Wednesday, 8 February 2023

DIO BULDANA NEWS 08.02.2023

 



बाल सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 8 : बाल सुरक्षा अभियानातून सुमारे सहा लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने दुर्गम, ग्रामीण, वंचित घटकातील बालकांची प्राधान्याने तपासणी करावी. संख्यात्मकपेक्षा गुणात्मक हे अभियान राबविण्यात यावेत. यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज बाल सुरक्षा अभियानाच्या अंमलबजावाणीबाबत बैठक पार पडली. यावेळी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अनिल आकाळ, आनंदी सोनुने, विस्तार अधिकारी वृंदा कुळकर्णी, माधुरी भागवत, डॉ. विवेक सावके आदी उपस्थित होते.

डॉ. तुम्मोड म्हणाले, बाल सुरक्षा अभियानात प्रामुख्याने सहा ते अठरा वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या वयोगटातील मुले ही शाळेतील असणार आहे. त्यामुळे शाळा हे केंद्रबिंदू मानून त्यानुसार आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात यावे. यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता तपासून पाहण्यात यावी. पालकांमध्ये जागरूकता व्हावी, यासाठी अंगणवाडीस्तरावर सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात यावी.

बालकांची आरोग्य तपासणी करताना प्रामुख्याने आरोग्याच्या सुविधांपासून वंचित असलेल्या घटकांची प्राधान्याने तपासणी करण्यात यावी. दुर्गम आणि आदिवासी भागात बालकांची संख्या कमी असली तरी त्याठिकाणी जाणिवपूर्वक आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्यांना आवश्यक असलेले औषधोपचार आणि शस्त्रक्रियांची सेवा देण्यात यावी. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

00000

हॉटेल, रेस्टॉरंटमधील मेनूमध्ये भरडधान्याचा समावेश करावा

*अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 8 : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याअनुषंगाने हॉटेल, रेस्टॉरंटमधील मेनूमध्ये भरडधान्याचा समावेश करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे राज्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक  तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यात येत आहे. पौष्टिक  तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, कोडो, कुटकी, सावा, राळा आणि राजगिरा आदी पिकांचा समावेश आहे. ही सर्व पौष्टिक  तृणधान्य लोह, कॅल्शिअम, झिंक, आयोडीन सारख्या सुक्ष्म पोषक घटकांने समृद्ध आहे, तसेच ग्लूटेनमुक्त आहेत. पौष्टिक तृणधान्य डायरिया, बद्धकोष्टता आतड्याच्या आजारावर प्रतिबंध करतात. तसेच या तृणधान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, अॅनिमिया, उच्चरक्तदाबरोधक आहेत. पौष्टिक तृणधान्य आधारीत पदार्थ कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यास सक्षम असल्याने आहारामध्ये त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे लोकांच्या आहारातील प्रमाण वाढविण्यासाठी त्याचा प्रचार, प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक राज्यास एक विशिष्ट महिना नेमून दिला आहे. महाराष्ट्र राज्यासाठी फेब्रुवारी २०२३ हा महिना नेमून दिला आहे. मिलेट ऑफ मंथनुसार फेब्रुवारी महिना हा ज्वारी पिकासाठी समर्पित केला आहे.

तृणधान्याच्या उपयोगामुळे ग्राहकांना पौष्टिक  अन्न पदार्थ उपलब्धता होऊ शकतील, त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये तयार होणाऱ्या आणि विक्री होणाऱ्या पदार्थांमध्ये ज्वारी, बाजरी आणि इतर भरडधान्याचा उपयोग करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त स. द. केदारे यांनी केले आहे.

000000

मागासवर्गीय विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

*दहा महाविद्यालयांचे अर्ज मोठ्या संख्येने प्रलंबित

बुलडाणा, दि.  8 : मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यानी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रामुख्याने दहा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अर्ज मोठ्या संख्येने प्रलंबित आहेत.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय पाठ्यक्रमाचे संलग्न असलेल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे.

योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणाली व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष, नूतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी दि. 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष व नूतनीकरणास प्रवेशित असलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे लागणार आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 9 हजार 80, इतर मागास प्रवर्ग, विजाभज व विमाप्र प्रवर्गाचे 23 हजार 356 अर्ज भरण्यात आले आहे. अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तरीही संपूर्ण सत्रातील सरासरीच्या तुलनेत भरलेल्या अर्जांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ आणि व्यावसायिक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित, तसेच योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर भरून घेण्याची कार्यवाही करावी.

कार्यशाळा घेऊन याबाबतची सूचना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात यावी. यात पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडीबीटी प्रणालीवर आवेदनपत्र भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्राचार्यांनी घ्यावी. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment