Monday, 24 July 2023

DIO BULDANA NEWS 24.07.2023

 



अतिवृष्टीमुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*पंचनाम्यांसाठी अतिरिक्त मनुष्‍यबळ घेणार

बुलडाणा, दि. 24 : मागील काही दिवसांत जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. पंचनाम्याच्या कामी ज्या भागात अतिवृष्टी झालेली नाही, अशा ठिकाणचे मनुष्यबळ उपलब्ध करून कमी कालावधीत सर्व क्षेत्राचे पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आणि गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. उन्हाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा, मलकापूर या भागात घरे आणि शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र उर्वरित जिल्ह्यात पावसाचा फारसा प्रभाव नसल्याने याठिकाणचे मनुष्यबळ अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनाम्याच्या कामी घेण्यात यावे. कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेमुळे कमी कालावधीत जास्त क्षेत्राचे पंचनामे करणे शक्य होईल. पंचनाम्याच्या कामी अडचणी येत असल्यास नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करीत असताना येत्या खरीप हंगामात तृणधान्याच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीने तृणधान्याखालील क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे येत्या रब्बीमध्ये जिल्ह्यात जादा तृणधान्य क्षेत्र लागवडीखाली येण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात तृणधान्याचा प्रसारासाठी खरीप ज्वारी, खरीप बाजरी, राळा, कोदो, राजगिरा या पिकांचे एक लाख 75 हजार मिनीकीट व क्रॉप कॅफेटेरियाचे विनामूल्य वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी दि. 1 ते 14 ऑगस्ट दरम्यान अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडीमधून तृणधान्याचा पोषण आहार देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.

जिल्ह्यात एक लाख 80 हजार हेक्टरवर कपासाचे क्षेत्र आहे. कापसाच्या उत्पादनावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक हा गुलाबी बोंडअळी आहे. या बोंडअळीचे व्यवस्थापन आतापासूनच करण्यात यावे. फरदड पिक घेणे, जिनिंगमध्ये अळीचा प्रसारामुळे शेत पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यामुळे सध्याचे पिक फुलोऱ्यावर असताना अळीचा प्रादूर्भाव दिसत असल्यास फुले तोडावी. त्यामुळे अळीचे जीवनचक्र तोडण्यास मदत होईल. तसेच अळीवर प्रभावी ठरणाऱ्या निंबोळी अर्काचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

000000

राज्य शासनाची उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा

*स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

*राज्यात प्रथम मंडळास पाच लाख रुपयांचे पारितोषिक

बुलडाणा, दि. 24 : राज्यात १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

राज्यात गेल्या वर्षी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले, त्याचप्रमाणे यावर्षीही सन २०२३मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा निधी आणि या पुरस्कारसाठीचे निकष याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय समितीने राज्य समितीकडे निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी राज्यस्तरावरील तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.

या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्तीसाठी दहा गुण, पर्यावरणपूरक सजावट थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत १५ गुण, ध्वनिप्रदूषण रहित वातावरणासाठी पाच गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखाव्यासाठी २० गुण, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखाव्यासाठी २५ गुण असतील. गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्यासाठी २० गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेल्या कार्याबद्दल १५ गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेल्या कार्यासाठी १५ गुण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांसाठी १० गुण, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धेसाठी १० गुण असतील. गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छतेसाठी प्रत्येकी पाच असे २५ गुण मिळून ही १५० गुणांची ही स्पर्धा असणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर दि. १० जुलै ते दि. ५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष राहणार आहे. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव राहणार आहे. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील, तसेच मंडळाकडून व्हिडीओग्राफी व कागदपत्रे जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यातून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्रे, व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करतील.

जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून तीन विजेते क्रमांक निवडीसाठी राज्यस्तरावर समिती राहणार आहे. या समितीत सर जे. जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता, वरिष्ठ प्राध्यापक अध्यक्ष असतील, तर पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ गट ‘अमधील अधिकारी सदस्य, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असतील. राज्यस्तरीय समिती ही जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्राच्या आधारे पहिल्या ३ विजेत्यांची निवड करतील.

00000

डिजिटल क्रीडा शिक्षकांसाठी सोमवारपासून प्रशिक्षण शिबीर

बुलडाणा, दि. 24 : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार आणि जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण आवश्यक आहे. यासाठी राज्याच्या क्रीडा धोरणानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलात सोमवार, दि. ३१ जुलै ते दि. ५ ऑगस्ट २०२३ पर्यंत दररोज सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात हे शिबीर घेण्यात येणार आहे.

खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पद्धती, खेळामधील कौशल्याची ओळख, नवीन खेळांची ओळख, खेळांची शास्त्रोक्त माहिती शिक्षकांना करुन देणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी आणि क्रीडा क्षेत्रामध्ये होणारे बदल अवगत होण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. यासाठी क्रीडा प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरासाठी जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा यातील क्रीडा शिक्षक सहभागी होतील. शिबीरामध्ये क्रीडा शिक्षकांना क्रीडा गणवेश, क्रीडा साहित्य, क्रीडा हस्तपुस्तिका, भोजन आणि निवास, प्रवास खर्च, आदीचा समावेश राहणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे विविध वयोगटातील खेळाडू घडविणे आणि खेळाडूंच्या कामगिरीस प्राविण्य निर्माण करण्याच्या दृष्टीने क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी, तसेच क्रीडा शिक्षकांची उजळणी करुन दरवर्षी होणारे नियमातील बदलाची माहिती देण्यात येणार आहे. या शिबीराला तज्‍ज्ञ मार्गदर्शकांकडून जिल्हास्तरीय शिबीरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील प्राधान्यक्रमातील 19 खेळांचे तज्‍ज्ञ क्रीडा प्रशिक्षक किंवा संघटनेचे तांत्रिक पदाधिकारी, तसेच आहारतज्‍ज्ञ, शरीरविज्ञान तज्‍ज्ञ, क्रीडा मानसोपचारतज्‍ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्धाटन दि. ३१ जुलै २०२३ दुपारी २ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जांभरुन रोड, बुलडाणा येथे होणार आहे. जिल्ह्यातील निवड झालेल्या क्रीडा शिक्षकांनी दहा दिवसांच्या प्रशिक्षण शिबीराला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात खतांची मुबलक उपलब्धता

बुलडाणा, दि. 24 : जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम २०२३च्या पेरण्या आटोपल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यात  रासायनिक खताची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

खरीप हंगामामध्ये १ लाख २९ हजार ८०९ मेट्रिक टन खताची आवश्यकता असताना जिल्ह्यात १ लाख ७५ हजार ७९८ मेट्रिक टन साठा आजपर्यंत उपलब्ध झाला आहे. यापैकी ८१हजार २९२ मेट्रिक टन साठा विक्री झाला असून उर्वरीत ९४ हजार ५०६ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. बियाणे, खते आणि किटकनाशक या निविष्ठा वेळेवर आणि माफक दरात मिळावी, यासाठी कृषि विभाग कायम तत्पर आहे. तसेच कृषि निविष्ठांसाठी जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

कृषि विभागातील संपर्क अधिकाऱ्यांची कृषि सेवा केंद्रनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत गुणनियंत्रण निरीक्षक यांनी रासायनिक खताचे १३ विक्रीबंद आदेश देण्यात आले आहे. १४ रासायनिक खताचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. कृषि विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी खताबाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000



अवैध दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्कची मोहिम

बुलडाणा, दि. 24 : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अवैध दारू विक्री, निर्मिती विरोधात मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात सातत्याने कारवाई करण्यात येत असून 33 गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

राज्य उत्पादनच्या बुलडाणा कार्यालयामार्फत विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 16 ते 23 जुलैपर्यंत 33 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये 32 वारस गुन्हे नोंद करून 37 आरोपीवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात 4 लाख 92 हजार 65 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच कारवाईत तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. अवैध दारू विक्री होत असलेल्या हॉटेल, ढाब्यावर  राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी छापे घालून गुन्हे दाखल केले जात आहेत.

000000

ऑनलाईनमध्ये अडचणी येत असल्यास

पीक विम्यासाठी ऑफलाईन तक्रार नोंदवावी

*कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 

बुलडाणा, दि. 24 : शेतपिकाच्या नुकसानीबाबत क्रॉप इन्शुरन्स ॲप, टोल फ्री क्रमांकाद्वारे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑफलाइन पद्धतीने तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

सर्वसमावेशक प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2023-24मध्ये सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्र बाधित झाल्यास नुकसानीबाबत विमा कंपनीला 72 तासांच्या आत तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. त्याकरिता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करता येते.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती

पीक विमा योजनेत सहभाग नोंदविल्यापासून पीक काढणीपर्यंत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा वीज कोसळल्‍यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमेच्या बाबींमध्ये शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करावी.

काढणी पश्चात नुकसान

अधिसूचित क्षेत्रातील शेतात पीक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांसाठी कापणीपासून दोन आठवड्यापर्यंत किंवा 14 दिवस गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पाऊसामुळे विमा संरक्षित क्षेत्र बाधित झाल्याने काढणी पश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबींमध्ये तक्रार दाखल करता येते.

पीक नुकसानीबाबत तक्रार दाखल करण्याची पद्धत

योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे विमा सरंक्षित क्षेत्र बाधित झाल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीबाबत सूचना भारतीय कृषी पीक विमा कंपनीस देणे बंधनकारक आहे. त्यानंतर सर्वप्रथम क्रॉप इन्शुरंस ॲपचा उपयोग करुन ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करावी. ॲपद्वारे तक्रार दाखल केल्यास वेळोवेळी नुकसान भरपाई मंजुरीबाबतची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना स्वत: पाहणे शक्य होते. ॲपवर तक्रार दाखल होत नसल्यास पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18004195004 वर संपर्क साधून पीक नुकसानीबाबत सूचना द्यावी. टोल फ्री क्रमांकावरही संपर्क झाला नसल्यास विमा कंपनीने तालुकास्तरावर नियुक्त केलेल्या प्रतिनिधीकडे ऑफलाईन तक्रार दाखल करुन पोच घ्यावी.

सूचना फॉर्म भरताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

पीक नुकसानीबाबत सूचना फॉर्म भरताना नोंदणी अर्ज क्रमांक, नाव, वडिलाचे नाव, मोबाईल क्रमांक, कर्जदार, बिगर कर्जदार, गाव, पिकाचे नाव, विमा संरक्षित क्षेत्र, सर्व्हे क्रमांक पिकविमा भरलेल्या पावती नुसार व्यवस्थित भरल्याची खात्री करावी. नुकसानीचा प्रकार समाविष्ट करावा, तसेच नुकसानीची तारीख, नुकसानीची टक्केवारी अचूक भरल्याची खात्री करावी. एकापेक्षा जास्त गट क्रमांक किंवा एकापेक्षा जास्त पिकाचे पिकविमा भरले असल्यास स्वतंत्र पूर्व सूचना फॉर्म भरुन द्यावे लागणार आहे. शक्य  असल्यास बाधित झालेल्या क्षेत्राचा सुस्पष्ट जिओ टॅग फोटो काढून जपून ठेवावा. असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000




पुरबाधित कुटुंबांना एक महिन्याचे रेशन द्यावे

-मंत्री अनिल पाटील

बुलडाणा, दि. 24 : संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात गेल्या दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबाचे प्राधान्याने पुनर्वसन करीत या कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे राशन तातडीने पुरविण्यात यावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

शेगाव येथील विश्रामगृहात रविवार, दि. 23 जुलै रोजी श्री. पाटील यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा घेतला. यावेळी आमदार राजेश एकडे, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पुराचे पाणी घरात शिरले आहे, अशा कुटुंबांना मदतीसाठी एक महिना पुरेल एवढे राशन देण्यात यावे. तसेच पुरामुळे मृत्यू झाला असल्यास तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे. पुरामुळे गावातील विहिरीत गाळपाणी गेले आहे आणि त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा ठिकाणी अधिकाऱ्यांनी चांगले पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी तात्काळ अधिग्रहित करून पाणीपुरवठा करावा. दूषित पाणीपुरवठा झाल्यास आरोग्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी.

पुरामुळे संपर्क तुटलेल्या गावातील कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे धान्य आणि सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच पुरामुळे बाधित आणि बिघर झालेल्या कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी. त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात यावे. अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेल्यामुळे पीक, फळबागा आणि बुजलेल्या विहिरीचे तातडीने पंचनामे करावेत.

पुरामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या ठिकाणाची तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा. तसेच महसूल मंडळामध्ये 65 मिलिमीटरहून अधिक पाऊस झालेला असल्यास तेथील सरसकट पंचनामे करण्यात यावे. जिगाव प्रकल्पाच्या पाण्यामुळे नुकसानीची माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

000000

No comments:

Post a Comment