Tuesday, 11 July 2023

DIO BULDANA NEWS 11.07.2023

 



उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास स्थानिकांना रोजगार मिळतील

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 11 : जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यात येत आहे. उद्योग वाढीसाठी उद्योजकांना प्रोत्साहन दिल्यास यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. तसेच उद्योगांना आवश्यक असणारे सहकार्य दिल्यास जिल्ह्यातून उद्योजक बाहेर जाणार नाहीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

जिल्ह्यातील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी सुरवातीला जिल्ह्यातील उद्योगांना बँकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याबाबत माहिती घेतली. उद्योगांना मंजूर झालेला पतपुरवठा तातडीने करण्यात यावा. याबाबतची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावी. कर्ज प्रकरणे मंजूर होऊनही पतपुरवठा प्रलंबित असलेली बाब गंभीर असल्याने याबाबतचा अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा निर्यात धोरणानुसार जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग निर्माण व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. उद्योगांना पूरक वातावरण तयार करून निर्यात वाढविण्यासाठी उद्योगांनी प्रयत्न करावेत. निर्यात करणाऱ्या उद्योगांनी जिल्ह्यातून होणाऱ्या निर्यातीची माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील उद्योगांनी उत्पादित केलेल्या मालाची प्रचार, प्रसार तसेच पॅकेजिंग, ब्रँडींगसाठी विवेकानंद महाविद्यालयाशी करार करण्यात आला. या करारामुळे कृषिवर आधारित असणाऱ्या उद्योगांना सहकार्य होणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी बाजारपेठेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यातून रोजगार निर्मिती होण्यासोबतच स्थानिक उद्योगांना विकासासाठी प्रोत्साहन मिळेल. जिल्ह्यात उत्पादीत होणारे उत्पादन विक्रीसाठी खरेदी-विक्री करणाऱ्यांची संमेलन आयोजित करण्यासंदर्भात सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

यावेळी चिखली, खामगाव, बुलढाणा येथील औद्योगिक वसाहतींना जाणवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांवर संबंधित यंत्रणांनी उद्योगांना येत असेल अडचणी समजून घेऊन, त्यानुसार तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

00000

तलाठी भरतीसाठी मदत कक्ष स्थापन

बुलडाणा, दि. 11 : जिल्ह्यातील तलाठी संवर्गाच्या पदभरतीचे अनुषंगाने मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. उमेदवारांच्या अडीअडचणी व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर मदतकक्ष स्थापन करण्यात आले आहे. उमेदवारांना अडचण आल्यास मदत कक्षाचा क्रमांक 07262-242411 यावर संपर्क साधावा, असे आवाहान निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने महसूल व वन विभाग यांच्याकडील पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख यांची राज्यस्तरीय नोडल अधिकारी उप आयुक्त (महसूल) यांची विभागीय समन्वय अधिकारी, तसेच जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी यांची जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तलाठी संवर्गाची पदभरतीचे अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीडचणी, तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्हास्तरावरील मदत कक्षाचा दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी. नियुक्त अधिकारी, कर्मचारी आदी बाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील मदत कक्ष दूरध्वनी क्रमांक 07262-242411 असा आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिक्षक प्रिया सुळे, अव्वल कारकुन जी. एम. धनवटे, डी. ए. शेळके, महसूल सहाय्यक सारीका लांडे, तलाठी एच. टी. तायडे यांची नियुक्ती करण्यात आली असून ईमेल rdc_buldhana@radiffmail.com असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

0000

राज्य क्रीडा परिषदेवर दोन अशासकीय सदस्यांची निवड

बुलडाणा, दि. 11 : राज्य क्रीडा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. क्रीडा परिषदेची पुनर्रचना करण्यासाठी जिल्ह्यातून पात्रताधारक असलेल्यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशासकीय सदस्य हा आंतरराष्ट्रीय खेळाडू ऑलिम्पिक, एशियन जागतिक स्पर्धा असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील केंद्र, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, नामांकीत प्रशिक्षक हे केंद्र व राज्य शासनातर्फे दिले जाणारे सर्व क्रीड पुरस्कारधारक असावा. पात्रता धारण करणारे इच्छुक नसल्यास जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थींचा विचार करण्यात येणार आहे. अशासकीय सदस्यांचा राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अनुभव, मार्गदर्शक सुचना मिळतील, यासाठी जिल्ह्यातील दोन खेळाडूंची शिफारस आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे करावयाची आहेत. यासाठी इच्छुकांनी दि. 12 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले संपुर्ण नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल क्रमांक व क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती, तसेच क्रीडा क्षेत्रातील केंद्र, राज्य पुरस्कार मिळाल्याबाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव केले आहे.                    

0000000

क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत पिक संरक्षण सल्ला

बीजप्रक्रिया : एक फायदेशीर कीड रोग नियंत्रण पद्धत

बुलडाणा, दि. 11 : जिल्ह्यात क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत पिक संरक्षण सल्ला देण्यात येत आहे. यात बीजप्रक्रिया ही एक फायदेशीर कीड रोग नियंत्रण पद्धत आहे. कृषि विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सल्ल्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बियाण्यांना किटकनाशक, बुरशीनाशक, जैविक खते, पोषक, हार्मोन्स किंवा वाढ नियंत्रकाचे लेप बियांना लावण्याच्या क्रियेला बीजप्रक्रिया म्हटले जाते. बीजप्रक्रिया करण्याचे फायदे बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जिवाणूपासून संरक्षण मिळते. जमिनीत असणाऱ्या किडी आणि पेरणीपासून 30-35 दिवस रसशोषक किडी आणि खोड माशी प्रादूर्भाव कमी प्रमाणात होतो. कीड आणि रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू हे झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात. बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मास्क, चष्मा यासारख्या संरक्षण साधने घालण्याची काळजी घ्यावी.

बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यावर किंवा यंत्राद्वारे सावलीत करावी. बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किंवा पिशवीमध्ये एकत्र मिसळून घ्यावे. रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया एकत्र करू नयेत. जैविक बीजप्रक्रिया ही रसायनिक बीज प्रक्रिया नंतर करावी. यामध्ये अडीच ते तीन तासांचे अंतर असावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे 3-4 तासाच्या आत पेरणीसाठी वापरावेत. बीजप्रक्रिया बुरशीनाशक –किटकनाशक - जीवाणू अशा क्रमाने करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

शंखी गोगलगाय नियंत्रण करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 11 : मागील दोन-तीन वर्षांपासून शंखी गोगलगायला अनुकूल असे ढगाळ, आर्द्रतायुक्त आणि जास्त काळ ओलावा असणारे वातावरण राहिल्याने शंखी गोगलगायीची संख्या वाढून प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला. यावर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी शंखी गोगलगायचे नियंत्रण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शंखी गोगलगायीला यावर्षी पोषक वातावरण तयार झाल्यास एकात्मिक व्यवस्थापन करणे फायद्याचे राहणार आहे. शंखी गोगलगायीचा जीवनक्रम हा साधारणपणे पाच ते सहा वर्षे जिवंत राहते. त्यांचा जीवनक्रम हा अंडी, पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्थांमध्ये पूर्ण होतो. हिवाळ्याच्या हंगामात सुप्तावस्थामध्ये जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. शंखी गोगलगायींचा प्रसार शेतात वापरण्यात येणारी औजारे, यंत्रसामग्री, वाहने ट्रॅक्टर, बैलगाडी, शेणखत, विटा, माती, वाळू, रोपे, बेणे, कुंड्या आदी मार्फत होतो. रात्रीच्या वेळी पाने, फुलांना अनियमित आणि मोठ्या आकाराची छिद्र पाडून पानांच्या कडा खातात. काही प्रमाणात झाडांच्या शेंगा, फळे, कोवळ्या सालीवर देखील उपजीविका करून नुकसान करतात. गोगलगायींचे प्रामुख्याने लक्ष रोप अवस्थेत असते, या अवस्थेत रोपाची शेंडे कुरतडून खातात. यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

गोगलगायीची अंडी हाताने गोळा करून नष्ट करावीत, जेणेकरून जीवनक्रम नष्ट होईल. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. फळझाडाच्या खोडाला १० टक्के बोर्डोपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत. शेताच्या बांधाजवळ दोन्ही बाजूने १ ते २ फुटाचे चर काढावेत. संध्याकाळी व सूर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या, तसेच झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा करून साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात आणि खड्ड्यात पुरून टाकाव्यात किंवा रॅकेल मिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात. गोगलगायी आकर्षित होण्यासाठी गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी ठेवावे. सकाळी सूर्योदयानंतर त्या पोत्याखाली गोळा होतील. त्या जमा करून नष्ट कराव्यात. गोगलगायींना शेतातील मुख्य पिकांवर प्रादुर्भाव करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूची किंवा चुन्याची भुकटी किंवा कॉफीची पूड यांचा ४ इंच लांबीचा पट्टा किंवा राखेचा सुमारे २ मीटर लांबीचा पट्टा बांधाच्या शेजारी पसरून टाकावा. गोगलगायींचे नैसर्गिक शत्रु असलेल्या कोंबडी, बदक, इत्यादी भक्षकांचे संवर्धन करावे. निंबोळी पावडर, निंबोळी पेंड, 5 टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगाय शेतात येण्यापासून परावृत्त होतात. मेटाल्डिहाईडला पर्याय म्हणून आयर्न फेरिक फॉस्फेटचा वापर 2 किलो प्रती एकर या प्रमाणात अमिष म्हणून करता येतो. आयर्न फेरिक फास्फेट पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित असल्याने त्याचा गोगलगायीच्या निर्मुलनासाठी उपयोग करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

                                                                        0000000

हुमणीची ओळख, एकात्मिक व्यवस्थापन करावे

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 11 : बहुपिक भक्षी कीड असलेल्या हुमणीची शेतकऱ्यांनी ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

हुमणी किडीला उन्नी, उकरी, चाफर, भुंगेरे, शेण खतातील अळी नावाने ओळखले जाते. ऊस पिकावर जास्त प्रमाणात या अळीचा प्रादूर्भाव होतो, त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, भुईमुग आदी पिकावर देखील प्रादुर्भाव दिसून येतो. हुमणीमुळे पिकाचे सरासरी ३० ते ८० टक्के आर्थिक नुकसान होऊ शकते. अळीचा जीवनक्रम हा सुरवातीच्या मोठ्या पूर्व मोसमी, वळवाचा पाऊस आणि मोसमी पावसानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर निघण्यास सुरवात होते. संध्याकाळी मिलन होऊन जमिनीत अंडी घालतात. यानंतर जीवन चक्र चालू  होते. अंडी, अळी, कोष आणि प्रौढ या चार अवस्थामध्ये जीवनक्रम पूर्ण होते. किडीचे एक वर्षात एकच जीवनक्रम पूर्ण होते. अळी अवस्था पिकांची मूळ कुरतुडून खाते. त्यामुळे पिक पिवळे होऊन वाळतात. नुकसानग्रस्त पिक हाताने सहज उपटले जातात. हुमणी एका रेषेत पिकांचे नुकसान करते. तसेच प्रौढ भुंगा बाभूळ, कडूनिंब आदी झाडांवर उपजिवीका करतात. अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करताना पावसानंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर निघण्यास सुरुवात होते. हे भुंगेरे वेळीच गोळा करुन नष्ट केल्याने किडीचा पुढील प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. एरंडीच्या वासाकडे हुमणीचे भुंगेरे आकर्षित होत असल्याने एरंडी आमिशाचा वापर करावा. भुंगेरे आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, सापळ्यात आलेले भुंगेरे विषारी द्रावणात टाकून मारावेत. निंदणी, कोळपणीसारखी आंतरमशागतीची कामे केल्याने हुमणीच्या अळ्या पृष्ठभागावर येतात, त्या अळ्यांना पक्षी वेचून खातात. त्या सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरतात. नियंत्रणासाठी पूर्ण कुजलेल्या शेणखत, कंपोस्ट खताचा वापर करावा. खोडवा उसात पाचट न जाळता ते सरीमध्ये कुजविण्यासाठी गाडावे. प्रादूर्भाव झालेल्या पिकात पाणी साठून राहील अशा पद्धतीने पाणी देणे. मेटारायझियम ॲनिसोप्ली, बिव्हेरीया बॅसियाना, ईपीएनकल्चर अशा जैविक कीडनाशकांद्वारे हुमणी किडीचे प्रभावी नियंत्रण करावे. तसेच मुळाजवळ क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ ते ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment