बंद पडलेल्या टपाल जीवन विमा पॉलिसी सुरु करण्यासाठी संधी
बुलडाणा, दि. 2 : टपाल आणि ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसीचा भरणा केला नसल्याने बंद पडलेल्या पॉलिसी पुनरुज्जीवीत करण्यासाठी विशेष संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचा पॉलिसीधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकाला नजिकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागणार आहे. त्यासाठी पॉलिसीधारकांची वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार आहे. पॉलिसीधारकांना विमा लाभ मिळविण्यासाठी पॉलिसी पुनरुज्जीवीत करावयाची आहे, त्यांनी नजिकच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये दि. 31 मार्च 2023च्या आधी लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. टपाल जीवन विमा पॉलिसीधारकांना आयकर विभागातर्फे 80 सी अंतर्गत सवलत देण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री 1800 1805 232 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
सुकन्या समृद्धीच्या जनजागृतीसाठी विशेष मोहिम
बुलडाणा, दि. 2 : डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजनेच्या जनजागृतीसाठी दि. 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यात दहा वर्षाखालील मुलींचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात येणार आहे.
डाक विभागामार्फत यावर्षी आझादी का अमृत महोत्सवांतर्गत दिल्ली येथे दि. 11 ते 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात जास्तीत जास्त पात्र मुलींना सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे.
डाक विभाग नागरिकांना लहान बचत योजना खाते आणि सुकन्या समृद्धी योजनेची जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाकघरामध्ये दि. 1 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत 10 वर्षाखालील प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडून त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे. सुकन्या समृद्धी खाते सर्व बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याज दर 7.6 टक्के देत आहे. हे खाते किमान 250 रुपयांच्या ठेवीवर उघडले जाऊ शकते. या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल रक्कम 1 लाख 5 रुपये जमा केली जाऊ शकते. ही रक्कम 80 सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे. या खात्याचा लॉक-इन कालावधी खाते काढलेल्या तारखेपासून 15 वर्षे आणि परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे. 50 टक्के रक्कम ही मुलीच्या उच्च शिक्षणासाठी काढता येते, तसेच लग्नासाठी खाते बंद करता येते.
या व्यतिरिक्त ग्राहकांनी पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ, टीडी, एनएससी, केव्हीपी योजनांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी नजिकच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट देऊन दि. 1 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आपले बचत खाते, मुदत ठेव खाते, तसेच पात्र मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते काढण्याचे आवाहन डाक अधिक्षक राकेश येल्लामेल्ली यांनी केले आहे.
000000
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी
अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
बुलडाणा, दि. 2 : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास दि. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र इच्छुकांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू गट, शिवछपत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू गट असे पुरस्कार प्रदान करते.
या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास दि. 30 जानेवारी 2023 पर्यंत मुदत होती. मात्र या कालावधीत खेलो इंडिया आणि इतर स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण शिबीर आणि स्पर्धा यामुळे अर्ज करण्यास पुरेसा कालावधी मिळालेला नसल्याने अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारासाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार वर्षातील 30 जून रोजी संपणाऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी अर्जाचे नमुने, शासन निर्णय यासाठी क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्यामधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.
0000
काजू पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करण्याचे आवाहन
*फलोत्पादन पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापन
बुलडाणा, दि. 2 : काजू पिकावर कीड रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या रोगामुळे उत्पादनावर परिणाम होणार असल्याने काजू पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
काजू पिकावरील कीड व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयाबाबत प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती केली जात आहे. कोकण किनारपट्टीलगत या आठवड्यात सुद्धा थंडीचा प्रभाव कमी प्रमाणात आहे. काही ठिकाणी हवामान ढगाळ व दाट धुक्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बऱ्याच काजू बागा मोहोर व फळधारणेच्या अवस्थेमध्ये असून शेतकरी वर्गाने आपल्या काजू बागाचे नियमितपणे कीड-रोगाचे सर्वेक्षण करून त्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर जाणार नाही याची काळजी घेऊन उपाययोजना करावे. काजू मोहोर, काजू बोंडू व बियांचे संरक्षण करावे लागणार आहे. धुक्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आवश्यकता असल्यास बुरशीनाशकाचा वापर करावा.
काजू पिकावरील किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. काजू पिक एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनात ढेकण्या म्हणजेच टी मॉस्किटो बग बागेचे वेळोवेळी सर्वेक्षण करून नवीन मोहोर, फळ यांची पाहणी करावी. मोहोर, बिया काळपट आढळल्यास किंवा प्रादूर्भाव ५ टक्क्यापेक्षा जास्त दिसून आल्यास विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार प्रोफेनोफॉस १० मिली मोहोर फुटल्यावर किंवा अॅसिटामिप्रिड ५ मिली किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रिन ६ मिली प्रति १० लिटर फळधारणा अवस्थेत पाण्यातून यापैकी एका कीटकनाशकांची फवारणी करावी. थंडीच्या महिन्यात लिकॅनीसियम लिकॅनी या जैविक बुरशीचा वापर ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
फुलकिडीचा मोहोर, काजू बी आणि बोंडूवर भुरकट रंगाचे चट्टे आढळल्यास अथवा बियाचा आकार वेडावाकडा झालेला आढळल्यास किंवा प्रादूर्भाव १० फुलकिडी प्रती मोहोर, काजू बी आणि बोंडूवर दिसून आल्यास विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार ढेकण्या नियंत्रणासाठी फवारणी केली असल्यास वेगळे किटकनाशक वापरण्याची गरज नाही. थंडीच्या महिन्यात लिकॅनीसियम लिकॅनी जैविक बुरशीचा वापर ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
खोडकिडा यावर उपाययोजना करताना बाग स्वच्छ ठेवावी. झाडाची ठराविक कालावधीने व्यवस्थित पाहणी करावी. झाडाला कीड लागलेली आढळून आल्यास पटाशीच्या सहाय्याने साल काढून शक्य तेवढ्या अळ्या काढून नष्ट कराव्यात. प्रादूर्भावामुळे मेलेली किंवा संपूर्ण पिवळी पडलेली झाडे मुळासकट खणून काढून अळी व कोष यांचा नायनाट करावा. प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेत असताना प्रादूर्भित खोडाची साल काढून आतील अळ्या नष्ट कराव्यात. नुकसानग्रस्त भाग तसेच झाडाचा बुंधा आणि माती क्लोरपायरिफॉस २५ मिली किंवा फिप्रोनिल १० मिलि प्रति ५ लिटर पाण्यात मिसळून भिजवावा.
काजू बोंडू व बी पोखरणारी अळीवर लॅम्डा सायहॅलोथ्रिन ६ मिली प्रति १० लिटर फळधारणा अवस्थेत पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढेकण्या नियंत्रणासाठी तिसऱ्या फवारणीदरम्यान वरील कीटकनाशक वापरले असल्यास पुन्हा वापरू नये. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड २० ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १० मिली किंवा अॅसिटामिप्रिड ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून याची मिश्र फवारणी करावी किंवा १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
पॉवर स्प्रेयरने फवारणी करताना कीटकनाशकाचे प्रमाण दुप्पट घ्यावे. फवारणी शक्यतो सकाळी १० वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी ४ वाजल्यानंतर करावी. सतत एकाच कीटकनाशकाचा वापर टाळावा. फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना काजू पिकावरील किड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी उपाययोजना सुचविण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment