समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
*देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस
*उपायोजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करणार
बुलढाणा, दि १ : समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनानुसार उपाययोजना प्राधान्याने अमलात आणण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
समृद्धी महामार्गावरील देऊळगाव राजानजिक खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात रात्री दोन वाजता झाला. यात 26 जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहे. या अपघातस्थळाला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भेट दिली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, संदिपान भुमरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आकाश फुंडकर, श्वेता महाले, विभागीय आयुक्त निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी मार्गावरील अपघात हा दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना झोपेची डुलकी आदी कारणामुळे घडतात. असे अपघात घडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या उपायोजना करणे गरजेचे आहे, त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने करण्यात येईल.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणा अपघातस्थळी पोचली. बसचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली. खाजगी प्रवासी वाहतुकीमध्ये जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
समृद्धी महामार्गावर येणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे. महामार्गावर प्रवेश देण्याआधी वाहनांची तपासणी केली जाते. तसेच वाहनचालकाला समुपदेशन केले जाते. वाहन किंवा वाहनचालक योग्य पात्रतेचे नसल्यास त्यांना परत पाठवले जाते. यामुळे प्रवाशांची आणि वाहनचालकांची नाराजी होते. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियमांचे काटेकोर पालन करून वाहतूक नियंत्रण केले जात आहे.
अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांनी देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ जखमींची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. अपघातातील जखमींना योग्य तो उपचार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
0000
जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन
बुलढाणा, दि. १ : जिल्हाधिकारी कार्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले.
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गीते, नाझर गजानन मोतेकर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे किसन जाधव उपस्थित होते.
000000
पालकमंत्र्यांकडून अपघातातील मृतदेहांची पाहणी
बुलढाणा, दि. १ : देऊळगावनजीक झालेल्या बस अपघातातील मृतदेहांची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी केली.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज सकाळी साडेदहा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवलेल्या मृतदेहांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार संजय गायकवाड यांच्यासह सामान्य रुग्णालयातील अधिकारी उपस्थित होते. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम युद्ध पातळीवर करावे, तसेच या ठिकाणी येणाऱ्या नातेवाईकांना योग्य सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालयाला केल्या.
०००००
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
*समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात*
*मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त*
*मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर*
मुंबई, दि. १ - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
ही दुर्घटना कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
00000
सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटानजीक नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स क्र. एमएच 29 बीई 1819चा भीषण अपघात झाला. यात 26 प्रवासी मृत्युमुखी पडले असून सात ते आठ प्रवासी बाहेर पडले. बचावकार्य सुरु असून मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.
आवाहन
आज समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात खासगी बसमधील जखमी, मृतक प्रवाशांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी बुलडाणा कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मोबाईल क्र. 7020435954 व टोल फ्री क्र. 1077 तसेच 07262242683 या क्रमांकावर संपर्क साधावा.
सिंदखेड राजा नजीक झालेल्या बस अपघातातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment