जिल्हा उद्योग केंद्र नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत
*पत्रव्यवहार नव्या पत्यावर करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : जिल्हा उद्योग केंद्र बुलडाणा येथील कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे कार्यालयीन पत्रव्यवहार नव्या पत्यावर करण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी कार्यालयाचा नवीन पत्ता हा महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, तहसिल कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा 443 001 आहे. तसेच दूरध्वनी क्र. 07262 - 295564, 242367 असून ई-मेल didic.buldhana@maharashtra.
0000000
ज्ञानगंगा अभयारण्यातील राज्यमार्गावर रात्री प्रतिबंध
*पर्यायी मार्गाचा उपयोग करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 6 : ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या खामगाव-बोथा-बुलडाणा राज्यमार्गावर वन्यजीव संवर्धन, तसेच वन संरक्षणाच्या हेतूने सर्व वाहनांना वाहतुकीच्या कारणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत प्रतिबंध घातले आहे.
या मार्गावर वन उपज तपासणी नाका खामगाव, वन उपज तपासणी नाका बोथा, वन उपज तपासणी नाका गोंधनखेड, वन उपज तपासणी नाका वरवंड असे चार वनउपज तपासणी नाके आहेत. सदर नाक्यावर वनपरिक्षेत्र वन्यजीव खामगाव आणि बुलडाणा या दोन्हीही परिक्षेत्रातील वन कर्मचारी, वनमजुरांकडून वाहनांची तपासणी करुन नोंदी घेतात. बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि प्रवासी वनउपज तपासणी नाक्यावरील वन कर्मचारी, वनमजुर यांच्याशी वाद घालून प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रवेशासाठी हट्टहास करतात. याबाबत वन संवर्धन अधिनियम 1972च्या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. अशा आदेशाचे उल्लंघन होऊन संबंधिताविरुद्ध फौजदारी आणि कायदेशीर कारवाई करण्यात येते.
रात्रीच्या वेळेस सदर मार्गावर बिबट, अस्वल अशा वन्यप्राण्याचा संचार असतो. त्यामुळे वाहनांच्या अपघाताची शक्यता असते. तसेच वन्यप्राण्यांच्या वास्तव्यास धोका पोहचून त्यांचा अधिवास नष्ट होवू शकतो. त्यामुळे सदर मार्गावर रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत प्रवासास प्रतिबंध घालण्यात आले आहे. आवश्यकता असल्यास बुलडाणा-वरवंड-उंद्री-खामगांव या पर्यायी वळण मार्गाचा उपयोग करावा. असे आवाहन वन्यजीव वन परिक्षेत्र अधिकारी दिपेश लोखंडे यांनी केले आहे.
00000
शुक्रवारपासून जिल्हास्तरीय कृषि महोत्सवास सुरूवात
* दि. 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार महोत्सव
बुलडाणा, दि. 6 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासन, कृषि विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा विभाग यांच्यावतीने जिजामाता प्रेक्षगार येथे दि. 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे कुलगुरु शरद गडाख, आमदार ॲड. किरण सरननाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे आदी उपस्थित राहतील.
कृषी विद्यापीठाद्वारे संशोधन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रब्बीचा हंगाम उत्तरार्धात आल्यानंतर शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे या कृषी महोत्सवाबद्दल शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. महोत्सवातील प्रात्यक्षिकांमध्ये राज्य तसेच जिल्ह्यातील विविध प्रयोग, यात उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पिक व्यवस्थापन एकात्मिक किटक व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापिठाकडून सादर केली जाणार आहेत.
कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियाच्या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट, त्याबाबतचे संशोधन, नवीन वाणाचे संशोधन, बदलेले वातावरण, पर्जन्य आणि उष्णता बदलाचा वेध घेऊन करण्यात येत असलेल्या संशोधनाचे सादरीकरण महोत्सवात करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 हे वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्याकरिता पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
0000000
No comments:
Post a Comment