जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणी परीक्षेसाठी मुदतवाढ
बुलडाणा, दि. 9 : जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावी करिता निवड चाचणी परीक्षेसाठी आवेदन पत्र भरण्यास पुन्हा एकदा दि. 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावी करीता निवड चाचणी परीक्षेचे आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरण्याची मुदत दि. 8 जानेवारी 2023 पर्यंत देण्यात आली होती, ती आता दि. 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2022-23मध्ये पाचव्या वर्गात शिकत असतील, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, तसेच ऑनलाईन फॉर्म navodaya.gov.in या संकेतस्थळावरुन भरावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. कसर यांनी केले आहे.
000000
आज जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे उद्घाटन
* कृषि महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन
*विविध विषयांवर होणार मार्गदर्शन
बुलडाणा, दि. 9 : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आणि प्रकल्प संचालक, आत्मा यांच्यातर्फे कृषि महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 10 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. जिजामाता प्रेक्षागार येथे दि. 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार ॲड. किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे आदी उपस्थित राहतील.
या महोत्सवात शुक्रवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रिसीडयू फ्री ॲण्ड ऑर्ग्यानिक मिशन इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी हे सेंद्रीय शेतीचे महत्व आणि प्रमाणीकरण, दुपारी दोन वाजता जय किसान शेतकरी गट वाशिमचे संचालक डॉ. संतोष चव्हाण शेती बांधावर जैविक उत्पादने तयार करण्याबाबत ऑन फार्म लॅबची माहिती देतील. दुपारी चार वाजता युनिवर्स ॲग्रो एक्सपोर्टचे प्रविण वानखडे कृषि निर्यात, ग्लोबल, गॅप, ट्रेसॅबीलीटी, निर्यातीचे गुणवत्ता संदर्भातील निकषाबाबत मार्गदर्शन करतील.
शनिवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डॉ. सुभाष टाले शेतावर करावयाचे मृद व जलसंधारण तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्राच्या विषयतज्ज्ञ डॉ. प्रणीता कडू पीएमएफएमई अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग आणि संधी, तर सिताफळ महासंघचे अध्यक्ष श्याम गट्टाणी सिताफळ लागवड आणि प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करतील.
रविवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रेशिम संचालनालयाचे सहायक संचालक महेंद्र ढवळे रेशीम उद्योग व्यवसाय, संधी व बाजारपेठेबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता ग्रीन ॲग्रो बाजार एक्सपोर्टचे संदिप शेळके शेतकरी उत्पादक कंपनी यांना निर्यातीतील संधी, तसेच दुपारी चार वाजता संजय वाघ ग्लोबल गॅप, फायटोसॅनिटरी, न्युनतम अंश मर्यादा याबाबत मार्गदर्शन करतील.
सोमवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक डॉ. योगेश इंगळे संत्रा पिक व्यवस्थापन, दुपारी दोन वाजता विषयतज्ज्ञ श्रीमती के. सी. गांगडे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन करतील.
मंगळवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व बाजारपेठ याबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता कृषि महोत्सवाचा समारोप करण्यात येईल. या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000
जिल्हास्तर एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल क्रीडा उत्साहात
बुलडाणा, दि. 9 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तर एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल क्रीडा स्पर्धा बुधवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये उत्साहात पार पडल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून एन. आर. वानखेडे, मुकेश बाफणा, शब्बू भाई, भाऊ वानखेडे, रविंद्र गणेशे, राहुल औशलकर, जावेद, विनायक क्षीरसागर आदी उपस्थित होते.
श्री. जाधव यांनी प्रास्ताविकातून एफसी बायर्न क्लब, म्युनिच (जर्मनी) यांच्याशी करार करुन राज्यात फुटबॉल खेळाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी 14 वर्षाआतील मुलांच्या जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामधून प्राविण्यप्राप्त आणि निवड चाचणीद्वारे नियुक्त करण्यात आलेले पाच खेळाडू अशा एकुण 20 खेळाडूंची निवड एफसी बायर्न क्लब, म्युनिच येथील फुटबॉलच्या प्रशिक्षणाकरीता करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान येणारा संपूर्ण खर्च शासन करणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
क्रीडा स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले. प्रबोधन विद्यालय, बुलढाणा विरुद्ध अंजुमन उर्दू हायस्कुल, खामगाव यांच्यात होऊन 1-0 गोलने प्रबोधन विद्यालय विजयी ठरला. यशोधाम पब्लिक स्कूल, मलकापूर विरुद्ध श्री शिवाजी हायस्कुल, बुलढाणा यांच्यातील सामन्यात 3-0 गोलने यशोधाम पब्लिक स्कूलने हा सामना जिंकला. सहकार विद्या मंदिर विरुद्ध बाल शिवाजी कॉन्व्हेंट, बुलढाणा यांच्यातील सामन्यात सहकार विद्या मंदिरने 0-1 असा जिंकला, शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा विरुद्ध स्टेट बोर्ड सहकार विद्या मंदिर, बुलढाणा यांच्यात होऊन शारदा ज्ञानपीठ, बुलढाणाने हा सामना 3-0 जिंकला.
प्रथम सेमिफायनल सहकार विद्या मंदिर (सीबीएसई) विरुद्ध प्रबोधन विद्यालय, बुलढाणा यांच्यात होऊन हा सामना सहकार विद्या मंदिर संघाने 5-0 ने जिंकला. अंतिम सामना यशोधाम पब्लिक स्कुल, मलकापूर विरुद्ध शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा यांच्यात होऊन 0-2 गोलने शारदा ज्ञानपीठ, बुलढाणा या शाळेच्या संघाने बाजी मारली. हा संघ विभागीय एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला.
या क्रीडा स्पर्धेत पंचाधिकारी म्हणून मोहसीन शेख, फव्वाद अहेमद, राहुल औशालकर, शाकीब चौधरी, शेख माजीद कार्य केले. क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, विनोद गायकवाड, गोपाल गोरे, कृष्णा नरोटे, गोपाल डोंगरदिवे यांनी पुढाकार घेतला.
00000
No comments:
Post a Comment