शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पिक स्पर्धा
* सहभागी होण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 25 : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या हंगामात खरीप हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकरी विविध प्रयोग करतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढते. ते अधिक उमेदीने नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पुढे येतात. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक होवून जिल्ह्याच्या उत्पादनात भर पडेल, यासाठी कृषि विभागातर्फे पिक स्पर्धा घेण्यात येत आहे.
पिक स्पर्धेतील जिल्ह्याकरिता खरीप हंगामातील स्पर्धेसाठी मुग, उडीद, सोयाबीन, तूर आणि मका पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे आणि ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. तसेच एकावेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. लाभार्थीचे शेतामध्ये त्या पिकाखालील किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज स्पर्धेकरिता पात्र राहतील. पिक स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्षे त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये, तर आदिवासी गटासाठी 150 रूपये राहणार आहे. मुग आणि उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम दि. 31 जुलै 2023 आहे. तर सोयाबीन, तूर आणि मका पिकासाठी दि. 31 ऑगस्ट 2023पर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
पिकस्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासह प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अ चा उतारा आणि अनुसूचित जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.
तालुका पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले पाच हजार रूपये, दुसरे तीन हजार रूपये, तिसरे दोन हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले 10 हजार रूपये, दुसरे सात हजार रुपये, तिसरे पाच हजार रूपये बक्षीस असणार आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये बक्षीस असणार आहे.
पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि उपसंचालक एस. आर. कणखर यांनी केले आहे.
00000
आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलडाणा, दि. 25 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, बुलडाणा येथे शैक्षणिक सत्र 2023-24 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरताना विद्यार्थी आणि पालकांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कनिष्ठ महाविद्यालय, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दि. 31 जुलै 2023 आणि मेडिकल व इंजिनिअरींग विद्यार्थ्यांसाठी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. खास बाब प्रवेशाबाबत लोकप्रतिनिधी शिफारशी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आयुक्तालय, नाशिक येथे प्रकल्प कार्यालय, अकोला मार्फत सादर करावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कागदपत्रांची सुस्पष्ट व मूळ प्रत संकेतस्थळावर अपलोड करावी. अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंदवावा. मोबाईल क्रमांकाची नोंद करताना मोबाईल आधार क्रमांकाशी जोडलेला असावा. तसेच आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असावा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. अर्जामध्ये नाव नोंदणी करताना आधारकार्ड वरील नावाप्रमाणेच तंतोतंत भरावे. पालकांचे स्वयं घोषणापत्र व विद्यार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहिल. घोषणापत्राचा नमुना संकेतस्थळावरील सुचना फलकावरील लिंकमध्ये देण्यात आला आहे. अर्जामध्ये माहिती भरताना चुकीची माहिती भरल्या जाणार नाही, याची खबरदारी विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावी.
उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, बोनाफाईड किंवा प्रवेश घेतल्याची मुळ पावती, विद्यार्थी आणि पालकांचे स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
000000
गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच योजना
बुलडाणा, दि. 25 : अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानामधील अन्न धान्य पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातील गळीतधान्य आणि तेलताड योजनेमध्ये फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच योजना राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज घेण्यास सुरवात झाली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामध्ये सन 2023-24 मध्ये अन्नधान्य पिके आणि गळीत धान्य अंतर्गत फ्लेक्झी घटकांतर्गत गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संच यासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांच्याकडून तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत. गोदाम बांधकाम आणि बीज प्रक्रिया संचचा लाभ हा नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ असणाऱ्यांना आहे. त्यासाठी दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. मुदतीत अर्ज करणाऱ्या नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ यांचाच विचार केला जाईल. जिल्ह्यास गोदाम बांधकाम, बीज प्रक्रिया संचासाठी लक्षांक प्राप्त आहे. या लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याची स्थानिकरित्या सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
गोदाम बांधकाम
जिल्ह्यामध्ये या योजनेंतर्गत २५० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय देण्यात येणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहिल. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.
बीज प्रक्रिया संच
सदर योजनेंतर्गत उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रक्रिया संच उभारणी करण्यासाठी यंत्रसामुग्री व बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ, कंपनीने बँकेकडे प्रकल्प सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबधित अर्जदार कंपनी लाभास पात्र राहिल. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातून निवड पत्र मिळाल्यावर व बीज प्रक्रिया संच उभारणी पूर्ण झाल्यावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.
00000
कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांनी वृक्षारोपण करावे
*जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यातील माजी सैनिकांमधील उत्साह व त्यांची प्रशासनासोबत सलोख्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे माजी सैनिकांच्या सहभागाने कारगील विजय दिवसानिमित्त दि. 26 जुलै 2023 रोजी वृक्षारोपण करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त स्वक्वाड्रन लिडर रुपाली सरोदे यांनी केले आहे.
माजी सैनिकांनी 50पेक्षा कमी माजी सैनिक असलेल्या गावातील वृक्षारोपणाचे फोटो आणि सरपंचाच्या स्वाक्षरीनीशी अहवाल जिल्हा सैानिक कल्याण कार्यालय बुलडाणा येथे पाठवावा. जिल्ह्यामधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन गावातील माजी सैनिक समुहास प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 5 हजार रुपये प्रदान करण्यात येतील. 50पेक्षा जास्त माजी सैनिक असतील अशा गावातील समुहाला प्रथम क्रमांकास 20 हजार रूपये आणि द्वितीय क्रमांकास 15 हजार रूपये प्रदान करण्यात येतील. वृक्षारोपणाचे फोटो आणि अहवाल दि. 27 जुलै 2023 पुर्वी दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालयात देण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करावेत
*क्रीडा विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 25 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे अनुसूचित जाती उपयोजना क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत विविध अनुदानित शाळा, क्रीडा संस्था यांना विविध पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यात येते. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.
या योजनेतून क्रीडांगण समपातळीत करणे, क्रीडांगणावर 200 मीटर, 400 मीटर धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणाभोवती भिंती, तारेचे कंपाऊंड बांधणे, क्रीडांगणावर विविध खेळांची प्रमाणित आकारांची मैदान तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृह बांधणे, क्रीडांगणावर पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणावर भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा तयार करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर माती, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे, मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे यासाठी सात लाख रुपयांपर्यंत अंदाजपत्रक आणि दरपत्रकाच्या अनुषंगाने मंजूर करण्यात येते.
अनुदान घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजित केलेली जागा शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीत असणे आवश्यक आहे, तसे प्रस्तावासोबत गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरी, शिक्यानिशी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच संस्थेच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे. अनुदानाकरिता पात्र संस्थांचा प्राथम्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह तसेच क्रीडा विभागाची संकुले, पोलीस विभागांतर्गत कल्याण निधी समिती, शासकीय स्पोर्ट क्लब, शासकीय महाविद्यालये, शिक्षण विभागाच्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालये राहणार आहे.
अनुसूचित जाती उपयोजनेच्या अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या संस्थांनी दि. 10 ऑगस्ट 2023पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून विहित नमुना प्राप्त करुन, आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 12 ऑगस्ट 2023पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment