 रुपये प्रति किलो) शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
या व्यतिरिक्त मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी पाऊस, गारपीट यामुळे देखील टोमॅटो आणि इतर भाजीपाला याचे नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर विपरित परिणाम झाला असल्याचे दिसून येते. चालू वर्षी पाऊस देखील जून महिन्यात जवळपास 15 दिवस उशिरा आला आणि तो सरासरीच्या जेमतेम 54 टक्के एवढा झाला. यामुळे नवीन लागवडीस उशीर झाला असल्याचे आढळून येते. टोमॅटो पिकावरील कीड व रोग याबाबत देखील या बैठकीत चर्चा करून नवीन जाती, कीड आणि रोग प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर चर्चा करण्यात आली.
सध्या शेतकरी नवीन टोमॅटोची लागवड करत आहेत. याबाबत येत्या 7-8 दिवसात वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल. टोमॅटो लागवडीबाबत नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रमुख क्षेत्र असून त्या जिल्ह्याच्या अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कडून प्रामुख्याने नवीन लागवडी बाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. तो प्राप्त होताच टोमॅटो लागवड, उत्पन्न व भाव याबाबत अधिक वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे कृषी आयुक्त, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
00000
No comments:
Post a Comment