Friday, 17 February 2023

DIO NEWS 17-02-2023

केंद्रीय योजनाचा लाभ सर्वसामान्यांना द्यावा
-खासदार प्रतापराव जाधव
बुलडाणा, दि. १७ : सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सकारात्मक राहावे, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी आमदार संजय रायमूलकर, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपवन संरक्षक अक्षय गजभिये, जालिंदर बुधावत आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात जिगाव प्रकल्प होत आहे. यामुळे पुनर्वसनाची कामे योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. यात घरासाठी जमिन देताना ती योग्य असावी याची दक्षता घ्यावी. याठिकाणी पाणी आणि विजेची सुविधा देण्यात यावी. आवश्यक असणाऱ्या अटी पूर्ण करून आवास योजनेची घरे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत.
राष्ट्रीय महामार्गाची कामे करताना रस्ता आणि इतर कामे पूर्ण झाल्याशिवाय पूर्णत्वाचा दाखला देऊ नये. खामगाव बुलडाणा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. कंत्राटदारांकडून कामे करून घ्यावीत. वेळेत काम पूर्ण केली नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. पाणी पुरवठ्याच्या योजना सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी त्या वेळेत हस्तांतरित करण्यात याव्यात. 
खरिप हंगामात पिक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे, तरी गरजू शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल यासाठी बँकांनी प्रयत्नशील रहावे. पिक विम्याबाबत तीन लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यातील दोन लाख २९ हजार शेतकऱ्यांना पिक विमा मंजुरी मिळाली असून एक लाख ९२ हजार शेतकऱ्यांना १५६ कोटी वितरीत करण्यात आले आहे. पिक विम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रत देण्यात यावी. 
डिजिटल इंडियामध्ये फायबर ऑप्टिक प्रत्येक गावात पोहोचविण्याचे उद्दीष्ट आहे. ही सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी प्रयत्नशील रहावे. कौशल्य विकासातून प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेताना त्यांना रोजगार मिळावा किंवा स्वयंरोजगार करण्यासाठी कर्ज आणि इतर सुविधा मिळावी. शासकीय किंवा खासगी कंपनीमध्ये भरती होताना शासकीय योजनांमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे.
जल जीवन मिशन अंतर्गत ७१४ गावांमध्ये योजना राबविण्यात येत आहे. ही कामे तातडीने पूर्ण करून प्रत्येक घराला पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करावे. ही कामे चांगली करण्यात यावी. पोषण आहार चांगल्या दर्जाचा पुरवठा व्हावा यासाठी शाळांना सूचना देण्यात याव्यात. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शाळेचे दिवस हे पाहूनच पोषण आहाराचा पुरवठा करण्यात यावा. बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांची योग्य ती काळजी घेण्यात यावी. 
यावेळी राष्ट्रीय महामार्ग, पाणी पुरवठा, पूनर्वसन, पिक विमा, डिजिटल इंडिया, बांधकाम, स्वच्छ भारत, शालेय पोषण आहार, रोजगार हमी योजना, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, उमेद, वन विभाग, प्रधानमंत्री आवास योजना आदी बाबतचा आढावा घेण्यात आला.
00000

No comments:

Post a Comment